

एका मंदिरात एक भक्त मुलांच्या भवितव्याची चिंता करत देवाला साकडे घालतो. आता कोणताही देव आठवला तरी चालेल. मंदिर सोडून यत्रतत्र सर्वत्र देव समजू..!
भक्त : अरेरे! काय रे हे दिवस दाखवले पोट्ट्यांनी. नाचतात काय! आंदोलन काय करतात. आमच्यावेळी पण होत्या चळवळी, आंदोलनं! देवा पाव रे बाबा. माझं पोरगं पण त्या चळवळीत आहे रे. सोडव यातून. मागण्या मान्य कर रे त्यांच्या आणि माझी पण एक मागणी आहे.
देव : तथास्तु! पण, त्याआधी एक सांग नेमकं काय मागणं आहे तुझं माझ्याकडे? नाही म्हटलं आधी विचारलेलं बरं. मागणी मान्य केली तरी समाधान नसतं तुमचं.
भक्त : माझं पोर हाताबाहेर गेले. या चळवळीत नुसता राडा घातला बघा त्यानं. पोलिसांनी काठी उगारली तरी गप्प बसणा. म्हणतंय धूर पण आणा जाऊ दे डोळ्यांत. पाणी हल्ला केला, तर हे सगळ्या पोरांना घेऊन पावसात भिजल्यागत भिजत नाचत होतं. निमोनिया व्हायचा.
देव : भक्ता? तुझी काळजी नेमकी कोणती ते कळूदे आम्हाला. आजारी पडू नये म्हणून चिंतीत आहेस का?
भक्त : नाही हो. चळवळीत गेला म्हणून. पण, त्यातून बाकीची चिंता उद्भवत आहे. आता तर भुताची लागण झाल्यासारखं बोलतो तो. त्याचा अर्थबोध होईना. कालपासून शब्दकोश चाळतोय.
देव : बाकीची चिंता नसावी. मुलांना चळवळीचा आनंद घेऊदे. पंत, संत सगळ्यांची करमणूक होत आहे. होऊदे.
भक्त : देवा तुम्ही तर मला अजून काळजीत टाकले. अहो, मी तुम्हाला साकडं घालतोय तुम्ही वाकडं नका करू. यातून बरेच कार्यकर्ते, नेते सुखावत आहेत.
देव : सुखावू देत. तेवढं तरी सुख पदरी पडू दे त्यांच्या! बरं अजून काही चिंता?
भक्त : तुम्ही यातून तारा आम्हाला. एवढीच इच्छा आहे. आणि ते पोराची लागण तेवढी काढा देवा. वेड्यासारखं बोलतोय. रीळ केली लोकांनी त्याची.
देव : नेमकं काय भक्ता?
भक्त : वस्तेगुणहुंया.. असं सारखं विचारत फिरतो हो.
देव : वस्ते गुणहुंया? त्यांना असं म्हणायचंय दे टाळी..!
भक्त : ओह! हाय फाय? देवा तुम्ही खरंच सगळे समजता. जे आम्हाला कळलं नाही ते तुम्ही समजावून सांगितलं. खरंच पोरं गुणाची आहेत हो. एवढ्या कठीण परिस्थितीत पण टाळ्या देतात. म्हणजे ते आनंदी आहेत. बरोबर आहे तुमचं. वस्तेगुणहुंया..! असंच सांभाळून घ्या देवा लेकरांना! येतो..!