

प्रत्येकाच्या जीवनात चिरसमृद्धीचा राजमार्ग पुस्तक वाचनाच्या वाटेने जातो. पुस्तके हे जीवन परिवर्तनाचे साथी आहेत. पुस्तकांनी जगाला अनेक चांगली माणसे दिली आहेत. त्यात महात्मा गांधी, महात्मा फुले, विवेकानंद, अब्राहम लिंकन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी अनेक माणसे आहेत. त्यांनी जगाला दिशा दिली. त्यांच्या मागे लाखो लोक चालत आली, याचे कारण त्यांची मने पुस्तकाच्या सहवासाने घडली होती. डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने-
भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा होतो आहे. वाचन माणसांच्या आयुष्यात काय करू शकते, याचे प्रतिबिंब कलामांच्या समग्र आयुष्यात प्रतिबिंबित झालेले अनुभवास येते. पुस्तकांनी मस्तके घडवली तर माणसं किती निरपेक्षतेने जगू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. कलाम. जीवनभर पुस्तकांसोबत जगताना स्वतःची विवेकी वाट चालण्याचा निर्धार वर्तमानात सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरणार आहे. हाती पुस्तके आली की, माणसांचे जीवन बदलू शकते, यावर जगातील विचारवंतांचा विश्वास आहे. अनेकांना ती वाट सापडली. ज्यांच्या हाती पुस्तके दिसतील, त्यांची मस्तके अधिक उत्तमतेने घडली जातात. जो समाज पुस्तकांच्या सोबतीने चालतो, ते राष्ट्र अधिक प्रगतीच्या दिशेने प्रवास करते. आज पुस्तके हाती देणारे पालक हरवले आहेत. बालकांच्या आयुष्यातून पुस्तके हरवली आहेत. त्यामुळे माणसांची वैचारिक उंची खुजी होत चालली आहे. आपल्याला समृद्ध समाज हवा असेल, तर मुलांच्या हाती उत्तम खेळणी, मोबाईल, संगणक देण्याबरोबर चांगली पुस्तके देण्यासाठी पालकांनी आग्रही असायला हवे. पुस्तके वाचनाने कदाचित मुलांचे मार्क कमी होतील; पण मुलांच्या ‘गुणां’चे मात्र संवर्धन झालेले अनुभवास येईल.
माणसाला माणूस म्हणून घडविणे हेच खरे शिक्षण असते. ते पुस्तकांशिवाय पुढे जाणे शक्य नाही. आजच्या वाचन प्रेरणादिनी त्या वाटेच्या प्रवासाचा संकल्प करायला हवा; अन्यथा केवळ उत्सवापुरते या दिवसाचे स्मरण परिवर्तन करू शकणार नाही. जगाच्या पाठीवर ज्यांनी इतिहासाच्या पानावर आपले नाव कोरले आहे, अशा अनेक महापुरुषांच्या आयुष्यातील परिवर्तन पुस्तकांनी केले आहे. महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांसारख्या अनेकांचे आयुष्य हे केवळ पुस्तकांनी बदलवले आहे. अॅरिस्टॉटल यांनी म्हटले होते की, माझ्या आयुष्यातील माझ्या केवळ तीनच गरजा आहेत. त्या म्हणजे पुस्तकं, पुस्तकं आणि पुस्तकं. हे पुस्तकांचे मोल आहे. त्यांना पुस्तकांमुळे जीवनाची वाट सापडली, ती वाट आपल्याही पाल्याला सापडू शकते. आज पालक मुलांच्या गुणवर्धनापेक्षा मार्कवाढीवर आग्रही दिसतात; पण मार्क मिळवण्याच्या नादात आपण मुलांच्या भविष्याकडेच दुर्लक्ष करत आहोत हे लक्षात घेणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. पुस्तके केवळ माहिती देत नाहीत, तर जीवनाची प्रकाशमय वाट दाखवत असतात. ग्रीक तत्त्वज्ञानात म्हटले आहे की, ग्रंथालये ही आमची औषधालये आहेत. हा विचार अगदीच खरा आहे. माणसांची मने निर्मळ ठेवण्याचे काम पुस्तकेच करत असतात. पुस्तकांच्या वाचनातून आनंद मिळत असतो. पुस्तकांनी जीवनातील द्वेष, मत्सर, राग कमी होत जातो. निर्मळता उंचावत जाते. माणसांच्या जीवनाचे मोल लक्षात आणून देण्यास मदत होते. मनं निर्मळ झाली की, मन आणि शरीरावरील ताणतणाव कमी होत जातो.
वाचनाने शब्दसंपत्ती प्राप्त होते. वादविवादाची शक्ती मिळते. तसेच केव्हा वाद घालायचा आणि केव्हा संवाद करायचा, याचा विवेक वाचनातून विकसित होतो. विवेक व शहाणपण वाचनातून मिळत असेल तर तेच पूर्णत्व आहे. वाचनातून माणसांच्या जीवनाला आकार मिळण्यास सुरुवात होत असते. वाचनाने द़ृष्टिकोन निर्माण होतो. व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे काम वाचनामुळे घडते. त्याचवेळी लेखन कौशल्याचा विचारही त्यातून गतिमान होतो. वाचन असल्याशिवाय लेखनाचा समग्र प्रवास घडत नाही. त्यामुळे लेखनाचा विचार पुढे न्यायचा असेल तर पुस्तक वाचनाला पर्याय नाही.