

सचिन बनछोडे
वैदिक तत्त्वज्ञानाला सुव्यवस्थित रूप देणारे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. ‘आदिगुरू’ भगवान दत्तात्रेयांपासून ते सर्व गुरूंचे स्मरण, पूजन करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. त्यानिमित्त...
सर्वव्यापी, शाश्वत आत्मतत्त्व म्हणजेच गुरुतत्त्व. आत्मा आणि सर्वव्यापी ब्रह्म एकच आहे. तेच बाह्यरूपात सद्गुरू रूपाने व अंतर्यामी आत्मस्वरूपाने विलसत असते. सद्गुरू शिष्याला सगुण रूपात उपदेश करतातच; पण काही प्रसंगी हे गुरुतत्त्व अन्यही प्रकारे सत्पात्र शिष्याला ज्ञानोपदेश करीत असते. याबाबत उपनिषदांमध्ये अनेक उदाहरणे आहेत. वेदकालीन परंपरेतील गुरू-शिष्य संबंधांमधील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक घटना म्हणजे, महर्षी याज्ञवल्क्य आणि त्यांचे गुरू वैशंपायन यांच्यातील वाद. हा वाद केवळ दोन व्यक्तींपुरता मर्यादित नव्हता, तर यामुळे यजुर्वेदाच्या दोन प्रमुख शाखा निर्माण झाल्या, ज्या आजही प्रचलित आहेत. महर्षी वैशंपायन हे महर्षी वेदव्यास यांचे प्रमुख शिष्य होते. राजा जनमेजय याला महाभारताची कथा सांगणारे मूळ निवेदक वैशंपायनच होते. महर्षी याज्ञवल्क्य हे वैशंपायन यांचे भाचे आणि अत्यंत हुशार व तेजस्वी शिष्य होते. या गुरू-शिष्यांमधील वादाची सुरुवात एका घटनेमुळे झाली.
एकदा सर्व ऋषींनी मिळून मेरू पर्वतावर एका सभेचे आयोजन केले. या सभेसाठी एक नियम होता की, जो कोणी ऋषी या सभेला उपस्थित राहणार नाही, त्याला ब्रह्महत्येचे पाप लागेल. काही कारणास्तव महर्षी वैशंपायन त्या सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे नियमानुसार त्यांना ब्रह्महत्येचे प्रायश्चित्त करणे भाग होते. वैशंपायन यांनी आपल्या सर्व शिष्यांना बोलावून सांगितले की, ‘माझ्यावरील हे पाप दूर करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मिळून तपश्चर्या करा.’ यावेळी आपल्या सामर्थ्याचा आणि ज्ञानाचा अभिमान असलेले याज्ञवल्क्य म्हणाले, ‘गुरुदेव! हे सर्वसामान्य शिष्य काय तप करणार? या सर्वांच्या वतीने मी एकटाच हे प्रायश्चित्त पूर्ण करतो.’ याज्ञवल्क्यांचे हे बोलणे वैशंपायन यांना आपला आणि इतर शिष्यांचा अपमान वाटला. क्रोधित होऊन ते म्हणाले, ‘तू माझ्या इतर शिष्यांचा अपमान करत आहेस. तुझ्यासारख्या अहंकारी शिष्याची मला गरज नाही.
तू माझ्याकडून जे काही ज्ञान (यजुर्वेद) घेतले आहेस, ते सर्व मला परत कर.’ गुरूची आज्ञा शिरोधार्य मानून याज्ञवल्क्यांनी योगसामर्थ्याने आपल्याकडून शिकलेला संपूर्ण यजुर्वेद ओकून टाकला (वमन केला). याज्ञवल्क्यांनी वमन केलेल्या त्या ज्ञानरूपी अन्नाला (वेदमंत्रांना) वैशंपायन यांच्या इतर शिष्यांनी तित्तिर पक्ष्यांचे रूप घेऊन ग्रहण केले. वमन केल्यामुळे ते ज्ञान काहीसे अस्पष्ट किंवा ‘कृष्ण’ (काळे/मिश्रित) झाले होते. तित्तिर पक्ष्यांनी ग्रहण केल्यामुळे या शाखेला ‘तैत्तिरीय संहिता’ असे नाव मिळाले आणि तिच्या मिश्र स्वरूपामुळे तिला ‘कृष्ण यजुर्वेद’ म्हटले गेले. आपले सर्व ज्ञान परत केल्यानंतर याज्ञवल्क्य ज्ञानहीन झाले. मग, त्यांनी कठोर तपश्चर्या करून सूर्यदेवाची आराधना केली. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन सूर्यदेवाने त्यांना घोड्याच्या (वाज) रूपात दर्शन दिले आणि एका नवीन, शुद्ध आणि सुव्यवस्थित यजुर्वेदाचे ज्ञान दिले. सूर्याकडून मिळाल्यामुळे हे ज्ञान अत्यंत तेजस्वी आणि ‘शुक्ल’ (पांढरे/शुद्ध) होते. म्हणूनच या शाखेला ‘शुक्ल यजुर्वेद’ असे म्हटले जाते. या कथेत सर्वव्यापी गुरुतत्त्वाने सूर्यरूपातून याज्ञवल्क्यांना ज्ञान दिल्याचे दिसते.
