

पहलगाम घटनेनंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना टिपून मारले आणि त्यांचे अड्डे जमीनदोस्त केले. अखेर पाकिस्तानला सपशेल हार मानावी लागली. ‘भारतावर अण्वस्त्र सोडू’, ‘हे करू आणि ते करू...’ अशा वृथा गर्जना करणारे पाकिस्तानचे मंत्री शक्तिसामर्थ्य दाखवताच चिडीचूप झाले. हल्ले केल्यास आम्ही विदेशात पळून जाऊ, असे तेथील काही खासदारच म्हणू लागले आणि एक खासदार तर पाकिस्तानच्या संसदेत ‘हमें बचाओ, हमें बचाओ’ असे म्हणत छाती बडवून रडलासुद्धा. भारताचे लक्ष ‘पीओके’वर आहे, हे पाकिस्तानने विसरू नये, असे इशारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पाकिस्तानला सातत्याने देत आहेत. भारतीय सैन्याने 9 आणि 10 मेच्या रात्री रावळपिंडीसह हवाई दलाच्या अन्य ठिकाणी ब्रह्मोस क्षेपणास्त्राद्वारे हल्ले करून, पाकिस्तानचे नियोजित हल्ले उधळून लावल्याची कबुली पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अझरबैजानधील लाचिन येथे दिली आहे.
पाकिस्तान-तुर्कस्तान-अझरबैजान या त्रिपक्षीय शिखर परिषदेत त्यांनी ही कबुली दिली, हे महत्त्वाचे. आज जगातील केवळ हे दोन देशच पाकिस्तानच्या समर्थनार्थ उभे आहेत. तुर्कस्तानने तर पाकिस्तानला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व रणगाडे पुरवले. लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील पाक सैन्याने 10 मे रोजी सकाळच्या नमाजानंतर भारतावर हल्ला करण्याची योजना आखली होती. पण त्या दिवशी पहाटेच भारताने पाकिस्तानी लष्करी तळ तसेच महत्त्वाच्या ठिकाणी ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागली. रावळपिंडीतील नूरखान आणि चकवाल येथील मुरीद येथील तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या या पराक्रमाची कबुली आता खुद्द शरीफ यांनीच दिली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देऊन, पाकिस्तानचा क्रूर चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारताने सर्वपक्षीय शिष्टमंडळे जगभर पाठवली. पाकिस्तानात बसून भारतावर हल्ला करणार्यांना आता त्याची किंमत चुकवावीच लागेल. आम्ही केवळ दहशतवाद्यांना संदेश देत होतो. तुम्ही सुरुवात केलीत. आम्ही उत्तर दिले. तुम्ही थांबलात तर आम्हीही थांबू, अशी स्पष्टोक्ती अमेरिकेत गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे प्रमुख शशी थरूर यांनी केली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ लष्करी मोहीम नव्हती, तर ते बदलत्या भारताचे प्रतिबिंब आहे. जागतिक स्तरावर देशाचा द़ृढ निश्चय, धैर्य आणि वाढती ताकद यांचे दर्शन त्यामधून घडले. दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईतील तो एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. आम्ही पाकिस्तानात तीनवेळा त्यांच्या घरात घुसून हल्ला केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही. दहशतवाद्यांना आश्रय देणार्या पाककडे जगाला देण्यासारखे काहीही सकारात्मक नाही. अस्तित्वात आल्यापासून त्याने जगभरात दहशतच निर्माण केली असल्याची तोफ पंतप्रधान मोदी यांनी डागली आहे. भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला असून, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात यांसह काही राज्यांत विदेशी भांडवल आकर्षित होत आहे.
भारताचे लष्करी सामर्थ्य पाकिस्तानच्या अनेक पटींनी जास्त आहे. पाकिस्तानात ना नवी गुंतवणूक होत आहे, ना नव्या प्रकल्पांची उभारणी. लष्कर कमालीचे भ्रष्ट असून, संरक्षण प्रकल्पांमध्येही तुडुंब भ्रष्टाचार चालतो. केवळ दहशतवाद्यांचे नवनवीन प्रशिक्षण तळ एवढेच ‘स्टार्टअप’ सुरू आहेत. हे वास्तव भारताने जगासमोर दमदारपणे मांडले. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत हे देशाचे धोरण असून, म्हणूनच पाकिस्तानने पुढे ठेवलेला वाटाघाटींचा प्रस्ताव पुन्हा फेटाळण्यात आला. व्याप्त काश्मीरमधील लोक आमच्याच कुटुंबाचे भाग आहेत. तेथील जनताच ‘पीओके’ला भारताच्या स्वाधीन करेल. त्यामुळे पाकिस्तान सरकारसोबत यापुढे ‘पीओके’ भारताकडे सुपूर्द करण्याच्या मुद्द्यावरच चर्चा केली जाईल. हा प्रदेश आम्ही ताब्यात घेऊन दाखवू, असे आत्मविश्वासपूर्ण उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या पार्श्वभूमीवर काढले आहेत.
मुळात स्वातंत्र्यानंतर ज्यावेळी पाकमधून आलेल्या घुसखोरांनी भारतावर हल्ला केला, तेव्हा आपण त्यांना परतवून लावले. पण आणखी काही दिवस युद्ध केले असते, तर ‘पीओके’ आपण तेव्हाच पुन्हा ताब्यात घेऊ शकलो असतो, असे मत अमित शहा यांनी यापूर्वीच व्यक्त केले आहे. ‘पीओके’तील बहुतांश लोक सांस्कृतिक आणि भावनिक नात्याने भारताशी जोडलेले आहेत, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले असून, ते वास्तव आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लवकरच पाकिस्तानी टोळीवाल्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केली. तेव्हा या टोळ्यांना भारतीय जवानांनी हुसकावून लावले. पण त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आकस्मिकरीत्या युद्धविराम घोषित केल्यामुळे ‘पीओके’वर पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे सुमारे अर्धे काश्मीर भारताच्या हातातून गेले. 370 वे कलम रद्द करून जम्मू-काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्याचे धाडसी पाऊल केंद्र सरकारने उचलले.
गेल्या सहा वर्षांतील जम्मू-काश्मीरच्या प्रगतीमुळे पाकला बर्याच मिरच्या झोंबल्या आहेत. मात्र हातपाय आपटण्याशिवाय पाकिस्तान काहीही करू शकला नाही आणि शकणारही नाही. भारत व पाकिस्तान यांच्यात काश्मीर हाच मुख्य प्रश्न असल्याचा निरर्थक दावा पाकिस्तान दशकानुदशके करत आला आहे. त्यावर भारताने अनेकदा स्पष्टपणे फटकारले असून मध्यंतरी ब्रिटन भेटीत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला चांगलेच सुनावले होते. ‘पीओके’ भारताच्या ताब्यात आल्यानंतरच काश्मीरची समस्या पूर्णपणे सुटेल, असे ते म्हणाले होते. केवळ चीनच्या पाठिंब्यावर आणि जागतिक अर्थसंस्थांच्या मेहरबानीवर आपण भारताशी सामना करू, असे पाकला वाटत असले, तरी आज सिंध, बलुचिस्तान आणि पीओकेमधील जनता पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि लष्करशहांवर नाराज आहे. म्हणूनच दशतवादाचा मार्ग सोडणे हेच पाकिस्तानच्या हिताचे. ऑपरेशन सिंदूर च्या यशानंतर ‘पीओके’बाबत भारताने ठोसपणे मांडलेली भूमिका जशी येथे महत्त्वाची, तशीच ती पाकच्या भवितव्याचा दिशानिर्देश करणारीही आहे! त्यातच खरे शहाणपण आहे.