

के. एन. पणिक्कर
इतिहासकार डावा की उजवा, ही चर्चा कालसापेक्ष. त्यावर प्रस्थापित आणि तत्कालीन समाज व्यवस्थेचा पगडा नाकारता येत नसतो. बर्याचदा लोकानुनयापासून फारकत घेणारी, सुधारणांचा आग्रह धरणारी भूमिका अनेकदा डावी आणि काही वेळा उजवी ठरत असते. ज्येष्ठ इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ के. एन. पणिक्कर यांच्या निधनाने या मुद्द्यावर चर्चा होणे साहजिक. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांचे केरळमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी इतिहासाची केलेली मांडणी या अर्थाने डावी ठरली. त्यांचा मार्क्सवादी विचार दडून राहिला नसला, तरी अधिक डावीकडे न झुकता घटनात्मक चौकटीचा आदर राखून त्यांनी धर्मनिरपेक्ष द़ृष्टिकोनाचा पुरस्कार त्यांच्या इतिहास मांडणीत आणि सामाजिक विचारात केलेला दिसतो.
केरळच्या प्रसिद्ध गुरुवायूर या जागतिक पातळीवरील धर्मस्थळी जन्मलेले पणिक्कर केरळच्या शंकराचार्य संस्कृत विद्यापीठाचे कुलपती होते, हे सोयीस्कररित्या सांगितले जात नसले, तरी या पदावरील त्यांचे कार्यही दुर्लक्षिण्यासारखे नाही . केरळचा ऐतिहासिक ठेवा उलगडण्यात त्यांचे संशोधन अनेक अर्थाने उपयोगाचे ठरले. केरळ ऐतिहासिक अनुसंधान परिषदेचे ते संस्थापक अध्यक्ष. सलग सतरा वर्षे त्यांनी या संस्थेचे नेतृत्व करताना इतिहासाकडे पाहण्याचा विवेकी द़ृष्टिकोन संशोधनातून त्यांनी दिला. चौदाव्या शतकात मसाल्याचे व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेले आणि कालौघात नामशेष झालेले, ‘भारताची पहिली बाजारपेठ’ म्हणून ओळख असणार्या ‘मुझिरिस’ या प्राचीन बंदराचा शोध आणि त्याचे रोम साम्राज्याशी असलेले ऐतिहासिक, भूराजकीय संबंध शोधण्यात त्यांचे योगदान मोठे. विशेष म्हणजे, या स्थळाचे पुरातत्त्वीय उत्खनन अजूनही सुरू आहे. याचे सारे श्रेय पणिक्कर यांचेच. या ठिकाणी भरवले जाणारे समकालीन कलेवर प्रकाशझोत टाकणारे कला प्रदर्शन देशाच्या या वारशाकडे आणि समृद्ध संस्कृतीकडे लक्ष वेधते. भारतातील समकालीन कलेची मांडणी करणारे ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. त्याला याच इतिहासकाराच्या कल्पनेची किनार आहे.
आधुनिक भारतीय इतिहासाच्या अभ्यासात प्रगतिशील द़ृष्टिकोनाला प्राधान्य देणारे पणिक्कर जवाहरलाल नेहरू विद्यापीठात इतिहास विभागाचे प्रमुख होते आणि हाच विचार त्यांनी या पदावर असताना पुढे नेण्याचा, ठामपणे मांडण्याचा प्रयत्न केला. प्रखर बुद्धिवादी मांडणी आणि इतिहासाच्या अभ्यासात वैज्ञानिक द़ृष्टिकोनाचा आग्रह धरल्याने त्यांच्या या भूमिकेवर वाद-चर्चा झाली. इतिहास, समाज, धर्म आणि राजकारण याची चिकित्सा त्यांनी आपल्या ग्रंथामधून केली. केरळ मधील मोपल्याचे बंड, शेतकरी आंदोलन, ब्रिटिश काळातील जमीनदारी, धर्म आणि सामाजिक संघर्ष यामागील कारणमीमांसा त्यांनी केली. हिंदू-मुस्लीम राजकारणाचा इतिहास उलगडून दाखवताना भारतातील धर्म आणि जातीवादाकडे समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विशेषतः राजकीय पक्ष आणि धर्माचे संबंध विस्तृतपणे समोर ठेवले. आधुनिक भारतातील संस्कृती, विचारधारा आणि सामाजिक चळवळी हा त्यांच्या शोधाचा गाभा. स्वातंत्र्यलढ्याचा साधार इतिहास त्यांनी भारतीय इतिहास संशोधन मंडळाच्या माध्यमातून शोधला. वस्तुनिष्ठतेचे प्रमाण असणारा इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ देशाला का हवा असतो, याचे उत्तर त्यांच्या योगदानातून मिळते. पणिक्कर मोठा ऐवज पुढील पिढ्यांसाठी ठेवून गेले. त्याकडे केवळ विचारसरणीच्या द़ृष्टिकोनातून पाहता येणार नाही.