दिवाळीचा अर्थ सर्वांसाठी वेगवेगळा आहे. सुख-दु:खांनी व्यापलेलं मन उत्सवाच्या दिवशी आनंदाचा क्षण अनुभवतं. दसर्याचा सण विजयपर्व, तर दिवाळीचा सण हा दिव्यांचं प्रकाशपर्व! विजयादशमीनंतरच दिवाळी सणाचे वेध लागतात आणि उत्सवी वातावरणाला उधाण येऊ लागतं. शरदाचं चांदणं मन मोहित करतं, त्यामुळं मनात उत्साह आणि प्रेरणेची भावना वाढीस लागते. दिवाळी हा तर भारताचा एक प्रमुख सण असून, जगाच्या पाठीवर जिथं-जिथं हिंदू समुदाय, भारतीय नागरिक असतात, तिथं भारतीय परंपरा, प्रथेनुसार हा सण साजरा केला जातो.
अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणून दीपोत्सव हा दरवर्षी आणि प्राचीन काळापासून उत्साहानं, आनंदानं साजरा करत आलो आहोत. पुराणातील दाखले आणि धार्मिक श्रद्धेचा आधार असलेलं पर्व साजरा करताना काळानुसार अनेक बदल झाले; मात्र या पर्वाचा मूळ गाभा आणि उद्देश हा अंतर्गत-बाह्य जगात सर्वत्र सत्य, शांतता, प्रेम, आनंदाचा प्रसार करण्याचा असून, तो आजही कायम आहे. असं म्हणतात, विजयादशमीच्या दिवशी श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला. या विजयाकडे आपण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहतो. वास्तविक, रामकथा ही संपूर्ण जगात व्यापलेली आहे. थोड्याफार फरकांनी ही कथा विश्वव्यापी संस्कृतीचा भाग बनली आहे. एवढेच नाही, तर कथा, कादंबर्यांतही रामकथेचा व्यापक प्रभाव दिसतो. श्रीरामांनी लंकेत जाऊन रावणाचा वध केला आणि तेथून परत येत असताना अयोध्येत उत्सव साजरा होणारच. एकार्थानं संपूर्ण संस्कृतीच राममय असेल, लोकांत, संस्कारात, गीतात, आख्यायिकेत रामच रामच असेल तर विवाह सोहळा, पुत्र जन्म आदींसारख्या प्रसंगांतही रामांचा उल्लेख होतोच आणि त्यााशिवाय आपल्याकडील धार्मिक कार्यक्रम, विधी, कौटुंबिक कार्यक्रम पूर्ण होत नाहीत.
दिवाळीचा संबंध हा प्रामुख्यानं श्रीराम अयोध्येत परतण्याशी आहे. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण हे वनवास संपवून अयोध्येत आल्यानंतर अयोध्यावासीयांनी सर्व ठिकाणी मातीचे दिवे प्रज्वलित करून उत्सव साजरा केला. अयोध्यावासीयांनी या सुवर्णक्षणी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तुपाचे दिवे लावून प्रभूंचं स्वागत केलं. म्हणूनच हा दिवस म्हणजे कार्तिक अमावास्येच्या तिथीला दिवाळीचा सण साजरा होऊ लागला. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पृथ्वीवर विराजमान होते आणि त्यामुळं लक्ष्मीचं स्वागत करतानादेखील दिवे लावण्याची प्रथा आहे. त्यामुळं दिवाळीला आतषबाजी केवळ श्रीरामांच्या स्वागतानिमित्तच नाही, तर धन-धान्यांची देवी लक्ष्मीचं पूजन करण्याच्या निमित्तानंदेखील होऊ लागली. पुराणकथेनुसार समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक देवी लक्ष्मीदेखील होती. कार्तिक अमावास्येला प्रकट होत असल्यानं तिचं स्वागत आणि पूजेची परंपरा विकसित झाली. याप्रमाणे दिवाळी शतकानुशतकं साजरी केली जाऊ लागली. पद्मपुराण आणि स्कंदपुराणातदेखील याचा उल्लेख सापडतो. पौराणिक कथेनुसार दिवाळी ही दिवा, सूर्यदेवाचं प्रतीक आहे. आणखी एका संदर्भानं प्रकाशपर्व म्हणूनही दिवाळी साजरा केली जाते; कारण दिवा लावणं हे भौतिक रूपानं परिसर उजळून टाकणं आहे. दिवा प्रज्वलित करताना त्याचा आणखी खोलवर विचार केला, तर मनातील अंधकार आणि अज्ञान दूर करण्याचाही विचार त्यामागं दडलेला आहे.
दिवाळीचे प्रकाशपर्व पाचही दिवस उत्सवाच्या रंगात न्हाऊन निघणारे असते. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज. वसुबारसनं सुरू झालेलं प्रकाशपर्व केवळ भाऊबीजपर्यंत नाही, तर देवदिवाळीपर्यंत म्हणजे तुळशीच्या लग्नापर्यंत चालतं. कार्तिक पौर्णिमेला समस्त देवगण वाराणसीच्या घाटावर एकत्र येऊन दिवाळी साजरा करतात. त्यामुळं दिवाळी सण हा एक महापर्वाच्या रूपानं साजरा केला जातो. श्रीरामांच्या अयोध्येतील आगमनाचा आनंद हा प्रत्येकाच्या मनातील उत्साह द्विगुणीत करणारा आहे आणि तो सर्वांसाठी मंगलमय पर्व ठरला. हा उत्सव एकमेकांना भेटवस्तू देण्याचंही कारण ठरला. सण कोणताही असो, या काळात फराळ, मिठाईची आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण होतेच आणि याशिवाय सण साजरा होतच नाही. यात सर्वजण आनंदानं सामील होतात. बाजार दिव्यांच्या माळांनी उजळून निघालेला असतो.
दिवाळी दरवर्षी येते. दरवर्षी आपण दिवे लावून अंधकाराला पळून लावण्याचा प्रयत्न करतो; पण अंधकार दूर होताना दिसत नाही. काळजीपूर्वक पाहिलं तर विज्ञानाचा प्रकाश आपण खूप पाडला आहे; परंतु अज्ञान, अधर्म, विश्वासघात, अंधविश्वासरूपी असणारा अंधकार मिटवू शकलो नाही. हा अंधार आजही आपल्याभोवतीच घुटमळत आहे. वेद, पुराणकथा, उपनिषदं, महाभारत आणि रामायणासारख्या ग्रंथांत ज्ञानाचा सागर पाहावयास मिळतो. हे आपले धर्मग्रंथ आहेत. त्यांचा आपण अभ्यास करत आलो आहोत; पण आजही भारतातील मोठी लोकसंख्या अशिक्षित आणि सुविधांपासून वंचित आहे. चला, दिवाळीच्या या महाप्रकाशपर्वात मनातील आणि बाह्य जगातील अंधार व अज्ञान संपवून टाकण्यासाठी पुढे या आणि लक्ष्मीची पूजा करताना मनातील सरस्वतीचा सन्मान करण्यास विसरू नका; कारण हीच सरस्वती समाजात रुजलेल्या अनिष्ट प्रथा, अज्ञानावर आणि अविचारांवर प्रहार करते. मगच आपला समाज, आपली संस्कृती, सभ्यता ही खर्या अर्थानं प्रकाशमान होईल आणि ठिकठिकाणी द्वेषभाव, कटूतेऐवजी प्रेमाचा प्रकाश दिसून येईल.