

सुनील कुलकर्णी, अध्यात्म अभ्यासक
दसरा हा सण मानवी आशा-आकांक्षांना पंख देणारा सीमोल्लंघनाचा मंगल क्षण आहे. आश्विन शुद्ध दशमीचा हा सुवर्णमुहूर्त स्वतःमधील रावणरूपी, महिषासुररूपी कुप्रवृत्तींचा अंत करून, दुर्गुणांवर विवेकाचा विजय मिळवत एका नव्या, उदात्त जीवनप्रवासाचे सीमोल्लंघन करण्याचे चिरंतन आवाहन करणारा आहे.
नवरात्राचे नऊ दिवस सरले की आश्विन शुद्ध दशमीला देशभरात ‘दसरा’ अर्थात ‘विजयादशमी’ साजरी केली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस कुठल्याही चांगल्या, नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवसाचे महत्त्व सांगणारे अनेक दाखले पुराणातील कथांमध्ये सापडतात. याच दिवशी श्रीरामचंद्रांनी लंकापती रावणाचा वध करून सीतामातेला त्याच्या जोखडातून मुक्त केले होते. त्याचे स्मरण म्हणून आजही गावोगावच्या मैदानावर रावणाचे पुतळे जाळून विजयोत्सव साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तीचा नाश आणि सत्प्रवृत्तीचा विजय म्हणून हे प्रतीकात्मक दहन केले जाते.
महाभारतात पांडवांनी १२ वर्षे वनवास व १ वर्षे अज्ञातवास संपवून आपली लपवलेली शस्त्रास्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीतून परत काढली होती. या क्षत्रीय वीरांना आपली शस्त्रास्त्रे परत देऊन विजयाचे रणशिंगच जणू या वृक्षाने फुंकले होते. त्यामुळे दसऱ्यादिवशी शमी वृक्षाचे महत्त्व अधिक मानले जाते. दैवत भावाने या वृक्षाची पूजा केली जाते. शमी शमयाते पापम् शमी लोकहितकांतका| धरिण्यार्जुनगणानाम् रामस्य् प्रियवंदिनी॥ क्रिशमान्यत्रया यथाकाल सचम्या| तारा निर्विघ्नकर्ती त्वाम् भव् श्रीरामपुजीते॥ अर्थात, शमी वृक्ष हा वाईट प्रवृत्ती स्वच्छ करतो. त्याचे काटे लालसर रंगाचे असतात आणि प्रभू रामचंद्रांचा हा आवडता वृक्ष आहे. याच झाडावर पांडवांनी त्यांची शस्त्रे लपवली होती. हे शमी प्रभू रामचंद्रांनी तुझी पूजा केली. मी आता माझ्या विजय प्रवासाला सुरुवात करत आहे. तू माझा मार्ग आनंददायी आणि संकटमुक्त करशील, असा विश्वास वाटतो; अशा प्रकारे शमी वृक्षाला या दिवशी प्रार्थना केली जाते.
दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात. यासंदर्भात वरतंतू ऋषी, त्यांचा शिष्य कौरस आणि रघुराजा यांची कथा पुराणात आहे. प्राचीन काळी वरतंतु ऋषींच्या गुरुकुलात कौत्स नावाचा एक अत्यंत हुशार, नम्र आणि सेवाभावी शिष्य विद्याभ्यास करत होता. कौत्साने चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे संपूर्ण ज्ञान अतिशय निष्ठेने संपादन केले. गुरुकुल सोडताना कौत्साने कृतज्ञतापूर्वक गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन गुरुदक्षिणेविषयी विचारणा केली. शिष्याची निष्कलंक भक्ती आणि विद्याग्रहण क्षमता पाहून ऋषींनी कौत्साला स्पष्ट सांगितले की, तुझी खरी सेवा, नम्रता आणि विद्या संपादन हीच माझी दक्षिणा आहे, त्यामुळे मला कोणत्याही धनाचा किंवा भेटवस्तूचा लोभ नाही. मात्र, कौत्साचा गुरुदक्षिणा देण्याचा आग्रह कायम राहिला. वारंवार विनवणी केल्यामुळे शेवटी वरतंतु ऋषींनी शिष्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी सांगितले की, जर तुला दक्षिणा द्यायचीच असेल, तर तू शिकलेल्या चौदा विद्यांच्या बदल्यात प्रत्येकी एक कोटी या हिशेबाने चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणून दे. एवढी अवाढव्य रक्कम ऐकून कौत्स विचलित झाला, तरीही गुरूंना दिलेले वचन पूर्ण करण्याचा त्याचा निर्धार अढळ होता. त्या काळात अयोध्येच्या सिंहासनावर प्रभू रामचंद्रांचे पूर्वज आणि सूर्यवंशातील महापराक्रमी व दानशूर चक्रवर्ती रघुराजा राज्य करत होते. कौत्स थेट रघुराजाच्या दरबारात पोहोचला. योगायोगाने त्याच सुमारास रघुराजाने विश्वजित यज्ञ पूर्ण केला होता. या यज्ञाच्या नियमानुसार राजाने आपले संपूर्ण राजकोष आणि सर्व संपत्ती दान केली होती. राजा स्वतः मातीच्या भांड्यातून अतिथींचे स्वागत करत होता. दारात आलेल्या एका ब्रह्मचारी शिष्याची गरज ओळखून राजाने त्याला रिकाम्या हाताने परत न पाठवण्याचा निर्णय घेतला. चौदा कोटी सुवर्णमुद्रांची व्यवस्था करण्यासाठी रघुराजाने स्वर्गाधिपती आणि धनाची देवता असलेल्या कुबेरावर स्वारी करण्याची तयारी सुरू केली. रघुराजाचा निग्रह, धर्मनिष्ठा आणि सामर्थ्य ओळखून कुबेराने युद्ध टाळण्यासाठी अयोध्येच्या सीमेवर आपट्याच्या आणि शमीच्या वृक्षांवर एका रात्रीत चौदा कोटींपेक्षा अधिक सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडला.
