

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना ‘टेस्ला’चे मालक एलॉन मस्क यांनी भरघोस मदत केली. सत्तेवर येताच, ट्रम्प यांनी मस्क यांची प्रशासनात वरिष्ठ सल्लागार म्हणून नेमणूक केली. सरकारी खर्चात कपात करण्यासाठी ‘सरकारी कार्यक्षमता खाते’ निर्माण केले गेले. मस्क यांनी तत्काळ 2 लाख 60 हजार कर्मचार्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि खर्चाला कात्री लावली; पण अमेरिकेत पुढील वर्षी सिनेट व प्रतिनिधीगृहाच्या मध्यावधी निवडणुका असून, हा निर्णय अंमलात आणल्यास भारी पडेल, असे वाटल्यामुळे प्रशासनाने वेगळा विचार केला. सरकारने नवे कर व खर्च विधेयक आणले असून, या विधेयकात विद्युत वाहनांना मिळणारी सवलत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मस्क प्रचंड संतापले आहेत. वास्तविक, मस्क यांना सरकारी कार्यक्षमता विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी दिल्यामुळेच अमेरिकन जनता चिडलेली होती. मस्क यांनी अलीकडेच पदाचा राजीनामा दिला, तेव्हा झालेल्या त्यांच्या निरोप समारंभाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. त्यावेळी ट्रम्प यांनी मस्क यांची वारेमाप स्तुती केली; पण सरकारच्या नव्या कर व खर्च विधेयकावर मस्क यांनी ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर ‘घृणास्पद कृत्य’ असा हल्लाबोल केला आहे. आपले हे विधेयक खूप सुंदर आहे, अशी आत्मस्तुती ट्रम्प यांनी केली होती.
उलट या विधेयकाच्या बाजूने ज्यांनी मतदान केले, त्यांना आता लाज वाटत असेल, अशी टीका मस्क यांनी केली आहे. उलट माझे आणि मस्क यांच्यातील नाते खूप चांगले होते; पण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याच्या कायद्यात सवलतीच्या कपातीबद्दल बोललो, तेव्हा त्यांना ते रुचले नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तर हे विधेयक मला न दाखवता, रात्रीच्या अंधारात लवकर मंजूर केल्याचा दावा मस्क यांनी केला आहे. उलट इलेक्ट्रिक वाहनांच्या सक्तीला विरोध केला आहे. सर्वांनाच ते इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास भाग पाडत होते. आता ते पूर्ण वेडे झाले आहेत. देशाचे अब्जावधी डॉलर वाचवण्याचा सहजमार्ग म्हणजे, ‘टेस्ला’ची अनुदाने रद्द करणे होय, असे ट्रम्प यांनी बेधडकपणे म्हटले आहे. या दोघांत एका बैठकीत खडाजंगी झाली. त्यानंतर मस्क यांनी ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदावरूनच हटवण्याची गर्जना केली असून, ‘अमेरिकन पार्टी’ नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत.
