Semiconductor | सेमीकंडक्टरची पहाट

dawn of semiconductors
Semiconductor | सेमीकंडक्टरची पहाट(Pudhari File Photo)
Published on
Updated on

एकविसावे शतक तंत्रज्ञानाचे असून एआय यासारख्या तंत्रज्ञानामुळे ते कमालीच्या वेगाने पुढे पावले टाकत आहे. त्यामुळे सारे जगच कमालीचे बदलून जाताना दिसते. ही खर्‍याअर्थाने त्याची सुरुवात असून मानवी जीवन सुलभ करण्याबरोबरच नवे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण करण्याचे अफाट सामर्थ्य त्यात आहे. विकास प्रक्रियेत ते महत्त्वाचे साधन ठरणार असून अवघ्या जगातील सर्वच घटक त्याचे लाभार्थी ठरतील, अशी आशा आहे. मानवाला सतत शिकत ठेवण्याचे वा शिकायला लावण्याची ताकद आहे. त्यानुसार नोकरदार अथवा उद्योजकांना केवळ पदवीवर समाधान मानून चालत नाही, तर सतत नवनवे तंत्रज्ञान शिकावे लागते आणि कार्य पद्धतीत अथवा उत्पादन पद्धतीत बदल करावा लागतो. या बदलत्या तंत्रज्ञानाचा आत्मा ज्यात असतो त्या सेमीकंडक्टरचे महत्त्व साहजिकच फार मोठे. खनिज तेल हे काळे सोने आणि सेमीकंडक्टर हे डिजिटल डायमंड असल्याचे मानले जाते. तेलाने मागच्या शतकाला आकार दिला आणि आता ती शक्ती एका छोट्याशा चिपमध्ये एकवटली. या चिप्सशिवाय डेटा प्रोसेसिंग, एआय, अक्षय ऊर्जा प्रणाली किंवा आधुनिक संप्रेषण या गोष्टी कार्यान्वितच होऊ शकत नाहीत.

आरोग्यसेवांपासून सुरक्षेपर्यंतच्या सर्व अत्यावश्यक गरजांसाठी सेमीकंडक्टरचे आरेखन व उत्पादन जरुरीचे असते. माणसाच्या फक्त एका बोटावर मावेल इतक्या आकाराच्या; पण आत असलेल्या कोट्यवधी ट्रान्झिस्टर्सच्या आधारे उच्च कोटीची गणना क्षमता प्राप्त झालेल्या आणि त्यामुळेच संपूर्ण डिजिटल जगाचा आधारस्तंभ असलेल्या सेमीकंडक्टर चिपची निर्मिती प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असते. तिची निर्मिती करणारा कारखाना म्हणजे अभियांत्रिकीचा अनोखा आविष्कारच असल्याचे मानले जाते. जपान, अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, तैवान या देशांत हे तंत्रज्ञान विकसित झाले असून भारतातील उत्पादक कंपन्यांना त्यावर अवलंबून राहावे लागते. भारतासह अन्य काही देश आता ही कोंडी फोडण्याच्या तयारीत आहेत. त्यावरील मोठा खर्च हे एक मोठे आव्हान होते. त्याशिवाय देशांतर्गत उत्पादनाची साखळीच नसल्याने त्याची गरजही सीमित राहिली. त्याचमुळे भारत या क्षेत्रात मागे राहिला. चिपच्या फॅबि—केशनचा कारखाना उभा करण्याचा खर्च हा 1500 ते 2000 हजार कोटी डॉलर इतका मोठा असतो.

