नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केला, अशी कथा आहे. नरकासुर हा उन्मत्त राजा होता. त्यानं ब—ह्मदेवाची आराधना करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता. त्यानंतर त्यानं प्रजेवर अन्याय-अत्याचार करण्यास सुरुवात केली. अशा अत्याचारी नरकासुराचा श्रीकृष्णानं वध करून संकट दूर केलं. आजही नरकासुरासारखी प्रवृत्ती असणारे समाजात आहेत. त्यांचा नायनाट करण्यासाठी एखादा श्रीकृष्ण जन्माला येण्याची गरज आहे.
दिवाळी म्हणजे अंधारातून उजेडाकडे नेणारा, प्रकाश देणारा, आनंद देणारा हा सण. प्रकाश वर्धिष्णू करणारा हा सण आहे. समृद्धी आणि ऐक्याचा मेळ करणारा हा सण. हा सण अतिप्राचीन परंपरा असलेला आहे. दिवाळीचं वर्णन ऋग्वेद, बौद्ध, जैन, चाणक्यनीती यातही आढळतं. गुप्त काळात इ.स. 200 ते 600 या दरम्यान दिवाळीचा उल्लेख यक्षरात्री या नावानं आढळतो. इ.स. 600 च्या सुमारास या सणाला ‘दीपप्रतिपदुत्सव’ असं म्हणत. कनोजचा राजा हर्षवर्धन यानं आपल्या ‘नागानंद’ या नाटकात दिवाळीला दीपमाला उत्सव, असं म्हटलं आहे. 11 व्या शतकात श्रीपती नावाच्या ज्योतिष्याचार्यानं ‘ज्योतिष्य रत्नमाला’ या ग्रंथावरील मराठी टीकेत दिवाळी हा शब्द वापरला आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत अनेक वेळा अनेक अर्थांनी दिवाळी हा शब्द वापरला आहे. ते ज्ञानाची दिवाळी मानतात.
बादशहा अकबरानंही ‘ऐने दिवाळी’मध्ये दिवाळीचं वर्णन केलं आहे. हा सण व्यापार्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्यांची दिवाळी धनत्रयोदशीपासूनच सुरू होते आणि बलिप्रतिपदेला संपते. या पाच दिवसांतला प्रत्येक दिवस शुभ मानला जातो. वह्या आणणं, हिशेब पूर्ण करणं, नवीन खातेवही लिहिण्यास सुरुवात ते या दिवसांत करतात. त्याला ते चौघडिया किंवा शिवालिखित मुहूर्त म्हणतात. दिवाळीच्या पाच दिवसांपैकी नरक चतुर्दशी हा दिवस क्रमानं तिसरा येतो. याच्यामागील कथा मोठी मनोरंजक आहे. प्राचीन काळी प्रागज्योतिशपूर म्हणजे आताचा आसाम किंवा भूतानच्या पलीकडील पर्वतांचा भाग होता. तिथं भूदेवीचा पुत्र नरकासुर राजा राज्य करत होता. नरकासुराला भौमासुर असंही नाव होतं. हे नाव त्याला आईच्या भूदेवी या नावावरून मिळालं असावं. त्यानं ब—ह्मदेवाला जप-तप करून प्रसन्न करून घेतलं. त्यावेळी ब—ह्मदेवानं त्याला असा वर दिला की, तुला मृत्यू फक्त मातेकडूनच येईल. आई मुलाला मारणं शक्यच नाही, या विचारानं नरकासुरानं अनेक अत्याचार करून प्रजेला त्रासून सोडलं. याशिवाय सोळा हजार शंभर कन्यांवर अत्याचार करून त्यांना कारागृहात कैद केलं. सर्व लोक, देव मिळून श्रीकृष्णाला शरण गेले. कारागृहातील कैद असलेल्या कन्यांनी कृष्णाला पत्र पाठवून आपली यातून सुटका करण्याची विनंती केली.
तेव्हा श्रीकृष्णानं नरकासुराशी युद्ध करायचं ठरवलं. युद्धात त्याच्या रथाचं सारथ्य करण्यासाठी सत्यभामेला नेमलं; कारण ती पण कृष्णासारखी सारथ्य करण्यात निपुण होती. शिवाय सत्यभामेला बरोबर घेण्यात कृष्णाची एक चाल होती. दोघांत तुंबळ युद्ध झालं. नरकासुर उत्तम योद्धा होता. युद्धनैपुण्यानं त्यानं कृष्णालाही क्षणासाठी विस्मित केलं. यावेळी त्यानं सत्यभामेला समोर करून नरकासुराचा वध केला. तो दिवस होता आश्विन वद्य चतुर्दशी. वेळ होती सूर्योदयापूर्वीचा काळ. मरताना नरकासुरानं कृष्णाकडून वरदान मागितलं, ते असं, या दिवशी जो कोणी सूर्योदयापूर्वी स्नान करेल, त्याला नरकवास न मिळो. त्याच्या स्मरणार्थ या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करतात. कारागृहातील कन्यांची कृष्णानं मुक्तता केली. श्रीकृष्ण त्यांचा पालनहार होता, उद्धारकर्ता होता. नरकासुर वधानंतर श्रीकृष्ण सत्यभामेसह द्वारकेला परतला. त्याच्या स्वागतासाठी सगळी नगरी शृंगारली होती. दीपमाळा लावून त्याचं स्वागत केलं. त्याची स्मृती म्हणूनही हा दिवस साजरा करतात. खरं तर मनामनांत आणि देहादेहांत दडलेल्या नरकासुराला सद्वृत्तीच्या जलानं अभ्यंगस्नान घालून त्या असुरांना घालवून द्यायला हवं, तरच जीवनात सात्त्विकतेचा आनंद ओसंडून वाहील.