Diwali festival | आनंददायी प्रकाशपर्व

Diwali festival
Diwali festival | आनंददायी प्रकाशपर्वPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

दीपोत्सव हे भारतीय लोकसंस्कृतीतील सर्वांत मांगल्यदायी पर्व. अंगणातील सडा-संमार्जन, नक्षीदार रांगोळी, दारात डोलणारे आकाशकंदील, मिणमिणती पणती, स्वादिष्ट फराळाचा घमघमाट आणि पहाटेचे अभ्यंगस्नान या सर्वांचा एक अकृत्रिम अनुबंध प्रत्येक भारतीयाच्या मनाशी जोडलेला असतो. वर्षभराच्या धकाधकीने, तणावाने आणि आर्थिक विवंचनांनी थकलेल्या मानवी मनाला नवी संजीवनी देणारी आश्वासक पहाट म्हणजे दिवाळी. अंधारावर प्रकाशाने मिळवलेला विजय हे या सणाचे मूळ रूपक असून त्यातील मतितार्थ गहन आहे. सृष्टीच्या नियमानुसार अंधार स्वतःहून अस्तित्वात नसतो. तो प्रकाशाचा अभाव असतो. मानवी जीवनात अज्ञान, भीती, नैराश्य आणि संभ्रमाचे सावट गडद होत गेले की पावले अडखळू लागतात. अशा वेळी आशेचा, ज्ञानाचा आणि विवेकाचा एक छोटासा किरणही त्या काळ्याकभिन्न अंधाराला छेद देऊन प्रकाशाची सोनेरी पहाट घेऊन येतो. उंबरठ्यावरील इवलीशी पणती सोसाट्याच्या वाऱ्यातही शांतपणे प्रकाश पसरवते. तिचा हा संयम आणि जिद्दीचा चिरंतन संदेश भारतीय संस्कृतीच्या शिकवणुकीशी सुसंगत आहे.

आजच्या यांत्रिक आणि आभासी युगात हाच संयम आणि विवेक जगाला मार्ग दाखवू पाहात आहे. गेल्या काही वर्षांत जागतिक पटलावर युद्धांचे वणवे आणि पुरवठा साखळीत अडथळ्यांमुळे निर्माण झालेला आर्थिक ताण निवळण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यंदाचे प्रकाशपर्व एका मोठ्या वैश्विक स्थित्यंतराची आणि आशेच्या किरणांची नांदी घेऊन अवतरले आहे. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांचे निकाल लोकशाहीतील सत्तासंतुलनाची ताकद अधोरेखित करणारे ठरले. युद्धखोर धोरणांना मिळालेला हा राजकीय लगाम जागतिक स्तरावर शांततेचे पर्व प्रस्थापित करणारा ठरू शकतो. होर्मुझ सामुद्रधुनीने जगाची झोप उडवली होती. बदललेल्या परिस्थितीत भारतासह चार देशांसाठी होर्मुझ खुली ठेवण्याचा इराणचा पवित्रा अर्थव्यवस्थेसाठी सर्वात मोठी दिवाळी भेट ठरणार आहे. भांडवली बाजारानेही या दोन्ही घडामोडींचे जोरदार स्वागत करत तेजीकडे आगेकूच केली. या जोडीला कच्च्या तेलाच्या भावांमध्ये झालेली घसरण हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. तेल किमती नियंत्रणात आल्याचे दूरगामी सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेसह सर्वसामान्यांच्या जीवनमानावर होतात. रुपयाला आंतरराष्ट्रीय बाजारात भक्कम आधार मिळतोे.

राष्ट्राच्या सामर्थ्याचे एकक असलेल्या परकीय गंगाजळीला सुरक्षितता लाभते. महागाई आटोक्यात येण्यास मदत होते. येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्याने हे बदल दिसू लागतील, ही आशाच नवी उमेद देणारी आहे. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा विकास दर अग्रस्थानी टिकून आहे. देशातील डिजिटल तंत्रज्ञानाचा अभूतपूर्व विस्तार, कर संकलनातील उच्चांक, महामार्ग-रेल्वेचे जाळे आणि देशांतर्गत उत्पादनाला मिळालेली चालना यामुळे भारताचा आर्थिक पाया पूर्वीपेक्षा कितीतरी पटींनी भक्कम झाला आहे. उत्पादन क्षेत्रात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढत असून भारत जागतिक पुरवठा साखळीतील अत्यंत विश्वासार्ह केंद्र म्हणून उदयास आला आहे. अशा भक्कम देशांतर्गत पायाला अनुकूल जागतिक परिस्थितीची साथ मिळाल्यास समृद्धीचा प्रवाह समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पाझरू लागतो. उत्सवाचा खरा मतितार्थ हाच आहे. सणासुदीच्या निमित्ताने बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने ओसंडून वाहत असताना शेतकरी कुटुंबांची दिवाळी कशी साजरी होते आहे, याचेही भान प्रत्येकाने ठेवायला हवे. यंदा दुष्काळामुळे बळीराजा संकटात आहे. त्याच्या व्यथेची दखल घेत आधी राज्य सरकारने आणि आता केंद्र शासनाने थेट खात्यात मदत निधी जमा करून संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. वर्षातील सर्वांत मोठ्या सणाच्या पूर्वसंध्येला मिळालेला हा आर्थिक आधार त्याच्यासाठी मोठा दिलासा आहे.

