

बाप्पांच्या आगमनाची तयारी चालू झाली तशी डॉल्बीला कोडं पडलं. यंदा आपण उपयोगात येणार की नाही? ढोल-ताशे ऊर बडवत डॉल्बीकडे गेले. यंदा आमच्यावर थाप पडणार नाही. कोणी ताईताप्रमाणे गळ्यात अडकवून मिरवणुकीत मिरवणार की नाही. हा प्रश्न घेऊन डॉल्बीला ढोल म्हणतो...
ढोल : यंदा आपलं काही खरं नाही. जिकडे तिकडे आपल्यावर बंदीची कानावर थाप पडत आहे.
डॉल्बी : थाप नाही ती. खरी बातमी आहे.
डॉल्बी : अगं बाई तसं नव्हतं म्हणायचं मला. थाप म्हणजे आमच्यावर थाप नाही पडणार. धूळ खात पडणार आम्ही कोपऱ्यात.
डॉल्बी : धूळ तरी पडेल किमान तुमच्यावर. आमचा तर नामोनिशाण मिटणार आहे.
ढोल : असं कसं? कार्यकर्ते तुला जोशात मिरवतील. लोक ताल धरतील गाण्यांवर. गाणी म्हणणारे डॉल्बीशिवाय करणार काय? ते ही उठून बसतील; पण आमचे काय?
डॉल्बी : तुम्ही परंपरेत मोडता. आम्ही हल्ली हल्ली धुमाकूळ घातलाय. कधी पोलिस अधिकारी, कधी पक्षप्रतोद वादात अडकवतात आम्हाला. आम्ही कुठे वाजवायचे आमचे वाद्य?
ढोल : खाद्यक्षेत्रात नेते, अधिकारी सगळ्यांचे ढोल वाजवत आहेत. एवढाच आमचा शाब्दिक उपयोग होतोय. सणासुदीला आम्हाला खुंटीला टांगून ठेवणार बहुतेक कार्यकर्ते.
डॉल्बी : ते तरी काय करणार म्हणा. बिचाऱ्यांना कोण मनावर घेणार. ते आपल्यासाठी लढतील आणि नियमात राहतील. आपण फक्त रीळमध्ये स्वतःला पाहायचे यंदा. तेवढीच विश्रांतीही होईल बाप्पा.
ढोल : तेही खरंय. यंदा रीळमध्ये आपण दिसू. कोणी आपल्याला उपस्थित करोत अगर नाही करोत, आपण रीळ स्टारच्या रीळमध्ये धुमाकूळ घालू घराघरांत. वर्क फ्रॉम होम. काय म्हणता?
डॉल्बी : ‘वर्क फ्रॉम होम’ ही कल्पनाच भारी आहे. लोकं आपापले होम थिएटर आणि साऊंड सिस्टीमवर आपल्याला अनुभवतील. तेवढेच पुरे यंदा. आपल्यालाही जरा विश्रांती हवीच की. बंदी घालणारे पण आपल्यासाठीच नियम बनवत आहेत, असे समजायचे.
ढोल : डबल ढोलकी सारखे विचार करणे सोपे आहे; पण मी ढोल आहे. कुठेतरी वाजूनच मी शांत बसावे. असा आमचा खाक्या. तुम्ही सध्या थोडं बंदच राहा, देशाला शांततेची गरज पण आहे.