पहिला चहा | अवघे विश्वची पंढरी...

Dialogue in Ashadh Wari
पहिला चहा | अवघे विश्वची पंढरी...
Published on
Updated on

(आषाढ वारीमधील संवाद)

भक्त : बरं झालं बुवा वारीचा इंधनाशी कायबी संबंध नाही. आपण आपले कदम कदम बढाये जा करत पोहोचू पंढरपुरीत.

प्रतिभक्त : (भक्तासोबत राहून भक्तीची ओढ लागलेला इसम) मी गाडी घेऊन आलो असतो. पण आपल्याला सोबत म्हणून पायी यावं लागलं बाप्पा.

भक्त : तब्येत धड राहावी म्हणून चाललं पाहिजे रोज आपुण. गाड्या काय मस्त हायत घरी पडून. पेट्रोलमुळं घाईला आल्या. वारीचं सुख लय न्यारं.

प्रतिभक्त : इथेनॉल का काय म्हणत्यात तेनं लय घोळ घातलाय. गाड्या नुसत्या घरघर गडगड करीत्यात. काय राम न्हाई ऱ्हायला त्यात.

भक्त : नुसतं पाणीच की ते लेका. दुस्काळी भागात काय घोड्यावरनं फिरायचं? इटूराया पावला तर समदा प्रश्न मिटंल.

प्रतिभक्त : गडावरचा देव पावला तर गाड्या नीट चालतील नाही तर आपलं शासन काय धोरण आखतंय त्यावर हाय सगळी धुरा.

भक्त : गडावरचा देव? ते तर महाराष्ट्राचं कुलदैवत! त्याच्या नगरीत पेट्रोल आणि सगळ्या अन्नात भेसळ चालू हाय. पाव रे गडावरच्या देवा (हात जोडत) आम्ही तुझीच लेकरं.

प्रतिभक्त : एका लिटर इथेनॉल पाठी हजारो लिटर पाणी लागतं ते तयार होण्यासाठी. निम्मा महाराष्ट्र दुस्काळी हाय. तिथं इथेनॉलचं नवीन पीक आलंय. काय बोलावं आता.

भक्त : इटूरायाला आवंदाच्या वारीत साकडं घालूया. ह्यो प्रश्न तेवढा सोडवा देवा म्हणून. काय?

प्रतिभक्त : त्यासाठी वारी पुरेशी न्हाई बाबा.

भक्त : देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझिया गळा! तू निराश नको होऊ. यंदा पाऊस जोर धरंल. ऊस तरारून येईल. ऊस लागतोय इथेनॉलसाठी. आपला ऊस आणि पाऊस इथेनॉलला काय कमी न्हाय पडू देणार.

प्रतिभक्त : त्योच तर घोळ हाय. ऊस काय पाणी कमी पितोय का. त्या गाड्या विकलेल्या बऱ्या बाबा. मला तुझं पटतंय. पायी चाललेलं बरं. भविष्याची चिंता मिटली. ना पेट्रोल, ना डिझेल, ना इथेनॉल. वारीत चालायची सवय लागली. आता भविष्यातली अवघी वारी सफल होऊदे रे विठुराया.

भक्त : बहु असोत सुंदर संपन्न की महान. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. हे खरं होऊ दे रे विठुराया. इथेनॉलच्या मायाजालात अडकलेल्या गरीब जनतेला सोडव. हेच आमचं साकडं तुमास्नी. अवघे विश्वची पंढरी. विठ्ठल विठ्ठल. श्री हरी विठ्ठल...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news