

हवामान खाते समुद्राच्या पलीकडे खवळले. कारण, यावर्षी पॅसिफिक महाराजांच्या कुशीतून दोन लहान लेकरे अल निनो आणि ला नीना पूर्वेच्या आणि पश्चिमेच्या दिशेने बागडायला चाललेत. निनो गर्रम इस्त्री घेऊन नुकताच महाराजांच्या कुशीतून वर येत पूर्वेकडे जात आहे. कारण, त्याचा शर्ट निनाने पळवला. इतर लाटांच्या गर्दीत शर्टाची घडी विस्कटू नये म्हणून निनोचा खटाटोप. नीनाचा मागोवा घेत निनो कैक महिने पूर्वेच्या दिशेने धावत आहे. तेवढ्यात महाराजांची कूस किती तापली असेल, याचा अंदाज लावणे कठीण. त्यांची उष्णता खुद्द हवामान खात्यास अचूक मोजता येईना.
अग्नेयेस प्रचंड तापमान वाढवत निनो अजून दक्षिणेतच अडकलेला. नीना पूर्वेतून पश्चिमेला असा प्रकार. यांची गाठभेट कशी, कोठे होणार देव जाणे! दरम्यान, महाराज जास्तच खवळत होते आणि निनोच्या पाठीत धपाटे देत ‘चक्रीवादळे येतात त्यादिशेने जा, नीना सापडेल; म्हणून जोराच्या लाटांनी निनोला पूर्वेस ढकलत जहाजांवरही मधून मधून महाराज रागावत, ओरडत होते. काही जहाजे अरबी समुद्रात जाऊन कोलमडली. काही हार्मुझात अडकली. इकडे पॅसिफिक महाराज निनोला दुसरा जोराचा धप्पा मारणार तेवढ्यात तापलेली इस्त्री महाराजांच्या हाताजवळ येऊन चिकटली.
महाराजांचे पाणी पाणी झाले आणि उष्ण वावटळीत निनो घाबरून पुन्हा पूर्वेस धावू लागला. नीना थंडगार वार्याच्या प्रलयात शांतपणे आईस्क्रीमचा गोळा रिचवत एक हातात निनोचा पळवलेला शर्ट उडवत (इथे शर्ट म्हणजे अल निनोचा उष्ण प्रवाह या अर्थाने) गरम प्रवाह फ्रिज करत बर्फात खेळत होती. पॅसिफिक राजे आपल्या दोन बाळांच्या लीला सहन करत लाटांना मध्येच विश्रांती देत कधी उसळत कधी तटस्थ होते. इकडे अल निनोला सरकारने (शार्कने) हात जोडले. ‘आम्ही स्थलांतर करू, जर ही तापलेली इस्त्री तुम्ही नाही ठेवली तर’ पण निनोचा लगाम महाराजांच्या हातून कधीच सुटलेला. परिस्थिती पॅसिफिक महाराजांच्या हाताबाहेर गेलेली. अखेर दोघांची भेट घडली.
निनो : माझा शर्ट दे निने. मला इथे थंडी लागतेय.
शार्क : ताई, तुम्ही आल्यामुळे गारवा पसरला. धन्यवाद!
निनो : (बातमी वाचत खोचकपणे) आताच आलेल्या सूत्रानुसार पूर्व मध्यावर चक्रीवादळं येऊन थडकली आहेत, तरी नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. हे ला निनामुळे घडले. (शार्क आणि तमाम मासे सैरावैरा)