

मंडळी, दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी म्हटले की, आपल्याला सर्वात प्रथम आठवतो तो म्हणजे, दिवाळीचा फराळ. त्यासोबत आकाशदिवे, रोषणाई, फटाके आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी यांचेही महत्त्व असते. दिवाळी आठ दिवसांवर आली की, पूर्वी घरोघरी फराळाचे पदार्थ तयार केले जात असत. आजही ग्रामीण आणि नागरी भागामध्ये दिवाळी फराळ घरीच तयार केला जातो. शहरांमधील महिला मात्र या भानगडीत पडत नाहीत. दिवाळीचा रेडिमेड फराळ विकत आणून त्या हे पदार्थ घरातील सदस्यांच्या घशाखाली उतरवत असतात.
दिवाळीच्या फराळाचा विषय आज काढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, राजकीय लोकांची द़ृष्टी या दिवाळीच्या फराळाकडे गेली आहे. दिवाळी पाठोपाठ जाहीर होणार्या महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसाठी अक्षरश: शेकडो इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. निवडून येण्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय असेल, तर तो म्हणजे जनसंपर्क. उमेदवार घरोघरी पोहोचण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करत असतात. आता निवडणुकीआधी दिवाळी आल्यामुळे दिवाळीच्या पणत्या, सुगंधी उटणे, साबण आणि फराळाचे साहित्य वाटप करून मतदारांपर्यंत पोहोचत आपली गोड छाप उमटवण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे.
एखाद्या उमेदवाराचा फोटो छापलेले दिवाळीच्या फराळाचे पाकीट तुमच्या घरी आले, तर आश्चर्य वाटू देऊ नका. निवडून आल्यानंतर उमेदवार काही देतील ही शक्यता नसल्यामुळे आज जे काय मिळत आहे ते घेऊन ठेवा, तेवढाच तुमच्या खिशाचा भार हलका होईल.
आणखी एक गंमत लक्षात घ्या. आपण निश्चित कोणत्या पक्षाकडून उभे राहणार आहोत, हे अद्याप कुणाचेही फारसे ठरलेले नाही. त्यामुळे हा जो दिवाळी फराळ, उटणे, साबण तुमच्याकडे येईल त्यावर उमेदवाराचा फोटो असेल, नाव असेल; परंतु चिन्ह नसेल, याची पण नोंद घ्या. मिळाले तर पक्षाचे आणि नाही मिळाले, तर अपक्ष असे उभे राहायचे; परंतु काहीही करून या निवडणुकीला उभे राहायचेच, असा पण केलेली मंडळी संख्येने फार मोठ्या प्रमाणात आहेत. आज फराळ खाताना आणि नंतर मतदान करताना तुम्ही त्यांची आठवण ठेवाल, अशी त्यांना अपेक्षा आहे. खाल्ल्या फराळाला जागायचे की नाही, हे ठरवणे तुमच्या हातात आहे. मनपा आणि नगरपालिका निवडणुका या स्थानिक प्रश्नांवर लढल्या जातात. तुमच्यासोबत गेली पाच वर्षे कोण उभे होते, त्यांची जाणीव ठेवायची की आज जे फराळ पाठवत आहेत, त्यांची ठेवायची, हे तुम्हालाच ठरवायचे आहे. पाणी आलेले आहे, तर घ्या भरून असा आमचा तुम्हाला सल्ला आहे. कार्यकर्ते तुमच्या घरी दिवाळीचा फराळ आणि वस्तू घेऊन सुहास्यवदनाने येतील, त्यांना ‘आम्ही तुमच्याच सोबत आहोत’ असा धीर द्यायला मात्र विसरू नका.