

आजूबाजूला असंख्य गुन्हेगारी स्वरूपाच्या, अतिरेकी हल्ल्यांच्या घटना कानावर पडत असताना चांगल्या गोष्टींची दखल घेतली पाहिजे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचे आपण नागरिक आहोत, याचा अभिमान वाटला पाहिजे. राष्ट्रीय पातळीवर होणार्या प्रत्येक बदलांमध्ये महाराष्ट्र हा सर्वात पुढे असतो, हे नेहमी दिसून आले आहे. थोर कृषीशास्त्रज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांनी हरित क्रांतीची संकल्पना बोलून दाखवली तेव्हा सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्याने स्वागत केले होते. हरित क्रांती यशस्वी होऊन मुबलक प्रमाणात धान्य उपलब्ध झाले आणि आज आपला बळीराजा मोठ्या प्रमाणावर धान्याचे उत्पादन घेत आहे. यानंतर आली धवल क्रांती. याचा अर्थ प्रचंड प्रमाणात दूध उत्पादन करणे होय.
यानंतर आता येऊ घातली आहे ड्रोन क्रांती. ड्रोन हे छोटेसे विमानासारखे उपकरण असून त्याद्वारे कमीत कमी वेळेत दुर्गम भागात पोहोचणे शक्य आहे. फारसे मनुष्यबळ न वापरता ड्रोनचा वापर करून शेतामध्ये फवारणी करण्याचे तंत्र राज्यामध्ये हळूहळू रुळत आहे. ड्रोनमुळे हे काम दहापट जलद व कमी खर्चात होते असे दिसून आले आहे. उदाहरणार्थ, एक एकरात कीटकनाशक फवारणीसाठी सध्या दीड ते दोन हजार रुपये खर्च येतो. हेच काम ड्रोनने फक्त तीनशे ते चारशे रुपयांत करता येते म्हणजेच 75 टक्के बचत होते.
आजकाल लग्न समारंभामध्ये ड्रोन कॅमेराचा वापर सर्रास केला जात आहे. आपण मंडपामध्ये अक्षता टाकण्यासाठी सज्ज असतो आणि त्याचवेळी ड्रोन कॅमेरा तुमच्या डोक्यावरून फिरत इकडे-तिकडे द़ृश्य टिपण्यासाठी फिरत असतो. सध्या बाजारात व्हिडीओ शूटिंग करणार्या अडीचशे ग्रॅम ड्रोनपासून ते दीडशे किलो वजनाचे ड्रोन उपलब्ध आहेत. हॉटेलमधून मागवलेले पदार्थ ड्रोनच्या साह्याने कुठलाही रहदारीचा अडथळा न येता ग्राहकाच्या घरापर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे. जिथे कुठे जमिनीचे सर्वेक्षण किंवा भूमी अधिग्रहण करायचे आहे, त्या प्रत्येक ठिकाणी ड्रोनचा वापर करता येणे शक्य आहे.
ड्रोनच्या मदतीने अवैध मासेमारीवर लक्ष ठेवता येईल. रस्त्याचे बांधकाम करायचे असेल, तर आधी सर्वेक्षण करावे लागते. सध्या रस्ता बांधकाम सर्वेसाठी प्रतिकिलोमीटर अडीच हजार रुपये खर्च होतो. ड्रोन वापरामुळे हा खर्च पंधराशे रुपयांपर्यंत येईल म्हणजेच चाळीस टक्के बचत होईल. गुजरात, गोवा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर ड्रोनचा वापर सुरू आहे. आता ड्रोनचा वापर आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणावर होईल. तंत्रज्ञानाचा वापर केला, तर खर्च आटोक्यात आणता येतो आणि कमी वेळात काम करता येते, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात येऊ घातलेल्या ड्रोन क्रांतीचे आपण स्वागत केले पाहिजे.