

बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तांपैकी आहे. या दिवशी बळीराजाचे स्मरण केले जाते आणि विक्रम संवतची सुरुवात होते.
अपर्णा देवकर
बलिप्रतिपदा हा दिवाळीचा तिसरा दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. ज्याप्रमाणे आपले कालगणनेचे वर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते, तसेच व्यापार्यांचे वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच दिवाळी पाडव्याला सुरू होते. म्हणूनच या दिवशी वही पूजनाला आणि दुकानाच्या पूजनालाही खूप महत्त्व आहे. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस मानलेला आहे. त्यामुळे या दिवशी वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी, नवीन व्यवहार यांची सुरुवात करून दिवस खूप आनंदात घालवावा, असे सांगितले आहे. या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली व त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते. नैवेद्य दाखवला जातो. यानंतर दीप आणि वस्त्रे यांचे दान केले जाते. या पूजेच्या वेळी ‘ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना केली जाते. थोडक्यात या दिवशी बळीराजाचे स्मरण केले जाते.
या दिवशी पहाटे अभ्यंगस्नानानंतर पत्नी पतीला ओवाळते. दुपारी पंचपक्वान्नांचे भोजन केले जाते. दिवाळीतील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी गोवर्धनपूजा करण्याचीही प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा आणि फुले खोचतात आणि कृष्ण, गोपाळ, इंद्र, गायी, वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात आणि मिरवणूक काढतात.
आर्थिक द़ृष्टीने व्यापारी बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात आणि हिशेबाच्या नव्या वहीचे पूजन करतात आणि त्या वहीचा वापर सुरू करतात. या दिवशी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचा दिवाळ सण असतो. लग्नानंतरची त्यांची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी केली जाते आणि जावयाला आहेर केला जातो.
भारतात सगळीकडे हा सण साजरा करतात. भविष्योतर पुराणात दिवाळीला कौमुदी म्हणतात. गुजरातमध्ये वसुबारसला अंगणात वाघाचे चित्र काढतात आणि ते भाऊबीजेपर्यंत ठेवतात. त्याला ‘वाघवाराम’ असे म्हणतात. प्रतिपदेला काळभैरवाची पूजा करतात. बलिप्रतिपदेला राजस्थानी लोक अन्नकोट करून ते अन्न दान करतात.
महाराष्ट्रातही विविध भागांत पाडव्याच्या वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आहेत. कोकणात गोठ्यातील गुरे बाहेर आणून बांधली जातात. गोठा स्वच्छ केला जातो. गोठ्यात शेणाचा गोठा तयार केला जातो. त्यात छोट्या कारीट या रानफळांना हिरसुणीचे (माडाच्या झावळांचे हीर काढून केलेली झाडू) हीर टोचून त्यांची गुरे करून ठेवली जातात. शेणाचा गुराखी, कृष्ण, गौळणी आणि पाच पांडव केले जातात. अर्धे कापलेल्या पोकळ कारिटात दूध घालून त्याचे दूधहंडे केले जातात. येणार्या जाणार्यांना ताक दिले जाते. मराठवाड्यात गुरांना ओवाळण्यासाठी लव्हाळ्याच्या (एक प्रकारचे गवत) दिवट्या करतात. या दिवटीने घरातल्या गाय-बैलांना मनोभावे ओवाळले जाते.
त्यांच्या मागच्या-पुढच्या पायांवर चंद्र-सूर्य रेखले जातात. येथेही शेणाद्वारे डोक्यावर दुधाच्या घागरी घेतलेल्या गवळणी आणि शेणाचेच पाच पांडव तयार करून पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. ठाणे-रायगड भागातील आगरी समाजात शेणाच्या गोळ्यांची बळीराजा म्हणून पूजा केली जाते. दारासमोर तांदळाच्या पिठीपासून रांगोळी काढली जाते. या तांदळाच्या कण्यांत चार दिशांना चार आणि एक मध्यभागी असे एकूण पाच शेणगोळे ठेवले जातात. या प्रत्येक गोळ्याला बळीराजा मानून त्याला झेंडूचे फूल वाहिले जाते. ही पूजा यथासांग पार पडल्यावर हे बळीराजाचे शेणाचे गोळे घरावर फेकले जातात. बळीराजाची घरादारावर कायम कृपा राहावी, अशी प्रार्थना केली जाते.
