

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर
महाराष्ट्रातील धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन आणि घटता जलसाठा ही एक मोठी बिकट समस्या बनली आहे. दुष्काळी परिस्थितीत या संदर्भात वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर धरणे बाष्पीभवनामुळे कोरडी पडण्याचा धोका संभवतो.
जगामध्ये सुमारे सात लाख जलसाठे आहेत. त्यांतील पाण्याचे दरवर्षी सुमारे सात टक्के बाष्पीभवन होते आणि त्याचा मानवी जीवनावर प्रतिकूल परिणाम होतो. भारतात ऑक्टोबर महिन्यातील तीव्र उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे महाराष्ट्रातील धरणांमधील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे. राज्यातील जलाशयांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. स्थानिक पातळीवर त्यामुळे पाणी कपात लागू केली जात आहे. यावर्षी अल निनोच्या परिणामामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले. सुरुवातीच्या पावसात जेवढे पाणी साठले, त्यातही आता बाष्पीभवनामुळे घट होत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होणार आहे.
सध्याची जलपातळी आणि उद्याची चिंता
महाराष्ट्रातील धरणांची सध्याची जलपातळी, परिस्थिती आणि बाष्पीभवनामुळे त्यात होत असलेली घट पाहता चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंत महाराष्ट्रातील धरणांमधील सरासरी पाणीसाठा ६९.८ टक्क्यांवर आला आहे. सप्टेंबरअखेर तो साधारणपणे ७२ टक्के होता. त्यातही प्रादेशिक पातळीवरील तफावत लक्षात घेण्यासारखी आहे. कोकण विभागामध्ये १७४ धरणे असून, तेथे ८६.९३ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मराठवाडा विभागात ९३१ धरणे असून, त्यांमध्ये ४१.१४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या प्रदेशातील १०९ लहान व मध्यम सिंचन प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत. त्यामुळे मराठवाड्यात भविष्यात दुष्काळाचे सावट अधिक गडद होणार आहे.
बाष्पीभवनाची प्रमुख कारणे
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पाणीसंकट अधिक तीव्र होण्याचा धोका जाणवत आहे. त्यामागे अनेक कारणे असली, तरी वाढते बाष्पीभवन हा एक चिंतेचा विषय आहे. पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी, शेतीसाठी पाणी सोडण्याची गरज, औद्योगिक वापर आणि पाण्याचा विसर्ग यांमुळे धरणांमधील साठा वेगाने कमी होत आहे. जागतिक हवामान बदल आणि दरवर्षी सातत्याने वाढत असलेले तापमान यामुळे बाष्पीभवनाची तीव्रता वाढली आहे. सुरुवातीच्या पावसानंतर पावसाचे प्रमाण घटत गेल्यामुळे जलपातळी कमी होत आहे. तथापि, अल निनोचा प्रभाव, हवामान बदलामुळे होणारे जागतिक परिणाम, कमी-अधिक दाबाचे पट्टे आणि निसर्गातील अनपेक्षित बदल यांचाही जलसाठ्यावर परिणाम होत आहे. जलसाठ्यावर पडणारी सूर्याची थेट किरणे ऐन उन्हाळ्यात अधिक घातक ठरतात. कर्कवृत्तावर आणि कर्कवृत्ताच्या समीप असलेल्या प्रदेशांत सूर्याची दाहकता अधिक जाणवते. त्याबरोबर बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढते. अशा प्रकारे समस्यांची ही एक दुष्ट साखळी निर्माण झाली आहे.
मुंबई आणि ठाणे विभाग
या विभागामध्ये भातसा, तानसा, मोडकसागर आणि मध्य वैतरणा ही प्रमुख धरणे आहेत. जलपातळीचा परिणाम पाहता असे दिसते की, या भागातील धरणे सहसा ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरलेली असतात. जलपातळी कमी झाल्यास मुंबई आणि ठाण्यात पाणी कपात केली जाते; तर धरणे पूर्ण भरल्यास वर्षभर अखंड पाणीपुरवठा होतो.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड
पुणे विभागात खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही प्रमुख धरणे आहेत. पुण्यातील धरणे लवकर भरतात. परंतु, जलपातळी घटल्यास उन्हाळ्यात पुणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा केला जातो किंवा पाणीकपात केली जाते. शेतीसाठी नदीत पाणी सोडणेही बंद केले जाते.
