

काय मित्रा, या दिवाळीला विशेष खरेदी आहे की नाही? दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा. काल बाजारात गेलो होतो. तिकडे खरेदीची धूम होती. तू काय खरेदी करणार आहेस? अरे, खरेदी करणार होतो. दुचाकीची चौकशी करायला गेलो, तर शोरूममध्ये बसायला जागा नव्हती. गाड्यांच्या कंपन्या खूप झाल्या. त्यात प्रत्येक कंपनीची शेकडो मॉडेल्स आहेत. प्रत्येक मॉडेलमध्ये वेगवेगळे रंग आहेत आणि लोक अत्यंत चोखंदळ झालेले आहेत. विशेषतः तरुण मुलांना विशिष्ट मॉडेल आणि विशिष्ट रंगाची गाडी पाहिजे असते.
अरे, हे तर काहीच नाही. कार खरेदी करणाऱ्यांचा वेगळाच रुबाब असतो. पूर्वीच्या काळी पैसे भरत असत आणि कार घरी घेऊन जाऊन त्याची पूजा करत. आजकाल प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट झाल्यामुळे सोशल मीडियावर लगेच लोकांना टाकायचे असल्यामुळे ‘कार खरेदी’ हा एक मोठा सोहळा झाला आहे. शोरूमवाले पण याचा पुरेपूर फायदा करून घेत असतात. चांगल्या पद्धतीने सजवलेल्या एका कोपऱ्यात नवी कोरी कार उभी केली जाते. त्याच्यावर रंगीत आच्छादन असते. मग, नवरा-बायको दोन बाजूंनी येतात. बॅकग्राऊंडला काहीतरी म्युझिक असते. हळूहळू चालत आणि एकमेकांकडे पाहत ते येतात आणि त्या कारवरील पडदा दूर करतात. लगेच त्यांच्यावर फुलांची बरसात होते आणि एक भली मोठी किल्ली त्यांच्या हातात ठेवली जाते. हे लगेच सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल करण्यात येते.
अरे, हे तर काहीच नाही. मी परवा कारच्या शोरूमसमोरून चाललो होतो. सहज दिसले म्हणून थांबलो. एक कुटुंब कार घेण्यासाठी आले होते. त्या कुटुंबाच्या बरोबर किमान 15 ते 20 गाड्यांमध्ये मित्र आणि नातेवाईक आलेले होते. एकदाची कार डिलिव्हरी झाली. टाळ्यांचा कडकडाट झाला, म्युझिक वाजले आणि पेढेही वाटून झाले. पूजा झाल्याबरोबर कुटुंबातील तरुण मुलांची आमच्या कुटुंबातील नवा सदस्य म्हणून फेसबुकवर पोस्ट पण आली आणि इन्स्टाग्रामवर फोटोपण झळकले.
पण, मी काय म्हणतो, एखादे वाहन खरेदी केले, तर त्याला घरातील नवीन सदस्य असे कसे म्हणता येईल? हा आज नवीन असणारा सदस्य जुना झाल्यानंतर, तुम्ही त्याला विकून टाकणार असाल, तर मग त्या सदस्यत्वाला काय अर्थ आहे? काही लोक तर दोन-तीन वर्षांत आपल्या कार बदलतात. काही लोकांकडे तीन-तीन, चार-चार कार असतात. मग, या कारना ‘घराचा सदस्य’ असे कसे म्हणता येईल? अरे, साधी गोष्ट आहे. मध्यमवर्गीय घरामध्ये पहिली कार खरेदी करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यामुळे या कारची विधिवत पूजा करून त्याला घराचा सदस्य म्हणून मान दिला जातो. जीव नसलेल्या वस्तूचीही पूजा करून ती घरामध्ये आणणारी आपली भारतीय संस्कृती महानच म्हणावी लागेल.