

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
माझे सहकारी उपमुख्यमंत्री आणि त्यापेक्षा अधिक जवळचे मित्र अजितदादा यांचे निधन हे मनाला चटका लावणारे आहे. एक तडफदार आणि सतत कार्यमग्नतेची आवड असणारा मौल्यवान सहकारी मी गमावला आहे. आज बारामतीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले आणि ते अनंतात विलीन झाले. त्यांच्या वडिलांचेही नाव अनंतराव.
27 जानेवारीला आम्ही दोघे मंत्रिमंडळ बैठकीत एकत्र होतो. पाठोपाठ मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक माझ्या कक्षात झाली, तेथेही दादा माझ्यासोबत होते. महाराष्ट्रात पायाभूत सुविधांवर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक खर्च होतो, असा दादांनी प्रश्न उपस्थित केला. प्रकल्प लांबू नयेत, यासाठी आम्ही दोघांनीही आसूड उठविले. सार्वजनिक बांधकाम खात्याने सरकारचे 764 कोटी कसे वाचविले, याची माहितीही देण्यात आली. दादांना आनंद झाला. सदोदित तिजोरीची काळजी करणारा अर्थमंत्री म्हणून मी निश्चिंत असायचो. अशाच गोड बातम्या प्रत्येक बैठकीत देत जा, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. पण, अशा बातम्या ऐकण्यासाठी पुढच्याच दिवशीपासून आपण नसू, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. ही बैठक झाल्यानंतर पुन्हा पाऊण तास आम्ही माझ्या दालनात गप्पा मारत बसलो होतो. नियती निष्ठूर असते, आपले काही चालत नाही. कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी मात्र तुम्ही वेळ चुकवली. दादा, ही खंत कायम राहील, तुम्ही अकाली ‘एक्झिट’ घेतली.
आमच्या दोघांचाही वाढदिवस एकच. पण, वयात अंतर 11 वर्षांचे. त्या अर्थानेही माझ्या लेखी ते ‘दादा’च! दादांकडून शिकण्यासारखे काय नव्हते? वक्तशीरपणा, शिस्त, कुणी नाराज झाले तरी चालेल; पण रोखठोक बोलायचे आणि रोखठोक वागायचे. एक तर हो म्हणायचे किंवा नाही म्हणायचे. राजकारणात तसा हा गुण जपणे फार कठीण असते. पण, दादा आतून-बाहेरून एक. दोन चेहरे त्यांनी कधी ठेवलेच नाहीत. फार कमी लोक असतात, ज्यांच्याशी आपण मनातले बोलू शकतो. काही संबंध राजकारणापलीकडचे असतात. जरी वैचारिकदृष्ट्या त्यांचा उल्लेख मी राजकीय मैत्रीच्या उद्देशाने करायचो, तरी आमची मैत्री राजकारणापलीकडची होती. अवांतर विषयांवर बोलण्याची मैफल दादा सोबत असले की घडायची. आम्ही कितीदा रात्री उशिरापर्यंत गप्पा करीत बसायचो. पण, त्यातही त्यांची कामाच्या विषयांची यादी तयार असायची. कोणत्या विषयांवर बोलायचे आहे, याचा कागद हाती असायचा. धीरगंभीर विषयांवर बोलून झाले की, दादांचे व्यक्तिमत्त्व खुलायचे. मग त्यांच्यातील ‘दादा’ व्यक्त व्हायचा. कुणाची आणि कशाचीच पर्वा करायची नाही, असे उत्तुंग आणि दिलखुलास दादा व्यक्त व्हायचे. त्यांच्यातील भावनाप्रधान दादा फार कमी लोकांनी पाहिला. पण, मला तेही दादा अनुभवता आले. कारण आम्ही फार छोट्या कालखंडात पराक्रमच तेवढे केले.
दादा हे कायम माझे मित्र होते. तसे खूप जवळून काम आम्ही 2019 पासून केले असले तरी त्याही पूर्वी विकासाच्या किंवा राज्यहिताच्या विषयांवर आम्ही एकमेकांसोबत होतो. दूरगामी व्हिजन असलेले नेते फार कमी असतात. दादा हे त्यापैकी एक. शब्दाला जागणारा नेता, मित्र कसा असतो, हे मी अत्यंत जवळून दादांच्या बाबतीत अनुभवले आहे. कितीही संकट आले तरी शब्दाला किंमत असते आणि प्रसंगी ती किंमत मोजायचीही असते, हे दादांकडून शिकण्यासारखे आहे. काही इनिंग आम्ही नव्याने सुरू केल्या होत्या. ही इनिंग प्रदीर्घ चालेल, असे वाटत असतानाच दादांनी अकाली एक्झिट घेतली. 2014 नंतर त्यांच्या तोंडी कायम माझे नाव ‘सीएम साहेब’ असे असायचे. 2019 ला ते उपमुख्यमंत्री झाले आणि मी विरोधी पक्षनेता. पण, सभागृहात बोलताना ते हमखास मला ‘सीएम साहेब’ म्हणायचे. मग हळूच जीभ चावून ‘देवेंद्रजी’ म्हणायचे.