सत्यकाम जाबाली यांची कथा छांदोग्य उपनिषदात (चौथा अध्याय, खंड 4 ते 9) विस्ताराने येते. जेव्हा सत्यकाम आपले गुरू हारिद्रुमत गौतम यांच्याकडे शिक्षणासाठी गेले, तेव्हा गुरूंनी त्यांची सत्यनिष्ठा पाहून त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. काही काळानंतर गुरू गौतमांनी 400 अशक्त गायी सत्यकामांच्या स्वाधीन केल्या आणि सांगितले, ‘ज्या दिवशी या गायींची संख्या 1000 होईल, तेव्हा तू परत ये. ‘सत्यकाम त्या गायींना घेऊन वनात गेले आणि अनेक वर्षे त्यांची सेवा केली. जेव्हा गायींची संख्या 1000 झाली, तेव्हा ते परत आश्रमाकडे निघण्यास तयार झाले. या प्रवासात त्यांना वृषभ (बैल), अग्नी, हंस आणि पाणकोंबडी (मद्गु पक्षी) यांच्याकडून ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त झाले. अशा प्रकारे सर्वव्यापी गुरुतत्त्वाने या चार रूपांमधून त्यांना ज्ञान दिले. विशेष म्हणजे, जसे सत्यकाम जाबाली यांना निसर्गातील विविध घटकांकडून ज्ञान मिळाले, त्याचप्रमाणे त्यांचे शिष्य उपकोसल कामालयन यांना तीन पवित्र अग्नींकडून ज्ञान प्राप्त झाले. ही गुरू-शिष्य परंपरेतील एक अद्भूत कथा आहे. त्याची सविस्तर माहिती छांदोग्य उपनिषदात (चौथा अध्याय, खंड 11 ते 13) मिळते.
उपकोसलने आपले गुरू सत्यकाम जाबाली यांच्या आश्रमात तब्बल 12 वर्षे ब्रह्मचर्याचे पालन करत तीन पवित्र अग्नींची (गार्हपत्य, अन्वाहार्यपचन आणि आहवनीय) निष्ठेने सेवा केली. जेव्हा गुरूने इतर शिष्यांना ज्ञान देऊन घरी पाठवले; पण उपकोसलचे समावर्तन केले नाही, तेव्हा तो अतिशय दुःखी झाला. गुरूंच्या पत्नीने उपकोसलला ज्ञान देण्याविषयी विनंती केली; पण सत्यकाम काहीही न बोलता प्रवासाला निघून गेले. तेव्हा उपकोसल अन्न-पाण्याचा त्याग करून बसला. त्याची ही कठोर निष्ठा आणि सेवा पाहून ते तीन अग्नी प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश देण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक अग्नीने त्याला ब्रह्माच्या एका विशिष्ट पैलूचे ज्ञान दिले. अशा प्रकारे उपकोसलला गुरुतत्त्वाने तीन अग्नींच्या रूपातून ज्ञानोपदेश केला. महाभारतातही एकलव्याची कथा आहे. द्रोणाचार्यांना गुरू मानून त्यांच्या पुतळ्यासमोर धनुर्विद्येचा सराव करणारा एकलव्य अर्जुनाच्या तोडीचा धनुर्धारी योद्धा बनला होता. इथेही त्याच एकमेवाद्वितीय गुरुतत्त्वाने त्याला ज्ञान दिले, असे दिसून येते. गुरुपौर्णिमेनिमित्त साकार सद्गुरू रूपातील आणि अशा अनंत, सर्वव्यापी स्वरूपातील गुरुतत्त्वास शतशः नमन!