

सचिन बनछोडे
आज धनत्रयोदशी म्हणजेच आयुर्वेदाचे आद्य प्रवर्तक असलेल्या भगवान धन्वंतरींची जयंती. प्राचीन भारतीय संस्कृतीने जगाला आरोग्याविषयी दिलेल्या अमूल्य देणग्यांमध्ये चार उपवेदांपैकी एक असलेला आयुर्वेद तसेच योगविद्येचा समावेश होतो. केवळ एक उपचार पद्धती न राहता जीवनशैलीचे शास्त्र म्हणून आयुर्वेदाने गेल्या काही दशकांत भारताच्या सीमा ओलांडून जगभरातील लोकांमध्ये विश्वास आणि लोकप्रियता मिळवली आहे. ‘आरोग्यम् धनसंपदा’या तत्त्वावर आधारित हे प्राचीन ज्ञान आता आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरत आहे.
आयुर्वेदाचा प्रसार जगात प्रामुख्याने तीन स्तरांवर झाला आहे. शैक्षणिक, वैद्यकीय (क्लिनिकल) आणि व्यावसायिक. उत्तर अमेरिकेत आयुर्वेद ‘पूरक आणि पर्यायी औषध’ म्हणून लोकप्रिय आहे. अनेक विद्यापीठे आणि संस्थांमध्ये आयुर्वेदाचे डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. विशेषतः कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्कमध्ये अनेक आयुर्वेदिक शाळा स्थापन झाल्या आहेत. अमेरिकेतील वेलनेस उद्योगात (उदा. योग आणि स्पा) आयुर्वेदिक उपचार, मसाज (उदा. अभ्यंग), पंचकर्म आणि डिटॉक्स उपचारांची मागणी वाढली आहे. कर्करोग आणि ऑटोइम्यून रोगांसारख्या गंभीर आजारांवर पारंपरिक उपचारांसोबत आयुर्वेदिक उपचार घेण्याचा ट्रेंड वाढत आहे. युरोपमध्येही आयुर्वेदाला मोठी प्रतिष्ठा मिळत आहे, खासकरून जर्मनीमध्ये. जर्मनी हा युरोपमधील आयुर्वेदाचा केंद्रबिंदू मानला जातो. येथे अनेक आयुर्वेदिक क्लिनिक्स आणि पंचकर्म केंद्रे आहेत. जर्मनीमध्ये आयुर्वेदिक उत्पादनांची आणि उपचारांची मागणी सर्वाधिक आहे. अनेक युरोपीय देशांमध्ये (उदा. स्वित्झर्लंड) आयुर्वेदिक वैद्यकीय उपचार आणि उत्पादनांना मान्यता मिळवण्यासाठी नियम शिथिल केले जात आहेत.
बिटनमध्ये योग आणि आयुर्वेद एकत्र शिकवणाऱ्या संस्था कार्यरत आहेत. युरोपमधील लोकांना आयुर्वेदिक उपचारांचे प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय वैद्यांना निमंत्रित केले जाते. जपानमध्ये हर्बल आणि नैसर्गिक औषधांवर मोठ्या प्रमाणावर संशोधन केले जाते. आयुर्वेदिक औषधी वनस्पती, विशेषतः त्यांच्या बायोॲक्टिव्ह संयुगांवर सखोल वैज्ञानिक अभ्यास केला जात आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ‘ट्रॅडिशनल मेडिसिन’ श्रेणीअंतर्गत आयुर्वेदिक उत्पादनांना बाजारात आणण्यासाठी कठोर नियम आहेत, ज्यामुळे उत्पादनांची गुणवत्ता जपली जाते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये योगामुळे आयुर्वेदाच्या जीवनशैलीविषयक दृष्टिकोनाचा प्रसार अधिक वेगाने झाला आहे. आफ्रिका तसेच आग्नेय आशियातही आयुर्वेदाचा मोठाच प्रसार झालेला पाहायला मिळतो.
आयुर्वेद हा केवळ भारताचा वारसा नसून, संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी एक अमूल्य ठेवा आहे. वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे आणि योग्य नियमनासह या प्राचीन जीवनशास्त्राचा प्रकाश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे, ज्यामुळे ‘सर्वे सन्तु निरामयाः’ (सर्वजण निरोगी असोत) ही भारतीय प्रार्थना साकार होत आहे.