

सुरेश पवार
पृथ्वीचा कललेला आस हा दक्षिणायण आणि उत्तरायण होण्याला कारणीभूत ठरतो. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धापासून सूर्य सर्वाधिक दूरच्या बिंदूवर असताना उत्तर गोलार्धात सर्वाधिक मोठी रात्र आणि सर्वाधिक लहान दिवस होतो. दरवर्षी 21 डिसेंबरला अशी स्थिती होते. पुण्यातील दिनमानानुसार या दिवशी 10 तास 57 मिनिटांचा दिवस तर 13 तास 3 मिनिटांची रात्र असेल.
21 डिसेंबरपासून उत्तरायण सुरू होते आणि दिवस मोठे होत जातात. रात्र लहान होत जाते. 21 मार्चला दिवस आणि रात्र यांचा कालावधी मात्र समान म्हणजे 12-12 तासांचा होतो. त्यानंतर 21 जूनला सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान कालावधीची रात्र होते. 21 जूनपासून दक्षिणायण सुरू होते. त्यानंतर दिवस लहान आणि रात्रीचा कालावधी मोठा होत जातो. 21 सप्टेंबरला पुन्हा दिवस आणि रात्रीचा कालावधी समान होतो आणि 21 डिसेंबरला सर्वात मोठी रात्र होते.
पृथ्वीचा आस 23.5 अंशांनी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणावेळी जी बाजू सूर्यासमोर सर्वाधिक काळ राहते, त्या काळात उन्हाळा आणि मागील बाजूस हिवाळा असे ऋतुमान होत असते.
उत्तरायण सुरू होते, त्या दिवसाला म्हणजे 21 डिसेंबरला प्राचीन काळापासून धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही असल्याचे दिसून येते. प्राचीन इजिप्त संस्कृतीत ‘आयसिस’ या देवीने बालसूर्याला या दिवशी जन्म दिला, असे मानले जात असे. रोमन समाजात सात दिवसांचा सण साजरा केला जाई. ब्रिटनमधील स्टोनहेज ही दगडांची जी विशिष्ठ रचना आहे, ती 31 डिसेंबर या दिवशीच्या सूर्योदयाचे प्रतीक असल्याचे समजले जाते. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीत या दिवशी ‘फिस्ट ऑफ ज्यूल’ हा सण साजरा केला जातो.
भारतामध्ये उत्तरायण सुरू झाल्यानंतर मकर संक्रातीचा सण साजरा होतो. मकर संक्रांतीला स्नेहाचे प्रतिक म्हणून तीळगूळ वाटले जाते. रथ सप्तमी दिवशी सूर्यपूजन केले जाते. पाटावर रांगोळीने सूर्यप्रतिमा रोखून त्याची पूजा केली जाते. प्राचीन सूर्यपूजेची प्रथा या निमित्ताने पुन्हा उजळली जाते.
तामिळनाडुत संक्रांतीच्या आदल्या दिवसापासून तीन दिवसपर्यंत पोंगल सण साजरा होतो. तांदळाच्या खिरीचा नैवेद्य सूर्य देवतेला दाखवला जाते. दक्षिणी राज्यातही अशी प्रथा आहे.
मकर संक्रातीच्या एक दिवस आधी पंजाब, हरियानात लोहडी सण मोठ्या जल्लोषात साजरा होतो. सायंकाळी अग्नी प्रदीप्त करून नाच -गाण्याचा फेर धरला जातो. तीळगूळ, रेवड्या, शेंगा, भाजलेले मक्याचे कणिस यांची देवाण घेवाण होते आणि आनंदाने त्याचा आस्वाद घेतला जातो. नवजात बालकाच्या जन्मानंतरचा पहिला लोहडी सण मोठ्या थाटामाटात, उत्साहात साजरा केला जातो.
मकर संक्रांतीला आकाश निरभ्र असते. आल्हाददायक हवामान असते. अशा उत्साही वातावरणात देशात विशेषतः उत्तर भारतात पतंग महोत्सवाला दणक्यात प्रारंभ होतो. पतंग महोत्सव म्हणजे जणू सूर्य देवतेला अभिवादनच होते.
उत्तर भारतात मकर संक्रांतीनिमित्त खिचडी पर्व साजरे होते आणि नदीमध्ये स्नान करून भाविक सूर्याला अर्ध्व देतात. या प्राणदात्या देवतेचे स्मरण करतात.
सूर्य ही आर्यांची प्रमुख देवता. उत्तर ध्रुवाजवळील प्रदेशात आर्यांचे मूळ वस्तीस्थान होते, असे म्हटले जाते. स्वाभाविक त्या अतिथंड प्रदेशात आर्य समूहाला सूर्य हा प्राणदाता, अन्नदाता म्हणून देव स्वरूपात भावला असल्यास नवल नाही. सूर्य देवतेविषयीच्या ऋचा प्रसिद्ध आहेत. ही सूर्योपासनेचा परंपरा या सणासुदीच्या रूपाने रूढ झालेली आहे.
हिवाळा संपत येत असतो. उन्हाळा उंबरठ्यावर असतो. चैत्र पालवी दृष्टीपथात असते. थंडी आता पूर्ण गेली, असे समजून होळी पौर्णिमा साजरी होते. भारतात उत्तरायणामध्ये अशा रीतीने सणांचा आनंदोत्सव सुरू होतो.