दुसऱ्या दिवशी सकाळी नगराबाहेर सुवर्णमुद्रांचा ढीग साचला होता. रघुराजाने कौत्साला पाचारण करून त्या घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र, कौत्साची निःस्पृहता एवढी उच्च कोटीची होती की त्याने केवळ चौदा कोटी सुवर्णमुद्रा स्वीकारल्या. राजानेही एकदा दान दिलेले द्रव्य स्वतःच्या तिजोरीत परत घेण्यास नकार दिला. शेवटी उरलेले सर्व सोने अयोध्येतील प्रजाजनांना लुटण्यास सांगितले. प्रजाजनांनी आनंदाने ते सोने गोळा केले आणि एकमेकांना वाटून आनंदोत्सव साजरा केला. ज्या दिवशी हा प्रसंग घडला, तो दिवस आश्विन शुद्ध दशमीचा म्हणजेच विजयादशमीचा (दसरा) होता. या दातृत्वाचे, गुरुनिष्ठेचे आणि तृप्ततेचे प्रतीक म्हणून आजही दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोनं म्हणून देण्याची प्रथा अखंड सुरू आहे. या दिवशी ‘अश्मांतक महावृक्ष् महादोषनिवारणम्| इस्तना दर्शनम् देही कुरू शत्रूविनाशनम्॥’ असे म्हणत आपट्याच्या वृक्षाची पूजा केली जाते. विजयादशमीचा दिवस दुर्गामातेचा विजयोत्सव म्हणूनही साजरा केला जातो. नऊ दिवस अखंडपणे शुंभ-निशुंभ, रक्तबीज, महिषासुर आदी राक्षसांना मारून तिने त्रिलोकाला भयमुक्त केले. या नऊ दिवसांच्या युद्धाची सांगता म्हणून ‘विजयादशमी’ साजरी केली जाते. विजयादशमीपासून कोजागरी पौर्णिमेपर्यंत देवी विश्रांती घेते, असेही मानले जाते.
दसरा हा दिवस सर्वार्थाने यशाचा व विजयाचा दिवस मानला जातो. म्हणून या दिवशी आपण घरात मंगल तोरण लावतो. यंत्र सामग्रीची पूजा करतो. ‘यांच्या सहाय्यानेच मला पुढच्या यशासाठी मार्गक्रमण करायचे आहे. त्यामुळे यांची साथ लाभू दे.’ असा एक कृतज्ञभाव या पूजेमधून व्यक्त होतो. विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघनाचीही परंपरा आहे. पूर्वी राजे-महाराजे या दिवसाचा मुहूर्त साधून लढाईसाठी कूच करत आणि आपली सीमा ओलांडत. आज पूर्वीसारखी प्रत्यक्ष युद्धे नाहीत. मात्र मनातील षड्रिपूरूपी कुप्रवृत्तींचा प्रभाव वाढलेला दिसतो. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर यांमुळे अनाचार वाढतो. यापासून दूर राहण्यासाठी विचारांचे सीमोलंघन गरजेचे आहे. दसऱ्यानिमित्ताने मनातील द्वेषाची, शत्रुत्वाची, क्रोधाची किलमिषे दूर सारत सद्गुणांची, स्नेहाची, बंधुत्वाची, आपलेपणाची, समाधानाची भावना वाढीस लावू या.
रावण दहनातूनही हाच संदेश दिला जातो. दुष्ट, वाईट प्रवृत्तींचे निर्दालन. रावण बलाढ्य होता. त्याने समस्त देवांना, ग्रहांना आपल्या मुठीत ठेवले. भगवान शंकरांना त्याने प्रसन्न केले होते; पण कालांतराने मिळवलेल्या सर्व शक्तींचा त्याला अहंकार जडला. त्याची नीतिमत्ता भ्रष्ट झाली. तो ऋषीमुनींना त्रास देऊ लागला. अहंकाराच्या धुंदीने त्याची विवेकबुद्धीही चेतनाहीन झाली. त्याने सीतामाईला बंदी बनवले. प्रभू श्रीरामचंद्रांना या अहंकाराने उन्मत्त झालेल्या रावणाचा नाश करावाच लागला. वाईट शक्तींवर सदाचाराने, नीतीने विजय मिळवता येतो, याचं हे मूर्तिमंत उदाहरण प्रभू रामचंद्रांनी अखिल विश्वासमोर ठेवले आहे. आपल्यातील चांगल्या शक्तींवर विश्वास ठेवून त्यानुसार वर्तन-व्यवहार असतील तर यशप्राप्ती दुर्लभ नाही, हाच संदेश विजयादशमी देते.