गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ‘नॅशनल रोबोटिक्स स्ट्रॅटजी’चा मसुदा सादर करण्यात आला. यामागचा उद्देश रोबोटिक्स तंत्रज्ञानाचे स्थान बळकट करत 2030 पर्यंत देशाला रोबोटिक्स हब म्हणून नावारूपास आणणे. भारतीय रोबोटिक्सच्या विकासाचा वेग पाहिल्यास आपण 2030 पर्यंत रोबोच्या पातळीवर जगात पाचवा क्रमांक मिळवू, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
देशातील बहुतांश उद्योगांसह विविध क्षेत्रात रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. रोबोटिक्सचे वाढते महत्त्व लक्षात घेता त्याची निर्मिती आणि उपयुक्तता वाढविण्यासाठी नवनवीन स्टार्टअपदेखील स्थापन होत आहेत. यात कोणी रोबो सर्जन आहे, कोणी शिक्षक, कोणी रिसेप्शनिस्ट, तर कोणी सफाई कर्मचारी. एआय तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच रोबोटिक्सही प्रगती करत आहे. दुसरीकडे ‘रोबोटिक्स’सारख्या व्यापक क्षेत्रात रोजगारवृद्धीही होणार आहे. उद्योगात रोबो तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भारत आता जगभरातील सातव्या क्रमाकांवर पोहोचला आहे. आगामी काळात रोबोटिक्स क्षेत्रात आपण बाळगलेले ध्येय कधी साध्य होईल, हे पाहणेही महत्त्वाचे आहे. देशातील उद्योगांच्या संख्येचे आकलन केल्यास कामकाजाच्या ठिकाणी रोबोंची संख्या ही असून नसल्यासारखीच आहे; पण कारखान्यांत, उद्योगांत रोबोंचा वापर करण्याच्या आघाडीवर भारत सातव्या क्रमाकांवर पोहोचणे उल्लेखनीय बाब आहे.
विविध उद्योग क्षेत्रात ऑटोमेशन वाढण्याचे प्रमाण पाहता सक्रिय रोबोंची संख्या वाढताना दिसून येत आहे. ऑटोमोटिव्ह आणि उत्पादनासारख्या प्रमुख क्षेत्रात रोबोटिक्सच्या मागणीत वाढ नोंदवली गेली आहे. ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील रोबो इन्स्टालेशनमध्ये विक्रमी 139 टक्के वाढ झाली आहे. देशात उद्योगांशिवाय अन्य क्षेत्रातही रोबोंचा वाढता वापर पाहता आज देशात साठपेक्षा अधिक स्टार्टअप कंपन्या रोबोंची निर्मिती करत आहेत. अनेक कंपन्या मानवाप्रमाणे रोबो तयार करत आहेत. अनुष्का, मानव, मित्रा, शालू आदींचे उदाहरण देता येईल. पैकी कोणी सर्जन, तर कोणी शिक्षक आहे. ‘इस्रो’कडून त्याला अवकाशात पाठविण्यासाठी व्योमचित्र रोबोचा विकास केला जात आहे. लष्करानेही टेहळणी आणि युद्ध मोहिमेत मदतनीस म्हणून रोबोटिक खेचर विकसित केला आहे. आयआयटी कानपूरने तर मॅनहोलची साफसफाई करण्यासाठी सफाई कामगारांचा जीव जाऊ नये यासाठी रोबो तयार केला. स्वदेशी बनावटीचा रोबो ‘मंत्रा’ याने रोबोटिक कार्डियाक सर्जरीचे शतक साजरे केले, तर काही कंपन्यांनी कर्करोग, स्त्रियांसंबंधी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी परिणामकारक रोबोटिक तंत्र आणले.
कामकाजात मदत करणारा रोबो किंवा कृषी, शिक्षण, मनोरंजनासारख्या अन्य क्षेत्रात काम करणार्या रोबोंच्या संख्येत होणारी वाढ याकडे केवळ आकडे म्हणून पाहू नये. रोबो हा कर्मचारी म्हणून किंवा रोजच्या कामकाजात एआययुक्त रोबो किंवा रोबोटस्चा समावेश करणे ही उद्योग क्षेत्रातच नाही, तर देशातील आरोग्य, शिक्षण, उद्योगांसारख्या क्षेत्राचे चित्र बदलून टाकणारी बाब ठरेल. जागतिक अर्थव्यवस्थेत आपल्याला आघाडीचे स्थान मिळवून देण्यात रोबोटिक्स तंत्रज्ञान लाभदायी राहील. त्यामुळे कठीण परिस्थितीत मानवाचे काम सुसह्य करण्यात आणि उत्पादन क्षमता वाढविण्यास रोबो उपयुक्त ठरेल. रोबोच्या प्रवेशामुळे नोकर कपातीची शक्यता राहत असली तरी नवीन काम आणि संधी निर्माण होतील, हेही तितकेच खरे. रोबोटिक्स क्षेत्र व्यापक आहे आणि त्यात अनेकांचे भवितव्य दडलेले आहे. तज्ज्ञांच्या मते, 2030 पर्यंत भारतीय रोबोटिक्सचा वार्षिक बाजार साडेचार अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे वाढता बाजार, विकास आणि व्यापकता पाहता सरकार आणि उद्योग जगताने आणखी एक गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एआय आणि रोबोटिक्स सिस्टीम ही व्यापक प्रमाणात डेटावर काम करते. परिणामी, यावर हॅकर्सची टांगती तलवार असते. म्हणून या डेटाची गोपनीयता आणि सुरक्षा महत्त्वाची ठरत आहे.