

विनिता शाह
पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने आणखी एका छोट्या पाहुण्याला आपल्या कक्षेत ओढले आहे. अवघ्या दोन मीटर व्यासाचा हा ‘मिनीमून’ नेमका कुठून आला, किती काळ पृथ्वीभोवती राहणार याविषयी...
रात्रीच्या आकाशात दिसणाऱ्या चंद्राचे मानवाला पूर्वापार आकर्षण आहे. मात्र, आपल्याला परिचित असणाऱ्या या चंद्राशिवाय सध्या आणखी एक छोटा चंद्र पृथ्वीभोवती भ्रमण करत आहे. अवकाशातून प्रवास करणाऱ्या एका छोट्या लघुग्रहाला पृथ्वीने आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने खेचून घेतले आहे. खगोलशास्त्रज्ञांनी या लघुग्रहाला ‘2026 क्यूक्यू 8’ असे नाव दिले आहे. जवळपास २ मीटर व्यासाचा हा लघुग्रह म्हणजे अवकाशात फिरणारा मोठा दगडच आहे. त्याला खगोलशास्त्राच्या भाषेत ‘मिनीमून’ म्हणजेच छोटा चंद्र असे म्हटले जाते.
हंगेरीचे खगोलशास्त्रज्ञ क्रिस्तियान सार्नेझ्की यांनी ऑगस्ट 2026 मध्ये सर्वप्रथम या लघुग्रहाचे निरीक्षण केले. त्यानंतर त्याच्या भ्रमणमार्गाचा अभ्यास करण्यात आला. सुरुवातीला हा लघुग्रह आहे की अंतराळ मोहिमेदरम्यान अवकाशात राहिलेला एखादा कृत्रिम वस्तूचा तुकडा आहे, याबाबत शास्त्रज्ञांमध्ये संभ्रम होता. मात्र, शक्तिशाली दुर्बिणींच्या सहाय्याने केलेल्या निरीक्षणांमधून ही नैसर्गिक खगोलीय वस्तू असल्याचे स्पष्ट झाले. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेच्या मायनर प्लॅनेट सेंटरने २९ ऑक्टोबर रोजी यासंबंधी अधिकृत माहिती प्रसिद्ध केली. हा छोटा चंद्र एप्रिलपासून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली असल्याचे संशोधकांना आढळले आहे.
आपल्या सौरमालेत लाखो लहान-मोठे लघुग्रह सूर्याभोवती भ्रमण करत असतात. यांपैकी काही लघुग्रह भ्रमणादरम्यान पृथ्वीच्या जवळून जातात. पृथ्वीच्या जवळ येताना एखाद्या लघुग्रहाचा वेग आणि दिशा अनुकूल असल्यास पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे तो तात्पुरता तिच्याभोवती फिरू लागतो. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणाचा एकत्रित परिणाम अशा लघुग्रहांच्या भ्रमणमार्गावर होत असतो. हे लघुग्रह कायमस्वरूपी पृथ्वीभोवती फिरत नाहीत. कालांतराने त्यांच्या भ्रमणमार्गात आणि वेगात बदल होतो. त्यामुळे ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावातून मुक्त होतात आणि पुन्हा सूर्याभोवती भ्रमण करू लागतात. सध्या पृथ्वीला मिळालेला छोटा चंद्रही जानेवारी २०२७ पर्यंत पृथ्वीपासून दूर जाण्याची शक्यता आहे. या नव्या चंद्राला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३५९ दिवस लागतात. साधारण दर १० वर्षांनी तो पृथ्वीच्या जवळ येतो. मात्र, या लघुग्रहापासून पृथ्वीला कोणताही धोका नसल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. भविष्यात तो पृथ्वीच्या वातावरणात शिरला, तरी त्याचा बहुतांश भाग वातावरणातच जळून जाण्याची शक्यता आहे.
२०२४ मध्ये ‘2024 पीटी 5’ नावाचा लघुग्रह काही काळ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली होता. एका संशोधनानुसार हा लघुग्रह आपल्या मूळ चंद्राचाच तुकडा असण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार पृथ्वीभोवती जवळपास नेहमीच एखादा छोटा तात्पुरता चंद्र भ्रमण करत असण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांचा आकार आणि त्यांच्याकडून परावर्तीत होणाऱ्या प्रकाशाचे अत्यल्प प्रमाण यांमुळे त्यांचा शोध घेणे कठीण असते. येणाऱ्या काळात या छोट्या चंद्रांचा अभ्यास करून सौरमालेच्या निर्मितीसंबंधी अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. त्यांच्यामध्ये कोणती खनिजे आहेत, त्यांची रासायनिक रचना कशी आहे, ते नेमके कोठून आले, याचा शोध शास्त्रज्ञ घेऊ शकतात.
चिलीमधील व्हेरा सी. रुबिन सारख्या अत्याधुनिक वेधशाळांमुळे येत्या काळात अशा अनेक छोट्या चंद्रांचा शोध लागण्याची अपेक्षा आहे. भविष्यात या छोट्या चंद्रांवर अंतराळयान पाठवून तेथील खडकांचे नमुने पृथ्वीवर आणण्याचे प्रयोगही करता येऊ शकतील. अवकाशातील दूरवरच्या लघुग्रहांपर्यंत पोहोचण्याच्या तुलनेत पृथ्वीच्या जवळ आलेल्या अशा खगोलीय वस्तूंचा अभ्यास करणे काही मोहिमांसाठी अधिक सोयीचे ठरू शकते. अवकाश संशोधनाच्या दृष्टीने हे छोटे पाहुणे त्यामुळेच विशेष महत्त्वाचे आहेत.