

दिवाळी साजरी करणे आणि दिवाळे निघणे याचा शाब्दिक संबंध जरूर असावा. दिवाळी साजरी करताना सर्वसामान्य माणसाचे दिवाळे निघत असते. ‘दिवाळी’ या शब्दावरूनच ‘दिवाळे’ या शब्दाची व्युत्पत्ती झाली असावी. दिवाळीचा किराणा जवळपास दुप्पट भरावा लागतो. संमिश्र किराणा सामानामधून लाडू, करंज्या, अनारसे, चकल्या, चिरोटे, पुर्या इत्यादी पदार्थांची निर्मिती होत असते. या काळात मधुमेही मंडळीसुद्धा डॉक्टरी सल्ला झुगारून जिभेचे चोचले पुरवून घेत असतात. रक्तदाबाचा विकार असणारे कोलेस्ट्रॉलची काळजी करीत नाहीत. दिवाळीत सोडून दिलेले पथ्यपाणी दुरुस्त करण्यासाठी नंतर डॉक्टरांची आणि औषधांची बिले भरताना पुन्हा दिवाळे निघत असते. ठणठणीत प्रकृती असणार्यांचे काम खाणे आणि पचवणे आहे. या दोन गोष्टींवर भर देणारी मंडळी या चार दिवसांत पावसाळ्यात मोराला आनंद व्हावा, तशी आनंदी दिसतात.
सारे घर तृप्त, तर गृहिणी समाधानी हे संस्कृतीचे तत्त्व यांच्या सुखाचे रहस्य असते. नवनवीन चविष्ट पदार्थ करून घरातील सर्वांना सणाचा अनुभव देणे या ध्येयाने गृहिणीवर्ग कार्यरत असतो. पहाटे थंडीत पोरासोरांना आंघोळी करणे जीवावर येते. त्यात पुन्हा नरक चतुर्दशीला आंघोळीला उशीर झाला, तर नरक अंगावर पडतो, असे आदल्या दिवशी ज्येष्ठांनी सांगितलेले असते. दिव्यांनी ओवाळून अंगाला सुवासिक तेल लावून त्यावर उटण्याने खसाखसा अंग खरबरीत करून नंतर आंघोळ, असा स्वर्गीय अनुभव घेण्याची संधी असताना नरक पडण्याची रिस्क घेणार तरी कोण?
अशी आंघोळ चालू असताना अंगणात अचानक दाणदिशी फटाक्यांची लड लावणारा एखादा भाचा किंवा भाची असली, तर त्यासारखे सुख नाही. लाडक्या मामाच्या घरी जाऊन त्याच्याकडून काही ना काही उकळणारी भाचेमंडळी दिवाळीत फॉर्मात असतात. मामा आणि भाचा ही जोडी शकुनी-दुर्योधन, कंस-श्रीकृष्ण अशीच असते, असे काही नाही. तिचे प्रेमळ स्वरूप दिवाळीमध्ये पाहायला मिळते. भाचे किंवा भाच्या मोठ्या असतील, तर त्यांचे भारीचे कपडे मामाचे दिवाळे काढण्यात अग्रेसर असतात. काही प्रेमळ भाचे तर दिवाळीला निघण्यापूर्वीच ‘मामा, तुला लुटण्यासाठी येतोय, अंगाला तेल लावून बसू नकोस’ असे दरवर्षी न चुकता बजावीत असतात. अशा प्रेमळ भाच्यांमुळे दिवाळे निघत असले, तरी अशा दिवाळीचा आनंद काही औरच असतो, हे तुम्हालाही पटेल.