

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानने भारतापुढे सपशेल शरणागती पत्करली. पण 1965, 1971 आणि 1999 च्या कारगिल युद्धातही पाकितानला भारतापुढे गुडघे टेकणे भाग पडले होते. वारंवार चोप बसल्यावरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच राहिल्या. म्हणूनच ही मोहीम तूर्तास केवळ स्थगित केली आहे. येत्या काही दिवसांत पाकिस्तानची पावले कोणत्या दिशेने पडतात, हे पाहूनच पुढील निर्णय घेतले जातील, असा सावधगिरीचा पवित्रा भारताने घेतला आहे. दणदणीत कारवाईनंतर पाकिस्तान जगभरात भारताला शांत करण्यासाठी दारोदारी भीक मागत होता. पण तीन दिवसांतच भारताने पाकिस्तानचे दहशतवादाचे कारखाने नष्ट केले. शंभरावर दहशतवाद्यांची खांडोळी केली आणि सैन्य तळांवर तुफानी हल्ले केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे वाळवंटातील व पर्वतांवरील युद्धानंतर, नवीन पिढीच्या रणनीतीतही भारताने स्वतःला सिद्ध केल्याचे सांगितले. भारताने गेल्या काही वर्षांत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त केली असून, या युद्धात त्याचा यथायोग्य प्रत्यय आला. भाषणात पंतप्रधानांनी यापुढे कोणताही दहशतवादी हल्ला झाला, तर त्याला आमच्या पद्धतीने चोख प्रत्युत्तर दिले जाईल. कुणीही अण्वस्त्रांची धमकी दिली, तरी तिला भीक न घालता निर्णायक प्रहार केला जाईल, अशा स्पष्ट शब्दांत पाकिस्तानला इशारा दिला आहे. वर्षानुवर्षे पाकिस्तानकडे अण्वस्त्रक्षमता असल्यामुळे भारताने कठोर कारवाई करू नये, अशी जागतिक महाशक्तींची भूमिका होती. पण असल्या ब्लॅकमेलिंगला भीक घातली जाणार नाही, हे पंतप्रधानांनी निःसंदिग्ध शब्दांत सुनावले.
वास्तविक 18 मे 1974 रोजी राजस्थानातील पोखरण येथे भारतीय अणुशास्त्रज्ञांनी पहिली अणुचाचणी यशस्वी करून भारताची अण्वस्त्रक्षमता सिद्ध केली. भारताच्या या चाचणीमुळे जगाला आश्चर्यमिश्रित धक्का बसला आणि भारताला टीकेलाही सामोरे जावे लागले. पण 1962 ते 1972 या दहा वर्षांच्या काळात भारताला चीन आणि पाकिस्तान या शेजारी देशांच्या आक्रमणांचा सामना करावा लागला होता. 1964 मध्ये चीन अण्वस्त्रसज्ज झाला होता; तर 1971 च्या बांगला देश युद्धातील पराभवानंतर पाकिस्तानने चीनच्या मदतीने अण्वस्त्रसज्जतेच्या दिशेने वाटचाल सुरू केली. स्वसंरक्षणाच्या दृष्टीने भारताने अण्वस्त्रसज्ज होण्याचा निर्णय घेतला.
इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला, त्याविषयी कमालीची गुप्तता पाळली होती. स्वतः इंदिरा गांधी, त्यांचे सचिव पी. एन. हक्सर व पी. एन. धर, संरक्षण मंत्रालयाचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ. नाग चौधरी, डॉ. होमी सेठना आणि डॉ. राजा रामण्णा अशा केवळ सहाच व्यक्तींना या निर्णयाची माहिती होती. पण भारताने शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा वापर करण्याचे धोरण जाहीर करून जागतिक टीकेची धार कमी केली. त्यानंतर 24 वर्षांनी, वाजपेयी पंतप्रधान असताना, 11 मे 1998 रोजी दुसर्या चाचणीद्वारे भारताने अण्वस्त्रसज्जता पुन्हा जाहीर केली. त्यावेळी केलेल्या तीन चाचण्यांपैकी एक हायड्रोजन बॉम्बची होती. त्यानंतर 28 मे 1998 रोजी पाकिस्तानने बलुचिस्तानातील चगाई टेकड्यांच्या परिसरात 6 अणुस्फोट चाचण्या केल्या.
