

बुडापेस्ट : माणूस बोलताना शब्दांमध्ये स्पष्ट अंतर नसते. तरीही आपण सलग बोलण्यातून प्रत्येक शब्द सहज ओळखतो. अशीच काहीशी क्षमता कुत्र्यांमध्येही असल्याचे नव्या संशोधनातून समोर आले आहे. माणसांच्या बोलण्यातील आवाजांची रचना आणि त्यांची लय कुत्र्यांचा मेंदू ओळखू शकतो. विशेष म्हणजे, स्वरांपेक्षा व्यंजनांच्या आधारे तयार होणारे शब्द कुत्र्यांना अधिक सहज ओळखता येतात.
हंगेरीतील एटव्हॉश लॉरँड विद्यापीठाच्या संशोधकांनी हा अभ्यास केला. त्यात २० माणसे आणि २० पाळीव कुत्र्यांच्या मेंदूतील हालचालींची तुलना करण्यात आली. दोघांनाही सलग बोललेली भाषा ऐकवून त्यांच्या मेंदूची प्रतिक्रिया तपासण्यात आली.
बोलण्यातून शब्द कसे ओळखतात?
आपण एखादी व्यक्ती बोलताना ऐकतो, तेव्हा प्रत्येक शब्दानंतर थांबा (दोन शब्दांमध्ये थांबणे) असेलच असे नाही. उदाहरणार्थ, एखादे वाक्य सलग ऐकूनही आपल्याला त्यातील शब्द वेगळे समजतात. कुत्र्यांच्या मेंदूतही अशाच प्रकारे शब्दांची रचना ओळखण्याची प्रक्रिया होत असल्याचे प्रयोगातून दिसले. संशोधकांनी कुत्रे आणि माणसांना वेगवेगळ्या प्रकारे तयार केलेले सलग आवाज ऐकवले. काही आवाजांमध्ये व्यंजनांची ठरावीक पुनरावृत्ती होती, तर काहींमध्ये स्वरांची. काही आवाजांमध्ये कोणतीही ठरावीक रचना नव्हती. यावेळी कुत्र्यांच्या मेंदूत होणारे बदल एका विशेष उपकरणाच्या मदतीने नोंदवण्यात आले. व्यंजनांवर आधारित आवाज ऐकताना कुत्र्यांच्या मेंदूची हालचाल त्या शब्दांच्या लयीशी अधिक जुळत असल्याचे आढळले. माणसांच्या मेंदूतही अशीच प्रतिक्रिया दिसली.
शब्द सुरू झाल्यावर लगेच प्रतिक्रिया
प्रयोगात प्रत्येक शब्द सुरू झाल्यानंतर सुमारे ४०० मिलिसेकंदांनी कुत्र्यांच्या मेंदूत बदल दिसून आला. म्हणजेच शब्द सुरू झाल्याचा अंदाज घेण्यासाठी कुत्र्यांचा मेंदू आवाजातील ठरावीक रचना वापरत असावा, असे संशोधकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, लहानपणी माणसांच्या सततच्या सहवासात न वाढलेल्या कुत्र्यांमध्येही हीच क्षमता आढळली. रस्त्यावर किंवा निवारा केंद्रात आयुष्याची पहिले तीन महिने घालवलेल्या कुत्र्यांच्या मेंदूतही व्यंजनांवर आधारित शब्दरचना ओळखण्याची अशीच प्रवृत्ती दिसली. यावरून ही क्षमता केवळ माणसांच्या सहवासात लहानाचे मोठे झाल्यामुळे निर्माण होते असे नाही. आवाजांमधील ठरावीक नमुने वारंवार ऐकून ते ओळखण्याची सवय कुत्र्यांच्या मेंदूतही विकसित होऊ शकते, असा संशोधकांचा अंदाज आहे.