

आज पाच नोव्हेंबर. वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करून आम्ही आज एक्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करीत आहोत. पत्रकारिता आणि सार्वजनिक, सामाजिक जीवनातील प्रदीर्घ साठ वर्षांच्या वाटचालीत हजारो सुहृद आणि लाखो जनसंमर्दाचे आम्हाला भावबळ आणि पाठबळ लाभले. या समृद्ध शिदोरीच्या शक्तीवर समाज ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला. तो कितपत यशस्वी, त्याचा निवाडा जनता जनार्दनाने करायचा आहे. पत्रकारिता हे सार्वजनिक व्रतच असते. सार्वजनिक जीवनाशीच पत्रकारितेची अतूट बांधिलकी असते. ही बांधिलकी आम्ही जीवापाड जपली आणि अनेक सार्वजनिक कार्यात भाग घेताना, सामाजिक प्रश्नांना हात घालताना हीच समरसता जपली आणि जोपासली. 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धावेळी भारतीय जवानांनी लाहोरवर धडक मारली तेव्हा पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष म्हणून आम्ही भव्य विजयोत्सवी मिरवणूक काढली होती. तेव्हापासून गेल्या साठ वर्षांत सार्वजनिक जीवनाशी जी नाळ जुळली, ती अद्याप अबाधित आहे आणि त्याच काळात पीटीआय मशिनवरील टेलिप्रिंटरच्या बातम्या पाहताना जी पत्रकारिता अंगी बाणली आणि भिनली ती अखंडित राहिली.
जनताजनार्दनाचा अकृत्रिम लोभ हेच त्याचे कारण! पत्रकारिता आणि सामाजिक कार्याचे बाळकडू आम्हाला बालपणीच मिळाले, ते ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव तथा ती. आबा यांच्याकडून. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा त्यांना सहवास मिळाला आणि म. गांधी यांचा संदेश मिळवून आबांनी तत्कालीन बहुजन समाज स्वातंत्र्य संग्रामात आणला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत मार्च 1930 मध्ये त्यांनी काळाराम मंदिर सत्याग्रहात भाग घेतला आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. आंबेडकर यांचा मुंबईत दादरला दि. 5 सप्टेंबर 1943 रोजी जाहीर सत्कारही झाला होता. 1949 मध्ये नामनियुक्त आमदार असताना आबांनी कूळ कायदा बिलाचे समर्थन केले होते. कोल्हापुरातील प्रसिद्ध शेतकरी संघासह अनेक सहकारी संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. असा हा समृद्ध वारसा आम्हाला लाभला आणि आम्ही तो यशस्वीपणे पुढे नेला. ती. आबा यांनी मुंबईतून कोल्हापुरात आल्यावर ‘पुढारी’ दैनिक सुरू करताना प्रथमपासून सडेतोड आणि निर्भीड बाणा ठेवला आणि तत्कालीन अनेक प्रश्नांवर मर्मग्राही वृत्तांकन आणि लिखाण केले.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची अमोघ शक्ती आम्ही परखडपणे नेहमी हाताळली आणि राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणावर घणाघाती टीका केली. चुकीचे निर्णय बदलायला लावले. चार शब्दांपुरती लेखणी न वापरता आम्ही वेळोवेळी प्रत्यक्ष सार्वजनिक जीवनातही जनतेच्या प्रश्नांसाठी विविध लढ्यांत, आंदोलनांत जातीनिशी आघाडीवर राहिलो. पत्रकारिता आणि आमचे सार्वजनिक जीवन एकरूपच झाले आणि त्यातून ‘पुढारी’ हे लोकांचे हक्काचे व्यासपीठ बनले आणि ‘पुढारी’नेही जनतेची नस लक्षात घेऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडीत लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. एका बाजूला सार्वजनिक कार्यात सक्रिय सहभाग घेत असतानाच ‘पुढारी’चा चेहरामोहरा बदलत जिल्हास्तरापासून राज्य वृत्तपत्रापर्यंत ‘पुढारी’ने झेप घेतली. एकेकाळी मुंबई, पुण्याची वृत्तपत्रे कोल्हापूर, सांगली, सातार्यात येत; पण दक्षिण महाराष्ट्रातील ‘पुढारी’ने मुंबई, पुणे, नाशिक, छ. संभाजीनगर आदी भागात आपला विस्तार केला. खिळे जुळविण्याच्या जमान्यात ‘पुढारी’त मोनो मशिनवर टाईपसेटिंग होत असे. आम्ही एकाचवेळी सोळा पाने छापणारे आणि बहुरंगी छपाई करणारे अत्याधुनिक मुद्रण यंत्र आणले आणि ‘पुढारी’ आकर्षक रूपात प्रसिद्ध होऊ लागला. ए.पी. या जगभरातील रंगीत फोटो देणार्या संस्थेची सुविधा महाराष्ट्रात सर्वप्रथम ‘पुढारी’ने घेतली. दररोज वेगवेगळ्या पुरवण्या, रविवारची ‘बहार’ यातून वाचकांना मेजवानीच मिळू लागली. गेल्या पस्तीस वर्षांपासून ‘पुढारी’ने सुरू केलेले ‘विश्वसंचार’चे पान दोन पिढ्यांचे आकर्षण बनले आहे. मूळ अंकाबरोबर स्थानिक वृत्तांना प्राधान्य देणारी चार पानी ‘माय’ हा ‘पुढारी’चा प्रयोग. इतर अनेक वृत्तपत्रांनी ‘पुढारी’च्या या बदलाची आणि पुरवण्यांची नक्कल केली.
