

डॉ. दिलीप उरकुडे
इराणच्या डोंगररांगांमध्ये अडकलेल्या जखमी अमेरिकन एअरमनच्या बचाव मोहिमेची कथा थरारक आहे. वेळ, तंत्रज्ञान आणि धैर्य यांची खरी परीक्षा या मोहिमेत झाली. एका सैनिकाला वाचवण्यासाठी संपूर्ण महासत्ता कार्यरत झाली होती.
इराणच्या उंच, उघड्या आणि निर्मनुष्य डोंगररांगांमध्ये संध्याकाळ सावकाश उतरू लागली होती. आकाशात एक विचित्र शांतता होती; पण जमिनीवर तणाव दाटून आला होता. दगडांच्या आड, श्वास रोखून एक अमेरिकन एअरमन लपून बसला होता. कपड्यांवर रक्ताचे डाग. हाताला जखम. शरीर थकले होते; पण मन हार मानायला तयार नव्हते. त्याच्या हातात एक छोटे उपकरण होते - ‘सीएसईएल’ बीकन. त्या उपकरणातून त्याचे अस्तित्व अंतराळातील उपग्रहांना कळत होते. आकाशात अमेरिकेची विमाने फिरत होती आणि खाली इराणी शोधपथक त्याचा माग काढत होते. ही केवळ बचाव मोहीम नव्हती - ही वेळेशी, भीतीशी आणि नियतीशी चाललेली शर्यत होती.
क्षणभरात घडलेल्या एका घटनेने सगळे बदलले होते. अमेरिकेचे अत्याधुनिक एफ-15 ई स्ट्राईक ईगल लढाऊ विमान इराणने पाडले. विमानात एक पायलट होता आणि दुसरा वेपन्स सिस्टीम ऑफिसर (डब्ल्यूएसओ). दोघांनी इजेक्शन करून जीव वाचवला; पण ते वेगवेगळ्या ठिकाणी उतरले. पहिला पायलट काही तासांतच वाचवण्यात आला; पण दुसरा एअरमनच्या खर्या अर्थाने जीवावर बेतले होते. तो एकटा शत्रूच्या भूमीत अडकला होता. हा दुसरा एअरमन साधा सह-पायलट नव्हता. ‘डब्ल्यूएसओ’ म्हणजे विमानातील सर्वात संवेदनशील आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान हाताळणारा अधिकारी -रडार, टार्गेटिंग सिस्टीम्स, शस्त्र नियंत्रण. एका अर्थाने, तो संवेदनशील लष्करी माहितीचा जिवंत स्रोत होता. जर तो शत्रूच्या हातात पडला असता, तर फक्त एक सैनिक नाही, तर अमेरिकेच्या लष्करी क्षमतेचा एक महत्त्वाचा भाग शत्रूच्या हाती गेला असता.
तो जखमी अवस्थेत इराणच्या डोंगराळ प्रदेशात उतरला. खडकाळ डोंगर चढून एका कपारीत त्याने आश्रय घेतला आणि स्वतःच्या जखमांवर प्राथमिक उपचार केले. काही क्षणांसाठी शत्रू फक्त काहीशे मीटर अंतरावर होता. श्वासही मोठ्याने घ्यायची भीती वाटत होती. पहाट जवळ येत होती. ही केवळ धैर्याची गोष्ट नव्हती. ही प्रशिक्षणाची शक्ती होती. अमेरिकन पायलटस्ना दिले जाणारे ‘एसईआरई’ (सर्व्हायव्हल, इव्हेजन, रेसिस्टन्स, एस्केप) प्रशिक्षण अशाच क्षणांसाठी असते. जखमी अवस्थेतही योग्य निर्णय घेण्याची त्याची क्षमता ही त्याच्या मानसिक ताकदीची साक्ष होती.
त्याने सुरू केलेले ‘सीएसईएल’ (कॉम्बॅट सर्व्हायव्हर इव्हेडर लोकेटर) बीकन हे त्याचे आणि त्याच्या देशाचे दुवा बनले होते. हे उपकरण साधे जीपीएस नव्हते, तर ते एन्क्रिप्टेड सिग्नल पाठवत होते. जे शत्रूला समजणे कठीण होते. उपग्रह, ड्रोन आणि कमांड सेंटर यांच्यामध्ये सतत संपर्क ठेवत, हे बीकन त्याचे अचूक स्थान अमेरिकेला कळवत होते. आधुनिक युद्धात तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा हा संगम निर्णायक ठरतो. एआय असिस्टेड विश्लेषणाच्या आधारे शत्रूच्या हालचालींचा अंदाज घेत, बचाव पथकासाठी सर्वात सुरक्षित मार्ग निश्चित करण्यात आला. हजारो डेटा पॉईंटस् काही क्षणात विश्लेषित होत होते आणि त्यावर निर्णय घेतले जात होते. या सगळ्याच्या मागे एक अद़ृश्य खेळ सुरू होता अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा. त्यांनी एक डीसेप्शन ऑपरेशन सुरू केले. चुकीची माहिती पसरवली गेली. एअरमन आधीच वाचवला गेला आहे. इराणी सैन्याचे लक्ष दुसरीकडे वळवले गेले. ही गोळीबाराची लढाई नव्हती. ही माहितीच्या युद्धातली निर्णायक चाल होती. सायऑप्स - सायकॉलॉजिकल ऑपरेशन्सचा हा उत्कृष्ट नमुना होता.
