

डॉ. राहुल रनाळकर
मालेगाव महापालिकेतील महापौरांच्या दालनात लावलेल्या टिपू सुलतानच्या प्रतिमेमुळे निर्माण झालेला गदारोळ केवळ एका फोटोपुरता मर्यादित नाही; तो समाजाच्या मानसिकतेचा, राजकारणाच्या प्रवृत्तीचा आणि समाजमाध्यमांच्या प्रभावाचा आरसा आहे.
मालेगाव महापालिकेतील नवनियुक्त महापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांची प्रतिमा लावली. हे द़ृश्य बाहेर पडताच राज्यात दोन गट स्पष्ट दिसू लागले. एक टिपूंचे गुणगान करणारा आणि दुसरा तीव— विरोध करणारा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याने या वादाला अधिकच हवा मिळाली. काही तासांतच भूमिका बदलणे, माफी मागणे आणि त्यानंतरही वातावरण न निवळणे, हे चित्र आजच्या राजकारणाचे लक्षण म्हणावे लागेल.
खरे पाहता, एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची प्रतिमा लावणे किंवा न लावणे हा स्थानिक पातळीवरील प्रशासकीय विषय असू शकतो. परंतु, टिपू सुलतान सारख्या ऐतिहासिक व्यक्तीभोवती भावना चटकन पेट घेतात. विशेषतः महाराष्ट्राचा त्यांच्या इतिहासाशी थेट संबंध नसताना, हा मुद्दा एवढ्या प्रमाणात वाढवला जाणे हे प्रश्न निर्माण करणारे आहे. सोशल मीडियामुळे या वादाला प्रचंड वेग मिळाला. आज कोणतीही घटना घडताच तिचे विश्लेषण, टीका, समर्थन आणि शिवीगाळ काही मिनिटांत सुरू होते. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्याआधीच समाजमाध्यमांवर ‘डिजिटल दंगल’ सुरू झालेली असते. कधीकधी यामुळे प्रत्यक्ष तणाव आटोक्यात राहतो. कारण, लोकांचा राग ऑनलाईनच व्यक्त होतो. मात्र, या प्रक्रियेत समाजातील विषारी भावना किती खोलवर रुजल्या आहेत, हेही स्पष्ट होते.
मालेगावची वास्तवस्थिती मात्र वेगळी आहे. शहरात अवैध प्लास्टिक उद्योग, वीज चोरी, रस्ते, स्वच्छता, मूलभूत सुविधा असे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित असताना, प्रतिमेच्या वादाने शहराची प्रतिमा पुन्हा एकदा नकारात्मक चर्चेत आली. आधीच ‘मुस्लिम बहुल शहर’ या टॅगमुळे बदनाम झालेल्या मालेगावला नव्या वादाची गरज नव्हती. विशेष म्हणजे, या मुद्द्यावर मुस्लिम समाजातही एकमत दिसले नाही. एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती यांनीच प्रतिमेला विरोध दर्शवला. माजी आमदार आसिफ शेख यांनी समर्थन केले, यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. मुस्लिम समाजात किंवा त्यांच्या नेत्यांमध्ये सर्व प्रश्नांवर कमालीची एकजूट असते, ही समजूत चुकीची आहे. स्थानिक राजकारणात ‘मुस्लिम विरुद्ध हिंदू’पेक्षा ‘मुस्लिम विरुद्ध मुस्लिम’अशी स्पर्धा अधिक तीव— असल्याचे यामुळे दिसून आले.
मग अशा वादांचा उद्देश काय? अनेकदा अशा प्रकरणांमधून धार्मिक ध—ुवीकरणाची शक्यता तपासली जाते. राजकारणाला मुद्दा हवा असतो आणि भावना पेटल्या की त्याचा राजकीय लाभ मिळवता येतो का? याची चाचपणी होते. पण, या प्रक्रियेत समाजाचे नुकसान होते, अविश्वास वाढतो आणि संवादाचा स्तर खालावतो. माजी खासदार हुसेन दलवाई यांनी मात्र तुलनेने संतुलित भूमिका घेतली. महाराष्ट्राचा टिपूच्या इतिहासाशी थेट संबंध नसल्याने विनाकारण वाद निर्माण करू नयेत आणि आपल्या राज्यासाठी कार्य केलेल्या व्यक्तिमत्त्वांवर लक्ष केंद्रित करावे, असे त्यांचे मत समाजमाध्यमांवर सकारात्मकतेने घेतले गेले. हा अपवाद आशादायक म्हणावा लागेल.
शेवटी प्रश्न उरतो तो मानसिकतेचा. आपण इतिहासाचा अभ्यास करतो आहोत की, त्याचा वापर वर्तमानातील राजकीय लढाया पेटवण्यासाठी करतो आहोत? प्रतिमांवरून समाज पेटत असेल, तर समाजमन किती अस्थिर झाले आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. जर सीमारेषा ओलांडल्या गेल्या तर त्याला आवर कोण घालणार? प्रशासन, राजकारणी की समाज स्वतः?
टिपू सुलतानांचा फोटो लावायचा की नाही, हा मुद्दा दुय्यम आहे. प्राथमिक प्रश्न असा आहे की, विकासाच्या मूलभूत प्रश्नांवरून लक्ष हटवून भावनिक वाद निर्माण करणे हीच आपली राजकीय संस्कृती बनत चालली आहे का? जर तसे असेल, तर ही केवळ एका प्रतिमेची नाही, तर समाजाच्या प्राधान्यक्रमांची शोकांतिका मानायला हवी.