

शशिकांत सावंत
सामान्य कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची आणि कार्याची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली जात आहे. लंडनच्या संसदेत मिळालेल्या तीन पुरस्कारांनी त्यांच्या राजकीय, सामाजिक वाटचालीला जागतिक व्यासपीठावर नवी झळाळी मिळाली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या मुशीतून तयार झालेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले लाेकमानसाने स्वीकारलेले असे नेतृत्व आहे. त्यांना लंडनमध्ये 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन', 'स्टेट्समनशिप ॲवॉर्ड' आणि 'ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र' या तीन पुरस्कारांनी गाैरवण्यात आले. यामुळे नगरसेवक ते मुख्यमंत्री व आता उपमुख्यमंत्री अशा राजकीय प्रवासातील त्यांच्या लाेकसमृद्ध कामांना झळाली मिळाली असून त्यांच्या कर्तृत्वाचा गाैरव यानिमित्ताने झाला आहे.
महाराष्ट्राच्या मातीतून तयार झालेले मराठी मनाचे नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदेंकडे महाराष्ट्र पाहताे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात लाेकनेते यशवंतराव चव्हाणांपासून मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द गाजवणारे जे काही माेजके मुख्यमंत्री आहेत, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचेही नाव आवर्जून घेतले जाते. त्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी विशेष भूमिका घेऊन राबवलेली 'लाडकी बहीण याेजना' आणि 'शासन आपल्या दारी' या उपक्रमांची आणि त्याचबराेबर गाेदावरी, कृष्णा आणि भीमेच्या परिसरातील जलसिंचनाच्या याेजनांची दखल घेऊन ब्रिटनमध्ये तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. हे पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना एकनाथ शिंदे यांनी, माझ्या ओठांवर मराठीचे प्रेम आहे आणि हृदयात अथांग देशप्रेम आहे. म्हणूनच मी एवढं काम करू शकलाे. माझी माय मराठी आहे आणि माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. या भूमीच्या उज्ज्वल यशासाठी झटणारा मी कार्यकर्ता आहे, असे म्हटले आहे. माझा जन्म साताऱ्यात झाला आणि कर्मभूमी ठाणे आहे आणि मला या सर्व गाेष्टींचा अभिमान आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
एकनाथ संभाजी शिंदे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळील दरेगाव येथे झाला. २०१५ ते २०१९ पर्यंत ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे ते २००४ पासून आमदार आहेत. २००४, २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग चार वेळा ते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रभावातून ते १९८० च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले होते. जून २०२२ मध्ये त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार असलेल्या शिवसेनेतील ४० आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर ते मुख्यमंत्रीही झाले. 'लाथ मारीन तिथे पाणी काढीन' असा त्यांचा स्वभाव आहे. लाेकमानसामध्ये आपली प्रतिमा ठसविण्यात ते यशस्वी झाले आहेत. असा राजकीय प्रवास करणारे एकनाथ शिंदे जेव्हा ब्रिटनच्या संसदेत पाेहाेचतात आणि तिथे आपले प्रभावी विचार मांडतात, तेव्हा मराठी माणसाचे मन अभिमानाने भरून येते.
सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आल्यामुळे परिस्थितीशी झगडण्याची व पुढे जाण्याची क्षमता त्यांना त्याचकाळात मिळाली. त्यांचा काेकण आणि पश्चिम महाराष्ट्राशीदेखील अधिक स्नेहबंध जाेडला गेला आहे. या सर्व भावबंधांचा विशेष उल्लेख त्यांनी लंडनच्या संसदेतील भाषणात केला. या भाषणातून जगभरातील नेत्यांच्या आवाजाने दुमदुमलेल्या ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये जय महाराष्ट्रचा निनाद घुमला. या ऐतिहासिक सभागृहात मराठी भाषेचा गजर झाला. भाषणाची सुरुवात 'नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र' अशी मराठमाेळी करत शिंदे यांनी सर्वांचीच मने जिंकली. 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'भारत माता की जय..' अशी घोषणा दिली. भाषेचा अभिमान तर त्यांनी व्यक्त केलाच; पण महाराष्ट्राच्या विकासाची कहाणीही मांडली. आई, पत्नीच्या काबाडकष्टातून सर्वसामान्यांसाठी काम करण्याची माझी विचारसरणी घडली, असे ते म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मुंबई आणि लंडन ही दोन्ही महत्त्वाची वित्तीय केंद्रे असून फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र-ब्रिटन सहकार्याला मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.