धनगर समाजासाठी पाडवा हा दिवस मेंढ्यांच्या कौतुकाचा सण असतो. अनेक ठिकाणी मेंढ्यांच्या विविध स्पर्धा घेतात. मेंढा-मेंढीचे लग्न लावतात. त्यासाठी मेंढा-मेंढीला विशेष सजवले जाते. मेंढीच्या गळ्यात हळकुंडाचा गोफ बांधतात, तर मेंढ्याच्या गळ्यात पानसुपारीचा गोफ. खंडोबा-बिरोबाची गाणी म्हणत त्यांचे लग्न लावले जाते. मेंढ्यांच्या लेंड्यांपासून वाडा तयार करतात. वाडा म्हणजे अगदी अख्खे गाव वसवून त्यात घरे, घरातली माणसे असा देखावा तयार करतात. आदिवासी समाज आपल्या गुरांच्या-बकर्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून त्यांची पूजा करतात. ते निवडुंगाचे काप करून त्याच्यात दिवे पाजळतात. आदिवासी आपले गोधन एकत्र करून गावाबाहेर नेऊन त्यांची पूजा करतात.
दिवाळी हा सण पूर्णपणे सामाजिक स्वास्थ्य राखणारा सण आहे. या काळात मालक आणि कर्मचारी संबंध चांगले राहतात. दिवाळीनिमित्त काम करणार्यांना भेट किंवा बोनसच्या स्वरूपात काहीतरी दिले जाते. तसेच पत्नीने पतीला ओवाळावे आणि त्या निमित्ताने आयुष्य मागून घ्यावे, पतीकडून आपला सत्कार करून घ्यावा, असा कौटुंबिक स्वास्थ्य राखणारा विधी या सणाच्या निमित्ताने करत असतो. पाडवा असो वा भाऊबीज, दिवाळी हा सण सर्व प्रकारचे नातेसंबंध द़ृढ करण्यासाठी असतो. यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य राखण्यास खूप मदत होते.
बलिप्रतिपदेला म्हणजे दिवाळीच्या पाडव्याला अमृतसर येथे सुवर्ण मंदिराची स्थापना करण्यात आली. शीख लोक हा सण भव्य प्रमाणात साजरा करतात. दक्षिण भारतात बलिप्रतिपदेला रेड्याच्या टकरी लावतात. गाय -बैलांच्या मिरवणुका काढतात. गोव्याकडे शेजारी आणि नातेवाईकांना घरी बोलावून दूध, गूळ, पोहे व फराळ देतात. या सर्वाचा अर्थ एकच की, दिवाळीला एकत्र जमून एकमेकांना भेटी देऊन आपला स्नेह व्यक्त करणे. हा दिवस एक उत्तम दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी कुठलेही शुभ काम आवर्जून केले जाते.
प्रभू श्रीरामांना या शुभमुहूर्तावर राज्याभिषेक करण्यात आला, असे सांगितले जाते. तसेच देवी पार्वतीने या दिवशी भगवान महादेवाला द्युतात हरविल्याचीही पौराणिक कथा आहे. म्हणून या दिवसाला द्यूत प्रतिपदा असेही नाव आहे. या दिवशी द्यूत खेळण्याची पद्धत आहे. याच दिवशी विक्रमादित्यराजाने विक्रम संवत्सराचा प्रारंभ केला. साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्ताचा मान या दिवसाला आहे. या दिवशी काही ठिकाणी मुलगी वडिलांना औक्षण करते. यामागील कारण पंरपरा अशी असावी की, जो आपला रक्षणकर्ता असतो त्याच्या मंगलकामनेकरिता मनोभावे त्याला औक्षण करीत असावे आणि त्याच्याविषयी कृतज्ञ भाव कायम राहावा. आपला प्रत्येक सण हा कोणत्या ना कोणत्या नात्याशी संबंधित आहे. आपल्या संस्कृतीत कुटुंब संस्था, नातेसंबंध याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज नवीन पिढीला ते पटवून देणं आवश्यक बनलं आहे. त्यामुळे कदाचित पुन्हा नव्यानं आपण एकमेकांशी बांधले जाऊ.