Dharashiv | शेंदुराआड दडलेला वारसा

Dharashiv |
Dharashiv | शेंदुराआड दडलेला वारसा
Published on: 
Updated on: 

उमेश काळे

धाराशिव जिल्‍ह्यात माणकेश्‍वर येथे सटवाईदेवीच्या मूर्तीवरील शेंदुराचा थर काढल्‍यानंतर मूर्ती महासरस्‍वतीची असल्‍याचे आढळले. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षें मूर्तीला शेंदूर फासण्याची प्रथा चालू आहे. तज्ज्ञांनी अशी ठिकाणे उजेडात आणावायास हवीत.

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात माणकेश्वर येथे वर्षानुवर्षे सटवाईदेवी म्हणून पूजल्या जाणाऱ्या एका मूर्तीवरील शेंदूर काढल्यानंतर तिचे मूळ स्वरूप समोर आले. मार्च ते एप्रिल २०२६ या काळात पुरातत्त्व विभागाने शास्त्रीय पद्धतीने मूर्तीचे रासायनिक संवर्धन केले. शेंदूर आणि इतर थर काढल्यानंतर समोर आलेली सुमारे ११० सेंटिमीटर उंच आणि ७० सेंटिमीटर रुंद असलेली आसनस्थ, चतुर्भुज मूर्ती बाराव्या शतकातील यादवकालीन महासरस्वतीची असल्याचे स्पष्ट झाले. अक्षमाला, अंकुश, वीणा आणि ग्रंथ ही हातांतील आयुधे, तसेच मुकुट, प्रभावळ, मकरतोरण आणि हंस, मोर इतर रचना यांमुळे तिची ओळख निश्चित झाली. एवढ्या महत्त्वाच्या मूर्तीचे मूळ स्वरूप मात्र इतकी वर्षे शेंदुराच्या थराखाली झाकलेे होते. गावातील गणेश महाराज अंधारे यांनी मूर्तीवरील शेंदूराचा थर काढावा, शास्त्रीय संवर्धन व्हावे, यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला. त्यासाठी उपोषणही केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. या घटनेत ग्रामस्थांची जागरूकताही महत्त्वाची ठरली. गावात प्राचीन मूर्तीचे केवळ धार्मिक महत्त्व नसून तिच्यामागे इतिहास आणि कलावैभवही असू शकते, याची जाणीव या निमित्ताने झाली.

माणकेश्वरची ही घटना एका मूर्तीच्या ओळखीपुरती मर्यादित नाही. महाराष्ट्राच्या भूमीत दडलेल्या सांस्कृतिक वारशाकडे पाहण्याची नवी दृष्टी त्‍यामुळे मिळाली आहे. अजिंठा-वेरूळच्या शिल्पकलेने जगाचे लक्ष वेधले. बीबी का मकबरा आणि देवगिरी किल्ला यांसारख्या वास्तूंसाठी पर्यटक छत्रपती संभाजीनगरला येतात; मात्र मराठवाड्याचे ऐतिहासिक वैभव यापुरतेच मर्यादित नाही. औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, पैठण, तेर, भोकरदन, अन्वा आणि होट्टल येथेही प्राचीन शिल्पकला, स्थापत्य आणि संस्कृतीचे महत्त्वपूर्ण अवशेष आहेत.

श्रद्धा आणि परंपरा या समाजजीवनाचा अविभाज्य भाग आहेत; मात्र त्याच वेळी प्राचीन मूर्ती आणि शिल्पांचे ऐतिहासिक व कलात्मक महत्त्वही जपले गेले पाहिजे. शेंदुराचे अनेक थर चढत राहिल्यास मूर्तीवरील सूक्ष्म कोरीव काम झाकले जाते. त्यामुळे मूर्तीची ओळख, तिची कलाशैली आणि कालखंड निश्चित करणे अवघड होते. धार्मिक परंपरा जपत असतानाच पुरातत्त्वीय वारशाच्या जतनाची जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे. माणकेश्वर परिसरातील ‘सूरसुंदरी’ या शिल्पाचेही यापूर्वी अशाच प्रकारे संवर्धन केले. शेंदुराचे थर काढल्यानंतर त्याचे मूळ स्वरूप समोर आले. अशा उदाहरणांमुळे महाराष्ट्रातील इतर प्राचीन स्थळांकडेही लक्ष देण्याची गरज अधोरेखित होते. गावोगावी जुन्या मंदिरांतील मूर्ती, शिल्पे आणि वास्तूंचे शास्त्रीय सर्वेक्षण झाल्यास इतिहासातील अनेक दुर्लक्षित दुवे समोर येऊ शकतात. त्यासाठी राज्यातील प्राचीन वारशाची नोंदणी, छायाचित्रण, दस्तावेजीकरण आणि आवश्यकतेनुसार रासायनिक संवर्धन याकडे अधिक गांभीर्याने पाहिले पाहिजे. ग्रामस्थ, इतिहास अभ्यासक, संशोधक आणि पुरातत्त्व विभाग यांनी परस्पर सहकार्याने काम करण्याची गरज आहे. केवळ प्रसिद्ध स्थळांच्या संवर्धनावर भर न देता गावखेड्यांत विखुरलेल्या छोट्या-मोठ्या वारशाचेही महत्त्व ओळखले पाहिजे. पर्यटनाच्या दृष्टीनेही अशा स्थळांचा विकास करताना त्यांच्या ऐतिहासिक स्वरूपाचे जतन होणे महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासावर विविध काळात आक्रमणे, दुर्लक्ष आणि नैसर्गिक झीज यांचा परिणाम झाला, तरीही आज अनेक ठिकाणी आपल्या पूर्वजांच्या कलाकौशल्याच्या खुणा टिकून आहेत. या खुणा केवळ दगडातील कोरीवकाम नाहीत, त्या आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक स्मृती आहेत. त्यामुळे त्यांचे जतन करणे म्हणजे पुढील पिढ्यांना आपल्या इतिहासाशी जोडून ठेवणे आहे. माणकेश्वरची महासरस्वती आपल्या परिसरात दडलेल्या इतिहासाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी आहे. श्रद्धा आणि वारसा यांत संघर्ष निर्माण होण्याची गरज नाही. उलट शास्त्रीय दृष्टिकोनातून वारशाचे जतन करून श्रद्धेलाही अधिक समृद्ध करता येते. शेंदूराआड दडलेले माणकेश्वरचे हे शिल्प पूर्वजांनी सोपविलेला वारसा ओळखूया, जपूया आणि पुढील पिढीकडे अधिक समृद्ध स्वरूपात सोपवूया, असा संदेश देते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news