बळीराजाप्रमाणेच देशांच्या सीमांचे रक्षण करणारे सैनिकही जीवाची बाजी लावून अहोरात्र झटत असतात. या जवानांना दिवाळीच्या दिवशीही ‌‘तैनात‌’ राहावे लागते. या पार्श्वभूमीवर अत्यंत दिलासादायक बाब नुकतीच समोर आली. गेल्या वर्षभरात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एकाही जवानाला कोणत्याही मोहिमेदरम्यान प्राण गमवावे लागलेले नाहीत. १९७९ नंतरच्या ४७ वर्षांत प्रथमच असे झाले. ही सुवार्ता जवानांच्या शौर्याची आणि शासनाच्या नियोजनबद्धतेची साक्ष देणारी आहे. दुसरीकडे, भारतातील अत्यंत गरिबीचे प्रमाण मागील दशकभरामध्ये २७.१ टक्क्यांवरून २.६ टक्क्यांवर आल्याची माहिती जागतिक बँकेच्या पॉव्हर्टी अँड इक्विटी ब्रीफ अहवालाने समोर आणली. या काळात अंदाजे ४९.६ कोटी लोक गरिबीतून बाहेर आल्याचे हा अहवाल सांगतो. या सर्वांची गुंफण केली असता सकारात्मक बदलांचा, परिवर्तनाचा, आशेचा एक मोठा कॅनव्हास दिसू लागतो. भारतीय संस्कृतीने दीपोत्सवाला व्यक्तिगत आनंदाची चौकट कधीच दिलेली नाही. या उत्सवातून कुटुंब, समाज आणि निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ व्हावे हा दिवाळीचा खरा संदेश आहे. आज भौतिक सुख-सोयींची रेलचेल वाढत असताना माणसा-माणसांतील संवाद, आपुलकी आणि विश्वास जपणे अधिक महत्त्वाचे आहे. वैचारिक मतभेदांचे रूपांतर वैमनस्यात होऊ न देणे, सामाजिक सलोखा टिकवणे आणि सार्वजनिक जीवनात विवेकाला प्रतिष्ठा मिळवून देणे ही काळाची गरज आहे.

घराघरांत लावले जाणारे दिवे काही काळासाठी परिसर उजळून टाकतात; पण मनामनांत प्रज्वलित झालेली सद्‌भावनेची ज्योत अनेक पिढ्यांचे जीवन उजळवू शकते. म्हणूनच दिवाळीचा आनंद आपल्या घराच्या उंबरठ्यापलीकडे नेऊन इतरांच्या जीवनातही समाधानाचे क्षण निर्माण करणे गरजेचे आहे. प्रकाश आणि अंधार यांच्यातील संघर्ष हा मानवी जीवनाचा चिरंतन भाग आहे. प्रत्येक पिढीसमोर आव्हानांचे स्वरूप बदलते; परंतु त्यावर मात करण्यासाठी लागणारे धैर्य, आशावाद आणि सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व कधीही कमी होत नाही. आज भारतासमोर प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होत असताना त्या संधींचे रूपांतर सर्वसमावेशक समृद्धीत करण्याची ऐतिहासिक जबाबदारीही आहे. जागतिक शांततेची आशा, राष्ट्रीय सुरक्षेचा विश्वास आणि आर्थिक उन्नतीची उमेद यांना सामाजिक संवेदनशीलतेची जोड मिळाली, तर येणारा काळ अधिक उज्ज्वल ठरू शकतो. पर्यावरणस्नेही जीवनशैली अंगीकारून, स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या मातीच्या पणत्यांना प्राधान्य देऊन स्थानिक अर्थकारणाला बळ देणे, हाच या उत्सवाचा खरा राष्ट्रधर्म ठरेल. प्रत्येकाच्या अंतर्मनात एकात्मतेची, विश्वासाची आणि प्रगतीकडे झेपावण्याची ज्योत प्रज्वलित व्हावी, हीच या प्रकाशपर्वाची खरी फलनिष्पत्ती ठरेल. यासाठी सर्वांना ‌’पुढारी परिवारा‌’तर्फे मंगलमय शुभेच्छा !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.