New Global core group | ट्रम्प यांचा नवा डाव...

New Global core group
New Global core group | ट्रम्प यांचा नवा डाव... File Photo
Published on
Updated on

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

आगामी वर्षाच्या पहिल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका एक नवा कोअर गट तयार करण्याच्या विचारात आहे, अशी घोषणा केली. या गटामध्ये त्यांनी अमेरिका, रशिया, चीन, भारत आणि जपान या पाच राष्ट्रांचा समावेश केला आहे. त्यांनी मोठ्या खुबीदारपणे या गटातून अनेक बड्या युरोपीय राष्ट्रांना वगळले आहे. या निर्णयाने जगाला बुचकळ्यात टाकले आहे. ट्रम्प यांचे अर्थकारण हे ‘अमेरिकन सेल्फ’ या तत्त्वावर आधारले आहे. अमेरिकेचा बदलता द़ृष्टिकोन या नव्या राजकीय समीकरणात दिसून येतो. या गटातील सर्व पाच देश आर्थिकद़ृष्ट्या समृद्ध आहेत. ट्रम्प त्यांच्याशी मैत्री करून आपला व्यापारवृद्धीचा हेतू साध्य करणार आहेत. टॅरिफ धोरणानंतर अमेरिकेची जी बदनामी झाली, ती धुवून काढण्याचा हा प्रयत्न आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मोठे चतुर राजकारणी आहेत. राजकारणात कोणते डाव केव्हा टाकावयाचे आणि कोणती नवी समीकरणे मांडावयाची, हे त्यांना चांगले जमते. विशेषतः अशी समीकरणे मांडताना ते योग्य वेळ साधतात आणि जगाला धक्का देतात. त्यांच्या या धक्कातंत्राचा प्रत्यय नुकताच आला आहे. आगामी वर्षाच्या पहिल्या आठवड्यात अमेरिका एक नवा कोअर गट तयार करण्याच्या विचारात आहे, अशी घोषणा त्यांनी केली. या कोअर गटामध्ये त्यांनी अमेरिका, रशिया, चीन, भारत आणि जपान या पाच राष्ट्रांचा समावेश केला आहे. त्यांनी मोठ्या खुबीदारपणे या गटातून अनेक बड्या युरोपीय राष्ट्रांना वगळले आहे. प्रश्न असा पडतो की, नवा सी-5 हा गट जी-7 ची जागा घेईल का आणि जर खरोखरच स्थापन झाला, तर हा गट इतर अनेक छोट्या गटांत बलशाली ठरेल काय, असे अनेक प्रश्न उभे राहतात. त्यामुळे ट्रम्प यांच्या या नव्या योजनेचे, नव्या राजकीय समीकरणाचे काय परिणाम होतील, याची चर्चा सध्या सुरू आहे. या पाचही देशांपैकी भारत, रशिया, चीन हे युरेशियाचे भाग आहेत. प्रचंड लोकसंख्या, बलशाली लष्कर व संरक्षण तसेच आर्थिक प्रभुत्वामुळे हे देश बलशाली ठरले आहेत. राजकीय व्यवस्था भिन्न आहे. लोकशाहीची प्रकृती वेगळी आहे. तथापि, ही आंधळ्या भोपळ्याची मोट बांधून ट्रम्प यांना आपले हितसंबंध राखावयाचे आहेत.

ट्रम्प यांच्या या नव्या राजकीय समीकरणामागे कोणता डाव आहे, त्याचा गर्भित हेतू काय आहे आणि ट्रम्प यांच्या या नव्या खेळीमुळे जगाच्या राजकारणावर काय परिणाम होतील, यापेक्षाही त्यांचा अंतःस्थ हेतू काय आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. युक्रेनचा प्रश्न असो की जगातील अनेक आर्थिक प्रश्न असोत, अमेरिकेच्या राजकारणाला अलीकडे युरोपियन युनियन सदस्य राष्ट्रे पूर्वीसारखे सहकार्य करत नाहीत. त्यांची चाल बर्‍याच वेळा बदलली आहे, असे दिसते. त्यामुळे या नव्या सी-5 गटामध्ये एकाही युरोपियन देशाला घेतलेले नाही. एका अर्थाने ट्रम्प यांनी युरोपीय देशांना दिलेली ही चपराक म्हटली पाहिजे. ट्रम्प यांना एका दगडात दोन पक्षी मारावयाचे आहेत. एक म्हणजे त्यांना नाटो व युरोपियन युनियनचे महत्त्व कमी करावयाचे आहे. ट्रम्प यांचे अर्थकारण हे ‘अमेरिकन सेल्फ’ या तत्त्वावर आधारले आहे. अमेरिकेचा बदलता द़ृष्टिकोन ट्रम्प यांच्या नव्या राजकीय समीकरणात दिसून येतो. या गटातील सर्व पाच देश आर्थिकद़ृष्ट्या समृद्ध आहेत. ट्रम्प त्यांच्याशी मैत्री करून आपला व्यापार वृद्धीचा हेतू साध्य करणार आहेत.