‘पुढारी’ची अशी भरारी सुरू असताना तेवढ्याच हिरिरीने आम्ही विविध सामाजिक उपक्रमांत आणि प्रश्नांत सक्रिय सहभाग घेतला. शिवराज्याभिषेक त्रिशताब्दी सोहळा आणि राजर्षी शाहू जन्मशताब्दी सोहळा यासाठी आम्ही पुढाकार घेतला आणि या देवोदुर्लभ शाही सोहळ्याला जवळजवळ सारे मंत्रिमंडळ उपस्थित होते. अंबाबाई मंदिरात पाच दलित दाम्पत्यांच्या हस्ते अभिषेक असो की, दलितांना जमीनवाटपाचा विषय असो, आम्ही पूर्वसुरींचा वारसा जपला. सीमा प्रश्नावर लिहिलेल्या जळजळीत अग्रलेखाने ‘पुढारी’ची पेपर टॅक्सी बेळगावजवळ जाळली गेली; पण त्याची तमा न बाळगता सीमा प्रश्नासाठी आम्ही सातत्याने आवाज उठवला. एस. एम. जोशी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा दिग्गजांसह कोल्हापुरात भव्य सीमा परिषद भरविली आणि या प्रश्नाचा आवाज बुलंद केला. कच्छ (भूज), किल्लारी भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत ‘पुढारी’च्या माध्यमातून आम्ही नेहमीच मदतनिधी उभा केला. कोल्हापूरवर अन्यायाने लादलेला टोल रद्द करण्यासाठी ‘पुढारी’ने सर्वप्रथम आवाज उठवला. आम्ही जातीने रस्त्यावर आंदोलनात उतरलो आणि अखेर टोल रद्द झाला.
मराठा आरक्षणासाठी झालेल्या प्रदीर्घ आंदोलनात आम्ही आघाडीवर होतो आणि कोल्हापुरात नुकत्याच स्थापन झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचची सर्वप्रथम मागणी आम्ही 1974 मध्ये अग्रलेखातून केली. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला आणि त्याला यश आले. 1999 मध्ये कारगील युद्धावेळी सियाचीन या उत्तुंग रणभूमीवर केवळ उपचारांची सुविधा नसल्याने शूर जवानांच्या प्राणांवर बेतते, हे समजताच आम्ही तातडीने स्वनिधीसह अडीच कोटी रुपयांचा लोकनिधी उभारला आणि सियाचीन हॉस्पिटलची उभारणी झाली. या हॉस्पिटलमध्ये गेल्या 23 वर्षांत 5 लाखांहून अधिक जवानांना उपचारांची सुविधा मिळाली. जवानांना संजीवनीच लाभली. या हॉस्पिटलच्या रूपाने हिमालयावर कोल्हापूरचा झेंडा फडकला आहे. गेल्या साठ वर्षांत चौदा पंतप्रधान, अठरा मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते, राजकारणी, उद्योगपती, शिक्षणमहर्षी, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, कलाकार अशा असंख्यांचा सहवास लाभला. स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी जसे द़ृढ संबंध आले, तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अतूट मैत्र जुळले. ‘पुढारी’च्या सुवर्ण महोत्सवासाठी स्व. राजीव गांधी आणि अमृत महोत्सवासाठी नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित होते आणि उभयतांनीही ‘पुढारी’च्या सामाजिक बांधिलकीचा उत्स्फूर्त गौरव केला होता. वृत्तपत्राच्या दोन समारंभांना दोन पंतप्रधानांची प्रमुख उपस्थिती लाभण्याचा भारतीय वृत्तपत्रसृष्टीत असा योग क्वचितच आला असावा.
‘पुढारी’च्या अगणित वाचकांच्या, हितचिंतकांच्या, सुहृदांच्या असीम प्रेमभावामुळेच ‘पुढारी’ला भरारीचे पंख लाभले. प्रिंटबरोबर टी.व्ही., एफ.एम. रेडिओ, डिजिटल, डिजिटल होर्डिंग आणि इव्हेंट अशा माध्यमांच्या सर्वच क्षेत्रांत ‘पुढारी’ समूहाने आपला ठसा उमटवला आहे. आमचे चिरंजीव योगेश कौशल्याने ही माध्यमे यशस्वीपणे सांभाळीत आहेत. ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त नागरी गौरव समितीने आमचा सत्कार आयोजित केला आहे. या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त ‘सिंहायन’ या आमच्या आत्मचरित्र ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ अशी आमची भावस्थिती आहे. आम्ही जनताजनार्दनाप्रति कृतज्ञ आहोत. त्यांच्यामुळेच आम्ही कृतार्थ झालो आहोत, अशा आमच्या नम्र भावना आहेत.