राजकारणात अनेकदा वरकरणी माणसं पाहिली जातात, त्यांचे व्यक्तिमत्त्व पाहिले जात नाही. पण, कामाचा प्रचंड आवाका आणि त्यांच्या ठायी असलेला अनुभव या अर्थाने दादा एक अतिशय मोठे नेतृत्व. सकाळी 7 वाजता दिवस सुरू करणारे दादा थांबत नसत. सरकारमध्ये असताना अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागत असतात. क्षणिक ते अप्रिय वाटत असले तरी दीर्घकालीन जनहिताचे असतात. अशावेळी राजकीय कौशल्य पणाला लागत असते. व्यवस्थापन कौशल्यात जोखीम आणि हिंमत दोन्ही ठेवावी लागते. असे निर्णय घेण्यात पण दादा अग्रेसर असत. त्यामुळे त्यांच्यापुढे एखादी फाईल गेली किंवा विषय गेला तर दोनच उत्तरं ऐकू यायची. एक तर होकार किंवा नकार. ‘पाहतो-करतो’ ही शैली दादांना मान्यच नव्हती. या शैलीने क्षणिक लोक दुखावतातही. पण, ती दीर्घकाळासाठी जोडलीही जातात. सभागृहात उत्तरे देतानासुद्धा गुळगुळीत नाहीत, तर ठामपणे उत्तरे देताना ते दिसायचे. सर्वांत महत्त्वाचे सभागृह सुरू होण्यापूर्वी दादा सभागृहात यायचे. मग ते मुंबई असो की नागपूर. सभागृहातील नवीन सदस्यांना शिस्त आणि नियम शिकवण्यातही त्यांचा पुढाकार नेहमी असायचा. मंत्रिमंडळ बैठकीत येण्यापूर्वी प्रत्येक प्रस्तावाचा अभ्यास करून ते आलेले असत. 18-20 विषय असले तरी नेमक्या कोणत्या विषयात कोणता मुद्दा उपस्थित करायचा, हे त्यांना ठाऊक असे.
दादांना बांधकामाची गुणवत्ता या विषयात फार रस. प्रत्येक सरकारी बांधकामावर त्यांची कडक नजर असायची. अनेकदा सकाळी 6 वाजता त्यांनी बांधकामाची पाहणी केली आहे. जराही चूक सापडली, तर समोरच्याची ऐशीतैशी करण्यास ते मागेपुढे पाहात नसत. त्यामुळेच त्यांच्या देखरेखीत झालेल्या सरकारी इमारती खासगीलाही लाजवतील, अशा झालेल्या आहेत. बारामती मेडिकल कॉलेजची वीट न् वीट त्यांनी स्वत:च्या देखरेखीत ठेवली. नियतीने त्याच मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचे पार्थिव आणले, ही पण एक विटंबनाच. मनात आज अनेक वेदना आहेत. आमच्यात काही समानता होत्या. काम घेऊन येणारा आपल्या पक्षाचा की दुसर्या, याचा कधीच विचार दादांनी केला नाही. नेत्याने सतत जनतेत राहायचे असते, हेही पथ्य दादांनी आयुष्यभर पाळले. 24 ु 7 कामात व्यस्तता हेच सूत्र दादांनी कायम पाळले. दादा आणि मला दोघांनाही क्रिकेट सामना बघण्याची आवड. कोणताही सामना असला की मधूनच आम्ही दोघेही ‘स्कोअर’ काय झाला, याची माहिती घेत असायचो. गाणी पण आमचा समान आवडता छंद. त्यातच दादांचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ अफलातून. कितीही गंभीर विषय असूद्या, ते थेट गमतीत बोलून समोरच्याची विकेट बेमालूमपणे घ्यायचे.
दादांना दूध प्यायला खूप आवडायचे. आमच्या हेलिकॉप्टरमध्ये सुगंधी दूध, ताक, कोल्ड्रिंक्स असायचे. पण दादा नेहमीच दुधाला पसंती देत. मी रोज हळद टाकून दूध घेतो, असे ते आवर्जून सांगायचे सुद्धा. एकदा आम्ही विमानप्रवासात होतो. विषय रंगत गेले. मग विषय माझ्या आजवर झालेल्या विमान, हेलिकॉप्टर अपघातांपर्यंत येऊन पोहोचला. मी एकेक प्रसंग रंगवून सांगू लागलो. दादा गमतीने पायलटला म्हणाले, अरे बाबा जवळ कुठली धावपट्टी दिसते का पाहा, मला खाली उतरव आणि मग पुन्हा तू जा. मी दादांना सांगितले की, माझा ट्रॅक रेकॉर्ड आहे, माझे अपघात खूप झाले. पण, काळजी करू नका, मी विमानात असलो की, काही इजा होत नाही. त्याच दादांना विमान अपघाताने आपल्यातून हिरावून न्यावे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. जमिनीशी घट्ट नाळ असलेला माझा अत्यंत जवळचा सहकारी मी गमावला. हे माझे वैयक्तिक नुकसान तर आहेच. पण, महाराष्ट्राचेही मोठे नुकसान आहे. दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे.