

सचिन बनछोडे
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे पुत्र आणि बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीचे (बीएनपी) नेते तारिक रहमान यांचे ख्रिसमसच्या दिवशी, सुमारे 17 वर्षांच्या स्वेच्छेने स्वीकारलेल्या परदेशवासानंतर मायदेशी भव्य पुनरागमन झाले. बांगला देशातील सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर रहमान यांचे पुनरागमन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. जुलै महिन्यात झालेल्या हिंसक नागरी उठावामुळे शेख हसीना यांना सत्ता सोडावी लागली होती आणि त्यांचे अवामी लीग सरकार कोसळले होते. शेख हसीना सध्या भारतात असून त्यांच्यावर बांगला देशात मृत्युदंडाची टांगती तलवार आहे. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘डार्क प्रिन्स’ असे म्हटल्या जाणार्या तारिक रहमान यांच्या पुनरागमनाने अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत.
ढाका विमानतळावर उतरताच तारिक यांनी अनवाणी पायाने जमिनीला स्पर्श केला आणि माती कपाळाला लावली. त्यांचे लाखो समर्थकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. निवडणुकीचे रणशिंग फुंकताना रहमान म्हणाले, ‘मार्टिन ल्यूथर किंग यांच्याप्रमाणेच मलाही सांगायचे आहे की, माझ्याकडे बांगला देशसाठी एक स्वप्न, सुनियोजित आराखडा आहे.’ दि. 2 फेब्रुवारी रोजी होणार्या सार्वत्रिक निवडणुकीत ते आणि त्यांची आई उमेदवार होण्याची शक्यता असून, विजय मिळाल्यास ते देशाचे पुढील पंतप्रधान होऊ शकतात.
टीकाकारांचा असा दावा आहे की, जेव्हा ‘बीएनपी’ आणि जमात-ए-इस्लामी युतीचे सरकार सत्तेत होते आणि खालिदा जिया पंतप्रधान होत्या, तेव्हा 2001 ते 2006 या काळात ‘डार्क प्रिन्स’ रहमान हेच खरे सत्ताधीश होते. त्याकाळी रहमान ‘हवा भवन’मधून कारभार पाहत असत. ही दोन मजली इमारत अधिकृतपणे त्यांचे कार्यालय असली, तरी प्रत्यक्षात ते एक समांतर पंतप्रधान कार्यालय होते. राजनैतिक अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणांच्या मते, हवा भवन हेच सत्तेचे मुख्य केंद्र बनले होते. बीएनपी-जमात सरकार कोसळल्यानंतर आणि रहमान यांनी देश सोडल्यानंतर, ‘प्रिन्सच्या राजवटीची’ भीषण चित्रे समोर आली.
2004 मध्ये शेख हसीना यांच्यावर झालेला ग्रेनेड हल्ला आणि आसाममधील ‘उल्फा’ फुटीरतावाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवण्याचे जाळे या सर्वांचा केंद्रबिंदू ‘हवा भवन’ असल्याचे आरोप झाले. 2006 ते 2008 दरम्यान हे सर्व अचानक थांबले. 2008 च्या निवडणुकीत अवामी लीगचा विजय झाला. 2007 मध्ये काळजीवाहू सरकारने रहमान यांना भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. 17 महिने कोठडीत राहिल्यानंतर 2008 मध्ये उपचारांसाठी त्यांची लंडनला रवानगी झाली, तेव्हापासून ते तिथेच होते. 25 डिसेंबरला मायदेशी परतलेल्या रहमान यांचे भाषण केवळ 17 मिनिटांचे होते; मात्र त्यात मोठा राजकीय संदेश होता. या भाषणात त्यांनी हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही समुदायांना एकत्र येऊन ‘नवा बांगला देश’ घडवण्याचे आवाहन केले. मोहम्मद युनूस यांच्या काळात कट्टरतावादी घटक सक्रिय झाले असताना रहमान यांचे हे भाषण भारतासाठी अनुकूल मानले जात आहे.