भारत हा चिप डिझाइनिंग क्षेत्रातील एक महत्त्वाची शक्ती आहे. सर्व महत्त्वाच्या सेमीकंडक्टर कंपन्यांची डिझाईनविषयक कार्यालये भारतात आहेत; पण तेथील अभियंते आजपर्यंत विदेशी कंपन्यांसाठी सिस्टीम्स डिझाईन करत होते. त्यामुळे भारतीय कंपन्यांमार्फत बुद्धिसंपदेची स्वतंत्रपणे निर्मिती केली जात नव्हती. ‘चिप डीएलआय योजना’ ही या प्रकारची परिस्थिती बदलण्यासाठी टाकलेले खास पाऊल आहे. सेमीकंडक्टर उद्योग क्षेत्राची उलाढाल येत्या काही वर्षांत 1 ट्रिलियन डॉलरहून अधिक होईल आणि यात भारताचा महत्त्वाचा वाटा असेल, असा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत सेमिकॉन इंडिया परिषदेचे उद्घाटन करताना व्यक्त केला आहे. आज 600 अब्ज डॉलर इतके मूल्य असलेले सेमीकंडक्टर उद्योग क्षेत्र येत्या काही वर्षांत खूप विस्तारेल. भारताने 2021 मध्ये सेमीकंडक्टर कार्यक्रम सुरू केला आणि 2023 मध्ये पहिल्या प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत भारतातील 10 प्रकल्पांमध्ये दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. मायक्रॉन आणि टाटा या कंपन्यांनी प्रायोगिक तत्त्वावरील चिपची निर्मिती आधीच केली आणि याच वर्षी भारतातील पहिली व्यावसायिक चिप दाखल होईल. सेमीकंडक्टर क्षेत्रातील वेग हा महत्त्वाचा घटक लक्षात घेऊन केंद्र सरकारने सेमीकंडक्टर निर्मिती क्षेत्रासाठी ‘एक खिडकी योजना’ आणली. देशात ‘प्लग अँड प्ले’ तत्त्वावर सेमीकंडक्टर पार्क उभारले जात आहेत. तेथे सर्व त्या पायाभूत सुविधा, गुंतवणूकदारांसाठी आकर्षक सवलती दिल्या जात आहेत; मात्र सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी ज्या ज्या डिजिटल पायाभूत सुविधा आवश्यक असतात, त्यांचा पाया रेअर अर्थ म्हणजेच दुर्लभ खनिजांवर आधारित असतो.

सध्या ती चीनमधून मोठ्या प्रमाणात आयात केली जातात; पण ही खनिजे देशातच मिळावी, यासाठी सरकारने ‘राष्ट्रीय क्रिटिकल मिनरल मिशन’ची स्थापना केली. आता या मिशनचे काम झपाट्याने सुरू झाले पाहिजे आणि त्यासाठी सरकारने आवश्यक ती आर्थिक तरतूदही केली पाहिजे. मोबाईल, स्कूटर, फ्रिज, वाहने यासारख्या असंख्य उत्पादनात सेमीकंडक्टरचा वापर वाढावा, निर्मिती भारतात व्हावी, यासाठी केंद्र सरकारने ‘रचना आधारित प्रोत्साहन योजना’ लागू केली. देश सेमीकंडक्टर मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्यात प्रवेश करत असून, नव्या पिढीचे युग आता अवतरेल. डिझाईन इन इंडिया, मेड इन इंडिया हे भारताचे स्वप्न असून, त्याची पूर्ती करण्यासाठी राज्यांचे सहकार्यही आवश्यक असेल. कोरोना काळात जागतिक चिपपुरवठा साखळी भंग पावल्याने विविध उद्योगांच्या उत्पादनास फटका बसला. ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, नेटवर्किंग उपकरणे, वाहन उद्योग यांना याचा सर्वात जास्त तडाखा बसला.

आज भारतात 65 कोटींहून अधिक स्मार्ट फोन वापरकर्ते आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन दरवर्षी 12 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. दुसरीकडे भारत एआयआधारित प्रणाली डेटा सेंटर आणि सेमीकंडक्टरची गरज असलेली इलेक्ट्रिक वाहनेही विकसित करत आहे. भारताला उत्पादक राष्ट्र बनवणे, हे सरकारचे ध्येय आहे. सेमीकंडक्टर कारखान्यांमधून होणारे उत्पादन दूरसंचार, वाहन उद्योग, डेटा सेंटर, औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रासाठी सेवा उपलब्ध करून देईल. म्हणजेच भारत हा संपूर्ण सेमीकंडक्टर मूल्य साखळीसाठी एक स्पर्धात्मक केंद्र म्हणून उदयास येत आहे. तंत्रज्ञानाच्या या पहाटेचे स्वागतच केले पाहिजे. अर्थात, त्यातून नवे प्रश्न निर्माण होतील; मात्र त्या आव्हानाला सामोरे जाण्याची शक्तीही या तंत्रज्ञानातूनच मिळेल. विकासाच्या प्रवाहात वाढत चाललेली दरी आणखी रुंदावणार नाही, शेवटच्या घटकालाही त्यात सामावून घेतले जाईल, याची खबरदारी घ्यावी लागेल. सेमीकंडक्टर्सच्या निर्मितेने भारत या क्षेत्रातही स्वावलंबी होईल आणि ते कालांतराने स्वस्तात उपलब्ध होऊ शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news