अमेरिकेने या मोहिमेला नाव दिले - ‘नो फेल मिशन.’ चूक होण्याचा प्रश्नच नव्हता. 150 पेक्षा जास्त विमाने, हेलिकॉप्टर्स, ड्रोन, टँकर्स या सर्वांची एक भव्य यंत्रणा कार्यरत झाली. ए-10 सारख्या विमानांनी जमिनीवर संरक्षण दिले. स्पेशल फोर्सेसना सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी सतत हवाई नजर ठेवली जात होती. काही ठिकाणी, संवेदनशील उपकरणे शत्रूच्या हाती लागू नयेत म्हणून अमेरिकेने स्वतःच ती नष्ट केली. ही मोहीम अपयशी ठरली असती, तर केवळ एक नाही तर अनेक सैनिक शत्रूच्या हाती गेले असते. शेवटी, अंधाराच्या आड स्पेशल फोर्सेस त्या डोंगराळ भागात पोहोचल्या. काही ठिकाणी त्यांनी अत्यंत शांतपणे, शत्रूच्या नजरेआड स्टिल्थ पद्धतीने प्रवेश केला. प्रत्येक सेकंद मोजूनमापून वापरला जात होता. शत्रू काही अंतरावर होता. वेळ कमी होती आणि मग तो क्षण आला. जखमी एअरमनला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. हेलिकॉप्टर आकाशात झेपावले. काही क्षण शांतता होती आणि मग एक संदेश संपूर्ण जगभर पोहोचला.
यशस्वी बचावाची घोषणा करण्यात आली. या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते; पण हा विजय समजण्यासाठी, इतिहासाकडे पाहणे आवश्यक आहे. 1979 मध्ये घडलेली ‘इराण होस्टेज क्रायसिस’ ही घटना अजूनही अमेरिकेच्या निर्णयांवर सावली टाकते. तेहरानमधील अमेरिकन दूतावासावर हल्ला झाला आणि 52 नागरिकांना तब्बल 444 दिवस कैदेत ठेवण्यात आले. त्या काळात अमेरिका वाट पाहत राहिली. प्रत्येक दिवस तणावाचा, अपमानाचा आणि असहायतेचा होता.
आजच्या घटनेत फरक स्पष्ट दिसतो. 1979 मध्ये अमेरिका वाट पाहत होती. 2026 मध्ये अमेरिका वाट पाहत नाही. ती येते. जर हा एअरमन पकडला गेला असता, तर तो केवळ एक कैदी राहिला नसता. त्याचा वापर प्रचारासाठी झाला असता. त्याचे व्हिडीओ प्रसारित झाले असते. त्याच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाला असता. आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये तो एक बार्गेनिंग चिप बनला असता. एका माणसाचे रूपांतर एका राजकीय हत्यारात झाले असते. 1979 च्या संकटानंतरही अनेकवेळा परकीय नागरिकांचा वापर राजकीय दबावासाठी करण्यात आला आहे. ही होस्टेज डिप्लोमसी केवळ एक रणनीती नाही, तर ते एक दीर्घकालीन धोरण आहे. म्हणूनच, या बचाव मोहिमेचे महत्त्व केवळ एका सैनिकाच्या जीवापुरते मर्यादित नाही. हा एक संदेश आहे. आधुनिक युद्धात एक सैनिक म्हणजे एक राष्ट्र. त्याचे अस्तित्व, त्याची सुरक्षितता हे सगळे राष्ट्रीय सन्मानाशी जोडलेले आहे. त्या जखमी जवानाने एक छोटेसे बीकन चालू ठेवले आणि त्या सिग्नलने एका महासत्तेला हालचाल करायला भाग पाडले. कधी कधी, एका माणसामागे संपूर्ण राष्ट्र उभे असते आणि त्या राष्ट्रामागे उभा असतो त्याचा इतिहास.