

शिक्षण, राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणारे माजी मंत्री व भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज (5 सप्टेंबर) डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, मोहनराव कदम नगर वांगी (ता. कडेगाव, जि. सांगली) येथे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते होत आहे. त्या निमित्ताने...
माणूस कर्तृत्वान असला तरी नियती क्रूर असते, याचा अनुभव कदम कुटुंबीयांनी डॉ. पतंगराव कदम यांच्याबाबतीत घेतला. ते गेल्यापासून असा एकही क्षण नाही की, ज्या क्षणाला त्यांची आठवण झाली नाही. इतके आमचे भावविश्व त्यांनी व्यापून टाकले होते. त्यांचे नसणे किती क्लेशदायक आहे, हे अनुभवले. एखादा वडीलधारा वृक्ष उन्मळून पडावा आणि सावलीच नाहीशी व्हावी, असा अनुभव सर्वांनी घेतला आहे. पतंगराव कदम यांचे असणे हीच एक प्रचंड ऊर्जा होती. त्यांनी केवळ संस्था उभ्या केल्या नाहीत. त्यांनी माणसे उभी केली. त्यांच्या मनात सकारात्मक कार्याचे बीज पेरले. ते अंकुरण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले. प्रत्येकाला कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी दिली. माणसांना प्रोत्साहन दिले. त्यातून भारती विद्यापीठाचा अवाढव्य वाटावा असा प्रचंड विस्तार झाला.
कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते यांचा समाजकारणाचा वारसा समर्थपणे पुढे चालवत पतंगराव कदम यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रांत भरीव योगदान दिले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा कृतिशील वारसा त्यांनी पुढे चालविला. पतंगराव कदम यांनी बिकट आर्थिक परिस्थितीमुळे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेतून ‘कमवा व शिका’ या योजनेतून आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्यांचा ‘भारती विद्यापीठ’ स्थापन करण्यामागचा हेतू मुळात गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावा, हा होता कारण शिक्षणाशिवाय समाज प्रबोधन व समाज सुधारणा होणार नाही, म्हणूनच शिक्षणाची समाजाला गरज आहे व समाज सुधारणेचा हा एकमेव मार्ग आहे, हा त्यांचा ठाम विश्वास होता म्हणून कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली.
पतंगराव कदम यांनी 1964 मध्ये भारती विद्यापीठाची स्थापना करतानाच ते युनिव्हर्सिटी होईल, हे स्वप्न पाहिले होते. भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम हे भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीचे प्रथम कुलपती झाले. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून देशाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नतीत योगदान देताना त्यांनी पलूस-कडेगाव मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकला. स्वातंत्र्यानंतर विविधतेत एकता, हे या देशाचे वैशिष्ट्य जपत सर्वसमावेशक विकासाचे स्वप्न सत्यात उतरविणारे माजी पंतप्रधान पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या व काँग्रेस पक्षाच्या विचारांशी सदैव एकनिष्ठ राहिलेल्या पतंगराव कदम यांनी पक्षाची विचारधारा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आयुष्यभर जीवाचे रान केले. केवळ मतदार संघाचा विकास हेच उद्दिष्ट्य डोळ्यासमोर न ठेवता, त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहिले. महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री, सहकार, पुनर्वसन व महसूल मंत्री, उद्योग व जलसिंचन मंत्री, वनमंत्री म्हणून त्यांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. या खात्यांच्या मंत्रिपदावर त्यांच्या कर्तृत्वाची ठसठशीत नाममुद्रा उमटलेली आहे. जनसामान्यांच्या कळीच्या प्रश्नांना दिलेले प्राधान्य, तत्काळ निर्णय, तातडीने आणि काटेकोर केलेली अंमलबजावणी व त्यातून गरजूंना मिळालेला दिलासा, या त्यांच्या कार्यशैलीविषयी त्यावेळीही अनेकांनी गौरवोद्गार काढले गेले. आजही काढले जातात. त्यांच्या कामामुळे ग्रामीण भागातील माणसांचे जगणे सुसह्य केले. महाराष्ट्राच्या विकासात लोकनेता म्हणून त्यांनी मोलाचे योगदान दिले. पतंगराव कदम यांनी फार मोठी स्वप्ने पाहिली; मात्र त्यांनी आपली नाळ ग्रामीण जीवनाशी जोडून ठेवली.
मातीतल्या सामान्य माणसांना त्यामुळेच ते समजून घेऊ शकले. त्याला आधार देऊ शकले. हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण आहे. निसर्गाची अवकृपा असलेला पलूस-कडेगाव हा दुष्काळी भाग. या भागाचे पतंगराव कदम यांनी कष्टाने विकास कामांच्या माध्यमातून नंदनवन केले. समृद्धीचा प्रकाश आणला. या परिसरात उद्योग निर्माण केले. त्यातून रोजगारनिर्मिती झाली. सामान्य कुटुंबातली मुले स्वतःच्या पायावर उभी राहिली. साखर कारखाने, सूत गिरण्या, बँका, पतसंस्था यांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण अर्थकारण मजबूत केले. पतंगराव कदम यांनी राजकारण फार थोडे केले. आयुष्यभर केले ते समाजकारणच! समाजातला पिचलेला, नडलेला, अडलेला, गरजू माणूस त्यांना नेहमीच महत्त्वाचा वाटला. अशा माणसाचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी ते जीवाचे रान करायचे.
अशा माणसांच्या फायली घेऊन ते स्वत: मंत्रालयात अधिकार्यांकडे जायचे. मंत्री आले म्हणून अधिकारीही झटकन काम करायचे. त्या कामाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात यायचे. त्यांना सामान्य जनतेच्या अंत:करणात मायेचे आणि प्रेमाचे स्थान होते. त्यांची ही आपुलकीने वागण्याची रीत म्हणूनच ते लोकनेता होऊ शकले. त्यांनी शून्यातून विश्व उभे केले. त्यांचे जीवन हाच एक प्रेरणादायी ग्रंथ आहे. आज ते आपल्यात नाहीत; पण त्यांनी उभा केलेला कामाचा डोंगर आपल्यासमोर आहे. त्यांची कार्यपद्धती आणि विचार आपल्याजवळ आहेत. अखंड कार्यमग्नता आणि प्रचंड सकारात्मकता हा पतंगराव कदम यांचा गुणविशेष होता. या बळावर त्यांनी सगळी स्वप्ने सत्यात उतरवली. त्यांच्या उर्वरित स्वप्नांची पूर्तता करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. याचे भान ठेवून अखंड कार्यरत राहणे, हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.
(लेखक भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे, कुलपती आहेत.)