रशियाने मस्क यांना राजकीय आश्रय देण्याचे सूतोवाच करत आगीत तेल ओतले आहे. वास्तविक, जेव्हा तुम्ही एखाद्या उद्योगपतीला थेट सरकारमध्येच महत्त्वाच्या पदावर घेता, तेव्हा हितसंबंधांचा संघर्ष तयार होतो. तो अमेरिकेत झाला आहे. माझ्याशिवाय ट्रम्प निवडणूक हरले असते, अशी टीका करत, मस्क यांनी त्यांना ‘कृतघ्न’ असे संबोधले. त्यानंतर ‘टेस्ला’ला मिळणारे सर्व सरकारी ठेके रद्द करण्याची धमकी त्यांनी दिली असून, त्यामुळे मस्कही अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी ‘स्पेसएक्स’चे ‘ड्रॅगन स्पेसक्राफ्ट’ बंद करू, असा इशारा दिला आहे. ड्रॅगन हे सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतराळवीर पाठवण्यास सक्षम असलेले एकमेव अमेरिकी अंतराळयान आहे; पण या धमकीला काही तास उलटत नाहीत, तोच मस्क यांनी हा निर्णय मागे घेतला. चीनवर प्रचंड आयातशुल्क लादण्याचा ‘टेस्ला’ला फायदा होणार होता. मात्र, नंतर हे आयातशुल्क कमी केल्यावर चिनी इलेक्ट्रिक मोटारींशी स्पर्धा करावी लागेल, म्हणून मस्क परत नाराज झाले. थोडक्यात, ट्रम्प यांच्याशी मैत्री करून, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर प्रभुत्व मिळवणे, त्यांचा हेतू होता. दोघांच्यातील भांडण केवळ व्यक्तिगत नाही, तर त्यामागे अनेक शक्ती परस्परांच्या विरोधात उभ्या आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, याचा काही नेम नसतो. सत्तेवर आल्या आल्या त्यांनी विविध देशांतून येणार्या मालावर करांची करवत चालवण्याचा निर्णय जाहीर केला. रशियासोबत चर्चा करा, अन्यथा भारी किंमत मोजावी लागेल, असा दम युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांना त्यांनी दिला. गाझापट्टीत शस्त्रसंधी व्हावी, अशी मागणी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात ठरावाद्वारे करण्यात आली. तेव्हा अमेरिकेने त्याबाबत नकाराधिकार वापरला. ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठातील विदेशी विद्यार्थ्यांचा प्रवेश रोखण्यासाठीच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. अनेक विद्यापीठांनी ट्रम्प यांच्या दबावापुढे झुकत धोरणे बदलली असली, तरी हार्वर्ड विद्यापीठाने नमते घेण्यास नकार दिल्याने खवळलेल्या ट्रम्प यांनी जाणीवपूर्वकच हा निर्णय घेतला. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी आता आफ्रिका आणि पश्चिम आशियातील 12 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी घातली आहे. तसेच अन्य सात देशांच्या नागरिकांना प्रवेश प्रतिबंधित केले. या देशांमध्ये अफगाणिस्तान, म्यानमार, इराण वगैरे आशियाई देश असून, त्यात उत्तर कोरिया व पाकिस्तानचा समावेश नाही, हे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल.
इराणशी अणुकरार करण्यासाठी अमेरिकेने वाटाघाटींचा मार्गही अवलंबला. असे असताना, इराणी नागरिकांना अमेरिकेचे दरवाजे बंद केले गेले. या विक्षिप्तपणाबद्दल त्यांच्यावर टीका होते आहे. अमेरिकेला अद्दल घडवण्याची धमकी देणार्या उत्तर कोरियातील नागरिकांना मात्र अमेरिकेत मुक्त प्रवेश आहे! ट्रम्प यांच्या वागण्यात व धोरणात तर्कशुद्ध विचार, विवेक आणि संयमाचा पूर्ण अभाव दिसून येतो. रिपब्लिकन पक्ष उजव्या आणि भांडवलवादी विचारांचा असला, तरी ट्रम्प यांनी त्याला जहाल आणि संकुचित अर्थविचाराकडे नेले आहे. अलीकडेच त्यांनी ‘अॅपल’ने भारतात आयफोनचे उत्पादन करू नये, यासाठी कंपनीचे प्रमुख टीम कुक यांच्यावर दबाव आणला. मात्र, कुक यांनी तो मानणार नसल्याचे म्हटल्यावर, देशात वापरात येणारे आयफोन अमेरिकेतच बनले पाहिजेत, अशी अट घातली. ट्रम्प-मस्क जोडीने अमेरिकेलाच नव्हे, तर जगालाच आर्थिक धक्के द्यायला सुरुवात केल्याने, त्यांना आवरणार कोण आणि कसे, हा प्रश्नच आहे! अमेरिकी जनतेलाच काय ते ठरवावे लागेल.