

सुरेश गुदले
नशेखोरी आणि गुन्हेगारीमुळे सांगलीची दररोज बदनामी होत आहे. विधानसभेत, संसदेत सांगलीची ही काळीकुट्ट ओळख पुन्हा, पुन्हा चर्चेत येत आहे.
एकेकाळी सहकार आणि कृषी आधारित अर्थव्यवस्था तसेच वजनदार राजकीय नेतृत्वामुळे सांगलीची राज्यभर ओळख होती. ही ओळख हा सांगलीकरांचा अभिमान होता. काळाच्या ओघात आणि पुलाखालूनच नव्हे, तर पुलावरूनही इतके पाणी वाहिले की, सांगलीची ही अभिमानास्पद ओळख होऊन बसली ‘एक भूतकाळ’. सध्या जी ओळख गाजते आहे ती भयंकरच आहे. अमली पदार्थांची (ड्रग्ज) निर्मिती, साठा आणि वितरण करणारी नगरी म्हणजे सांगली अशी नवी ओळख. इतकेच नव्हे, तर नशेखोरी, त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी, गुन्हेगारी टोळ्यांची दहशत, दिवसाढवळ्या पडणारे मुडदे यांसारख्या घटना आता दैनंदिन झालेल्या आहेत. नशेखोरी आणि गुन्हेगारी वर्तुळातील अल्पवयीन मुलांचा सहभाग सामाजिक आरोग्याविषयी चिंता वाढवणारा आहे.
सांगलीतील नशेखोरी, गुन्हेगारीविषयी लोकप्रतिनिधींनीही विधानसभेत, संसदेत आवाज उठवला. जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकावर बैठका झाल्या. टास्क फोर्स स्थापन झाले. करडी नजर ठेवू, कठोर कारवाई करू यांसारख्या वल्गना झाल्या. या प्रयत्नांना कमी लेखण्याचे कारण नाही; परंतु वास्तव तसूभरही बदलले नाही. परिणामकारक कृती केल्याशिवाय प्रशासनाचा किमान धाकही निर्माण नाही होणार, हे सांगण्याची गरज का पडावी?
आजी-माजी लोकप्रतिनिधींनी पोलिसांवर टीकेची झोड उठवली. एका लोकप्रतिनिधीने पोलिस यंत्रणेतील उतरंड सांगत कोणाला किती मलिदा दिला जातो आणि दोन नंबरचे धंदे सुरू राहतात, याचा जाहीर पाढाच वाचला. सत्ताधारी आमदारानेच नशेखोरी, गुन्हेगारीविरोधात रस्त्यावर उतरणार, असा इशारा दिला. कोल्हापूर जिल्ह्यात दोन-तीन ठिकाणांहून जुगाराचा बोर्याबिस्तर गुंडाळावा लागल्यानंतर एका महाभागाने जत तालुक्यात कॅसिनोसारखा जुगार सुरू केला. त्यासाठी मलिदा दिला, अमूक-तमूक सुरू करतोय म्हणून आणि सुरू केले अनेक भलतेच उद्योग. खरे तर, सांगली शहरात कोठे, कोठे नशेखोरांचे सुमारे तीसवर ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत, याची सचित्र बितंबात माध्यमांनी अनेक वेळा जाहीर करूनही पोलिस कारवाई का करत नाहीत? सोमवारी (30 मार्च) ‘ब्लॅक स्पॉट’ मध्येच पाठलाग करून सराईत गुंडाचा खून केला. सोमवारी एकाच दिवशी सांगली शहरासह जिल्ह्यात तीन खून झाले.
सांगली महापालिका क्षेत्रातील कुपवाड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर कोट्यवधींच्या अमली पदार्थांचा साठा सापडला. इरळी (ता. कवठेमहांकाळ) तसेच विटा (ता. खानापूर) येथेही कोट्यवधीचे अमली पदार्थ जप्त केले. पुणे, मुंबई पोलिसांमुळे गुन्हेगारांचा हा उद्योग उघडकीस आला. लागलीच कराडजवळ अमली पदार्थांवर मोठी कारवाई झाली. प्रश्न पडतो की, मग सांगली पोलीस काय करत होते? दुसरे असे की, या कारवाईनंतर पुढे काय झाले? अल्पवयीन मुले नशेखोरीत, गुन्हेगारीत अडकत आहेत. अगदी बारा-तेरा वर्षांची मुले या दुष्टचक्रात अडकल्याचे उघड झाले आहे. दारू, गांजा, अफू आदी अमली पदार्थ सहज उपलब्ध होतातच कसे? पन्नास रुपये दिले की, गांजाची पुडी, नशेची गोळी मिळते, जी सामाजिक आरोग्याला चूड लावते. गुन्हेगार, काही नोकरशहा आणि काही राजकारणी यांच्या अभद्र आणि ‘अर्थ’पूर्ण युतीशिवाय नशाजगत इतके हातपाय पसरणे शक्य नाही, हे सामान्य माणूस पण सांगेल.
ज्याचे करोडो रुपये उंदीर खायचे असे सांगितले जाते, तो जगातील सर्वात कुविख्यात ड्रग्ज माफिया पाब्लो एस्कोबार. जिल्ह्यातील अशा बड्या मछलींना-पाब्लो एस्कोबारला पोलीस कधी पकडणार? ज्यांना पकडले म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेण्याची घाई पोलीस करतात, ते फारच किरकोळ असतात. अमली पदार्थांच्या कोट्यवधीच्या व्यवहारांची साखळीही तितकीच प्रभावशाली, शक्तिशाली आहे. ही साखळी तोडू, असा साधा विश्वासही यंत्रणा, सांप्रतकाळ देत नाही. तूर्त इतकेच!