पाकिस्तानने आमच्याकडे अण्वस्त्रे आहेत आणि त्यांच्या बळावर आम्ही वाट्टेल तसा दहशतवाद करू, असा पवित्रा धारण केला. पाकिस्तानने भारतात बॉम्बस्फोट केले, गोळीबार केला, तरी भारताने एका मर्यादेपलीकडे प्रतिहल्ले करू नये, असा बड्या देशांचा आग्रह असे. पण यापुढे मात्र हे सहन केले जाणार नाही, अशी कडक भूमिका भारताने आता घेतली आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला तेथील लष्करी अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे सरकार पुरस्कृत दहशतवादाचा हा सर्वात मोठा पुरावा असल्याचे उघड आहे.
काही वर्षांपूर्वी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी एका मुलाखतीत दहशतवादी हे ‘नॉन-स्टेट अॅक्टर्स’ आहेत, असे शब्द वापरले होते. त्यांचा सरकारशी काहीच संबंध नाही आणि दहशतवादी कृत्यांची जबाबदारी सरकार कशासाठी घेईल, असा त्यांचा पवित्रा होता. पण आता इतका मोठा पुरावा सादर केल्यामुळे झरदारींचे दात घशात गेले आहेत! बहावलपूर आणि मुरीदकेसारखे तळ ही जागतिक दहशतवादाची विद्यापीठे होती, असे उद्गार मोदी यांनी काढले आहेत.
अमेरिकेवरील 9-11 चा हल्ला, लंडन ट्यूब बॉम्बस्फोट अशा अनेक घटनांमागे पाकिस्तानी दहशतवादीचे होते. एवढेच कशाला, ओसामा बिन लादेनला पाकिस्तानातच लपवले होते आणि लादेन कुठे आहे, हे ठाऊकच नाही, असे पाकिस्तानचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष झरदारी म्हणत होते. त्यामुळे पकिस्तानच्या कोणत्याही वक्तव्यावर काडीचाही विश्वास ठेवता येणार नाही. शिवाय भारताने पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वस्ती वा धर्मस्थळावर हल्ला केलेला नाही. उलट पाकिस्तानने भारतातील शाळा व महाविद्यालये, गुरुद्वार व मंदिरे आणि सामान्यांची घरे यांना लक्ष्य करण्याचा नीचपणा केला आहे.
यापुढे पाकिस्तानशी चर्चा ही केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर परत करणे या दोन मुद्द्यांवरच होईल. दहशतवाद आणि व्यापार तसेच रक्त आणि पाणी हे एकत्र वाहू शकत नाही, असा खणखणीत इशाराच पंतप्रधानांनी दिला आहे. तसेच ज्या दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे, तोच एक दिवस पाकिस्तानला गिळंकृत करेल, असे सूचित करून, उद्या पाकिस्तान एक राष्ट्र म्हणून शिल्लक राहील की नाही, अशी शंकाही त्यांनी अप्रत्यक्षपणे अधोरेखित केली. संघर्ष थांबवा, नाहीतर व्यापार करणार नाही, असा थेट इशारा भारत-पाकिस्तानला दिल्यामुळे शस्त्रसंधी झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. पण मोदी यांनी भाषणात अमेरिकेचा उल्लेखही केलेला नाही. भारत हा दहशतवादाशी युद्ध करू इच्छतो. पण भारत हा युद्धखोर देश नाही, हे लक्षात घेतले पहिजे. भगवान बुद्धाने जगाला शांततेचा मार्ग दाखवला. परंतु हा मार्गही शेवटी शक्तीतूनच जातो, असा संदेश पंतप्रधानांनी दिला आहे. अवघ्या जगाने या संदेशाची अवश्य दखल घेतली पाहिजे.