छत्रपती संभाजीनगर विभाग
बाष्पीभवनाचा सर्वाधिक प्रतिकूल परिणाम छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड महसूल विभागांतील जलसाठ्यांवर होत आहे. जायकवाडी धरणाला मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हटले जाते. येथील नाथसागर जलाशयातून बाष्पीभवनामुळे १.१४ ते २.३ घनमीटर पाणी हवेत उडून जाते. हे प्रमाण ७ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तसेच नांदेड येथील विष्णुपुरी धरणावरसुद्धा बाष्पीभवनाचा प्रतिकूल परिणाम होतो. मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांतील जलसाठेसुद्धा बाष्पीभवनाच्या तडाख्यात सापडले आहेत.
‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी या बाष्पीभवनाच्या संकटाची अवस्था झाली असून, त्यामुळे मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे. शहरी भागात पाणीकपात, शेतकऱ्यांना अपुरा पाणीपुरवठा आणि उद्योगधंद्यांवरसुद्धा पाणी कपातीचे संकट टांगत्या तलवारीसारखे उभे आहे. दुष्काळग्रस्त बीड आणि धाराशिव जिल्ह्यांच्या काही भागांतील नागरिक रोजगारासाठी आणि पाण्याचे संकट लक्षात घेऊन स्थलांतराचा मार्ग अवलंबत आहेत.
दीर्घकालीन गंभीर समस्या
उन्हाळ्यात धरणांमधील एकूण साठ्यापैकी तब्बल १५ ते ३० टक्के पाणी बाष्पीभवनामुळे हवेत उडून जात आहे. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत आहे. पाण्याचे दुर्भिक्ष आणि तुटवडा कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची गरज आहे.
बाष्पीभवन रोखण्यासाठी उपाय
लांबणीवर पडलेला मान्सून आणि तीव्र उन्हाळा यांमुळे बाष्पीभवनाचे चटके महाराष्ट्रातील सर्व प्रमुख प्रदेशांना कमी-अधिक प्रमाणात जाणवत आहेत. त्यातही मराठवाडा आणि विदर्भ या प्रदेशांवर हे संकट अधिक आहे. त्याचे शास्त्रीय आकलन केले असता काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. त्यांचे भान ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी प्रमुख उपायांची नोंद येथे घेतली आहे. जलसाठ्यावर रासायनिक आवरण किंवा रासायनिक थर निर्माण करणे हा एक उपाय आहे. सिटाईल अल्कोहोल किंवा स्टिअरिल अल्कोहोल यांसारख्या पर्यावरणपूरक मानल्या जाणाऱ्या रसायनांचा पाण्याच्या पृष्ठभागावर पातळ थर पसरवला जातो. हा थर सूर्यप्रकाशामुळे होणारे बाष्पीभवन २० ते ३० टक्क्यांनी कमी करतो.
तरंगणारे सौरऊर्जा पॅनल
तरंगते सौरऊर्जा प्रकल्प हाही एक महत्त्वाचा उपाय आहे. धरणाच्या पाण्यावर तरंगणारे सौर पॅनल बसवले जातात आणि त्यामुळे दोन फायदे संभवतात. पहिला म्हणजे पाण्याला सावली मिळून बाष्पीभवन रोखले जाते आणि दुसरा फायदा म्हणजे मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती केली जाते. त्यामुळे पाण्याचे नुकसानही कमी होते आणि दुसरीकडे वीजनिर्मितीचा फायदाही होतो.
प्लास्टिक किंवा थर्माकोलचे आवरण
लहान तलाव किंवा छोट्या जलाशयांमध्ये पाण्याचा पृष्ठभाग झाकण्यासाठी तरंगणारे प्लास्टिकचे गोळे वापरले जातात. त्यामुळे बाष्पीभवन कमी होते आणि पाण्याचे नुकसान टाळले जाते. या सर्व चर्चेवरून हे स्पष्ट होते की, बाष्पीभवनामुळे महाराष्ट्रातील तीव्र पाणीटंचाईच्या संकटात भर पडत आहे. एका बाजूला पाणीसाठ्यात वेगाने घट होत आहे, तर दुसऱ्या बाजूला शेती आणि पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक तीव्र होत आहे. उपरोक्त उपाययोजनांप्रमाणेच प्रतिबंधात्मक आणि धोरणात्मक उपायांचे लाभ लक्षात घेऊन नियोजन करावे लागेल. तसे झाले तरच महाराष्ट्रातील बाष्पीभवनाची समस्या नियंत्रित करणे शक्य होऊ शकेल. तरंगणारे सौर पॅनल बसवून बाष्पीभवनाचे प्रमाण तत्काळ कमी करता येऊ शकेल. त्यासाठी आपण जपान, कोरिया इत्यादी प्रगत देशांतील तंत्रज्ञानाचा अवलंब करून तातडीने उपाययोजना केल्या, तर बाष्पीभवनामुळे हवेत उडून जाणारे बरेच पाणी वाचविणे शक्य होईल.