Indian abroad success | डॉ. क्यू मणिवन्नन

Indian abroad success |
Indian abroad success | डॉ. क्यू मणिवन्नन
Published on
Updated on

युवराज इंगवले

तामिळनाडूमधून स्कॉटलंडमध्ये शिक्षणासाठी गेलेले आणि आता स्कॉटिश संसदेत निवडून आलेले डॉ. क्यू मणिवन्नन हे सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरले आहेत. अवघ्या काही वर्षांपूर्वी विद्यार्थी व्हिसावर स्कॉटलंडमध्ये दाखल झालेल्या या भारतीय संशोधकाने राजकारणात प्रवेश करून इतिहास रचला. ते स्वतःला ट्रान्सजेंडर आणि नॉनबायनरी व्यक्ती म्हणून ओळखतात आणि विविधता, सामाजिक न्याय, स्थलांतरितांचे हक्क आणि एलजीबीटीक्यू समुदायाच्या प्रतिनिधित्वासाठी आवाज उठवत असतात. डॉ. मणिवन्नन यांचा जन्म आणि बालपण तामिळनाडूमध्ये गेले.

बालपणापासूनच त्यांना सामाजिक प्रश्न, संस्कृती आणि राजकारणामध्ये विशेष रुची होती. त्यांनी पुढे उच्च शिक्षण घेतले आणि नंतर 2021 मध्ये स्कॉटलंडमधील सेंट अँड्र्यूज विद्यापीठात ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयात पीएच.डी. करण्यासाठी प्रवेश घेतला. शिक्षणासोबतच त्यांनी सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. डॉ. मणिवन्नन हे केवळ संशोधक नाहीत, तर ते कवी, मानववंशशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जातात. स्थलांतर, लैंगिक ओळख, समलैंगिक हक्क, वांशिक समानता आणि सामाजिक न्याय यांसारख्या विषयांवर त्यांनी अनेकदा सार्वजनिक व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या विचारांमध्ये समावेशकता आणि मानवतेचा द़ृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येतो. त्यांनी स्कॉटिश ग्रीन्स पक्षातून निवडणूक लढवली. एडिनबर्ग आणि लोथियन्स ईस्ट या प्रादेशिक मतदारसंघातून त्यांची स्कॉटिश संसदेसाठी निवड झाली. त्यांच्या विजयाने केवळ भारतीय समुदायालाच नव्हे, तर जगभरातील स्थलांतरित समुदायालाही प्रेरणा मिळाली आहे.

विद्यार्थी व्हिसावर आलेल्या भारतीय संशोधकाने स्कॉटलंडच्या संसदेत स्थान मिळवणे ही मोठी ऐतिहासिक घटना मानली जाते. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मणिवन्नन यांनी समर्थकांना संबोधित करताना भावनिक भाषण केले. त्यांनी सांगितले, ‘मी एक ट्रान्सजेंडर तमिळ स्थलांतरित आहे. काही लोकांसाठी मी त्या सर्व गोष्टींचे प्रतीक आहे, ज्यांचा ते तिरस्कार करतात; पण आज मी तुमचा प्रतिनिधी म्हणून येथे उभा आहे. मणिवन्नन यांच्या निवडीवर काही स्थलांतरविरोधी संघटनांनी टीकाही केली. विदेशी नागरिकांना निवडणूक लढवण्याचा अधिकार देणार्‍या स्कॉटलंडच्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले; मात्र स्कॉटिश ग्रीन्स पक्षाने मणिवन्नन यांच्या समर्थनार्थ ठाम भूमिका घेतली. पक्षाच्या सहनेत्या गिलियन मॅके यांनी स्पष्ट केले की, पक्ष त्यांना सर्वप्रकारचे सहकार्य करेल.

डॉ. मणिवन्नन यांचा प्रवास हा संघर्ष, आत्मविश्वास आणि सामाजिक बदल यांचे प्रतीक आहे. त्यांनी दाखवून दिले की, ओळख, लिंग किंवा राष्ट्रीयत्व यापेक्षा क्षमता आणि विचार महत्त्वाचे असतात. आज ते केवळ स्कॉटिश संसद सदस्य नाहीत, तर जगभरातील दुर्लक्षित आणि उपेक्षित लोकांसाठी आशेचे प्रतीक बनले आहेत. काळजी आणि समावेशकतेवर आधारित राजकारण हे त्या सर्व लोकांसाठी नव्या शक्यता निर्माण करते जे मागे पडले, समाजातून बाहेर ढकलले गेले किंवा ज्यांना कधीच आमंत्रित केले नाही, असे ते सातत्याने सांगत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news