रिस्पेक्टेड बेरोनेस म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच ब्रिटनच्या संसदेत भाषणाची संधी मिळतेय हा माझ्यासाठी बहुमान असल्याचे ते म्हणाले. भाषणात त्यांनी, महाराष्ट्र सरकारने जनहितासाठी केलेल्या कामांची माहिती देत महिला सक्षमीकरण कशा पद्धतीने राज्य सरकार करत आहे आणि सर्जनशील विकासाची दिशा कशी विस्तारीत आहे, याचा लेखाजाेखा मांडला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील गेमचेंजर योजना ठरल्याची माहिती देत महाराष्ट्र हा रांगड्या, डाेंगरदऱ्यांचा, छत्रपतींच्या शाैर्याचा प्रदेश असल्याचे त्यांनी सांगितले. हे भारावून टाकणारे भाषण महाराष्ट्राच्या मनाला भिडणारे हाेते. पुरस्कारांबाबत विशेष ऋण व्यक्त करताना सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मिळालेला मान हा महाराष्ट्राच्या १२ कोटी लोकांचा सन्मान असल्याचे त्यांनी नम्रपणे नमूद केले.
एकनाथ शिंदेंनी भाषणात कवी सुरेश भटांच्या कवितेचा उल्लेख केला, 'लाभले आम्हास भाग्य जाणतो मराठी' ही कविता म्हणून दाखवत मातृभाषा मराठी आणि महाराष्ट्राची ओळख ब्रिटनच्या संसदेला करून दिली. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात केलेल्या विविध योजनांचा उल्लेख आणि जनहितासाठी या योजनांच्या माध्यमातून केलेल्या अंमलबजावणीची माहिती दिली. 'इट इज अ पीपल सेंट्रिक ॲप्रोच ऑफ टू द पब्लिक सर्व्हिस...' म्हणत एकनाथ शिदेंनी अस्खलित इंग्रजीतून केलेल्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रातील गेमचेंजर 'लाडकी बहीण योजना' ही काही चॅरिटी नाही, तर महिलांच्या सबलीकरणाची योजना बनली आहे. जागतिक स्तरावरील संस्थांकडून लाडकी बहीण योजनेची दखल घेतली गेली. शासन आपल्या दारी योजनेमुळेही लाखो लोकांचा फायदा झाला. केवळ रस्ते बांधणे म्हणजे विकास नाही, तर जनमानसाचा विकास हा खरा विकास आहे. म्हणूनच आम्ही लाेककेंद्री विकासाचे धाेरण ठेवले आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत २०४७ च्या ध्येयाचा उल्लेख करत महाराष्ट्राने विकासाची गती पडकली आहे. मुंबई आणि लंडन हे जगातील दोन मोठी आर्थिक केंद्रे असल्याने दाेघांच्या समन्वयातून नवी जागतिक आर्थिक क्रांती हाेईल, असेही ते म्हणाले.
'ग्लोबल महाराष्ट्र'ची संकल्पना
लंडन दौऱ्याचा सर्वात मोठा दीर्घकालीन परिणाम कदाचित पुरस्कारांपेक्षा वेगळा असू शकतो. ती म्हणजे, 'ग्लोबल महाराष्ट्र'ची उभारणी. महाराष्ट्राबाहेर राहणारे मराठी उद्योजक, व्यावसायिक, साहित्यिक, संशोधक आणि तरुण यांना महाराष्ट्राशी जोडण्याची संधी या माध्यमातून निर्माण होते. पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये आयोजित करण्याची घोषणा केली आहे. मराठी समाज, उद्योजक आणि संस्कृतीला जागतिक व्यासपीठावर एकत्र आणण्याचा उद्देश यामागे मांडण्यात आला. ही घोषणा केवळ साहित्य संमेलनापुरती पाहणे योग्य ठरणार नाही. ती जागतिक मराठी नेटवर्क उभारण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणूनही पाहता येते.