टॅरिफ धोरणानंतर अमेरिकेची जी बदनामी झाली, ती धुवून काढण्याचा हा प्रयत्न आहे. या समीकरणामुळे नव्या बहुध—ुवी जगात अमेरिकेचा डॉलर त्यांना मजबूत करावयाचा आहे. अमेरिकेच्या विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्याच्या प्रयत्नातील हे एक भावी धाडसी पाऊल असेल. आशियाच्या राजकारणाकडे बघण्याचा अमेरिकेचा द़ृष्टिकोन बदलत आहे काय, असा प्रश्न पडतो. कारण, त्यांनी आपल्या संभाव्य सी-5 गटामध्ये आशियाच्या तीन देशांचा समावेश केला आहे. भारत जपानला मागे टाकून आर्थिक महासत्ता म्हणून पुढे सरसावत आहे आणि चीनला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. अशावेळी ट्रम्प आता भारताकडे नव्या सकारात्मक द़ृष्टीने पाहत आहेत. बदलत्या जगात भारताचे महत्त्व त्यांनी लक्षात घेतले आहे. चिनी ड्रॅगन झोपेतून जागा झाला आहे आणि आता तो सारे जग हादरवून टाकत आहे. चीन वगळता आशियात भारत आणि जपान या दोन मोठ्या शक्ती आहेत, हे ट्रम्प यांना कळले आहे. नव्या जगावर आपली एकपक्षीय हुकूमत प्रस्थापित होणे शक्य नाही, हे कटू सत्य ट्रम्प यांना कळले आहे. त्यामुळे ते ‘फोडा आणि झोडा’ या तंत्राचा वापर करून आशियातील तीन महासत्तांना प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न करत आहेत .

आशिया खंडामध्ये केवळ भारत आणि जपान या दोनच देशांना ट्रम्प यांनी आपल्या नव्या गटात स्थान दिले आहे. आशियातील इतर राष्ट्रांकडे दुर्लक्ष करून ट्रम्प यांनी काय साधले आहे? त्यांना अमेरिकेशी स्पर्धा करणारा चीन जवळचा वाटतो. अमेरिकेचे माजी अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी ज्याप्रमाणे रशियाशी मैत्री करून, प्रेमसंबंध प्रस्थापित करून नकळतपणे रशियाला अडचणीत आणले. त्याचप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प चिनी ड्रॅगनशी मैत्री करून आणि त्याला प्रेमाने व स्नेहाने ते नाचवीत आहेत. चीनशी व्यापार युद्ध झाले. आता पुढे राजकीय युद्ध खेळताना डोनाल्ड ट्रम्प गोल्फचा खेळ करत आहेत. त्यांना चीनला दूर लोटायचे नाही आणि फारसे जवळही घ्यावयाचे नाही. मोठ्या चतुराईने चीनला कसे लहान करता येईल, हा त्यांचा डाव आहे. ट्रम्प यांच्या सी-5 गटांमध्ये भारताचा अग्रभागी समावेश ही बाब महत्त्वाची आहे. भारताने बि—क्स व क्वाड, एससीओ, जी-7 तसेच जी-20 इत्यादी व्यासपीठांवर बजावलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे आता अमेरिकेला भारतास आदराचे स्थान देण्यापासून दुसरा पर्याय नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात गेल्या दहा वर्षांत भारताने आर्थिक लष्करी आणि कृषी उद्योग, शिक्षण, संशोधन, आरोग्य, सुरक्षा इत्यादी क्षेत्रांत बजावलेल्या स्पृहणीय ऐतिहासिक कामगिरीचा हा गौरव आहे. एकाच वेळी चीन, अमेरिका आणि रशिया या देशांशी भारत मुत्सद्दीपूर्ण संबंध ठेवू शकतो, ही गोष्ट जगाने पाहिली आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या लक्षात आले आहे की, भारताला उणे करून अमेरिका नव्या जगात आपले स्थान भक्कम करू शकत नाही. हीच गोष्ट ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादण्यापूर्वी लक्षात घेतली असती, तर बरे झाले असते, तसेच एकीकडे भारताशी मैत्री आणि दुसरीकडे पाकिस्तानशी जवळीक अशी दुटप्पी चाल करून ट्रम्प अडचणीत येत आहेत. खुद्द अमेरिकेमध्ये त्यांच्या या वाढत्या कोलांटउड्यामुळे जनमत त्यांच्या विरोधात जात आहे आणि रिपब्लिकन पक्षाची लोकप्रियता घसरत आहे. ती सावरण्यासाठीसुद्धा ट्रम्प यांना नवी खेळी करावी लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news