

शरयू माने
नृत्य ही केवळ कला नसून भावना, संस्कृती आणि मानवतेला जोडणारी एक सार्वत्रिक भाषा आहे. 29 एप्रिल हा बॅले नृत्याचा जनक जीन जॉर्जेस नोव्हेरे यांचा जन्मदिवस जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त...
नृत्य ही एक देहबोली आहे, ती नृत्यातून व्यक्त होते. भावनांचे आणि त्या अनुषंगाने देहबोलीचे सादरीकरण नृत्यातून केले जाते. मग, तो नृत्य प्रकार कोणताही असो. पूर्वी नृत्यात तांत्रिक बाबी जास्त असायच्या. मुखवटे, जड शृंगार इत्यादी. त्यामुळे भावनांचे सादरीकरण त्याच्या ओझ्याखाली लपून जायचे आणि थोडेसे ते उपद्रवी वाटायचे; पण ते तसे नक्कीच नसायचे. अजूनही बोजड शृंगारातील नृत्य लहान मुलांना तितकीशी भावत नाहीत. त्याकडे पूर्वी मोठ्यांसाठी कला म्हणूनच पाहिले जायचे.
जीन जॉर्जेस यांचा बॅले डान्स हा नृत्याविष्कार लोकांना भावून गेला. पूर्वी बॅले डान्स तांत्रिक कौशल्यापुरताच मर्यादित होता. जीन यांनी त्यात अॅक्शन आणि इमोशनची भर टाकली. कालांतराने बॅले डान्स प्रकार अभिनयप्रधान नृत्य म्हणून प्रचलित झाले. जीनने या नृत्याचे नाव ‘बॅले डी अॅक्शन’ असे ठेवून एकप्रकारे त्या नृत्यप्रकाराचे बारसे घातले म्हणायला हरकत नाही. यानंतर त्यांनी बॅलेमध्ये मुखवटे परिधान करणे टाळले. चेहर्यावरील हावभाव प्रेक्षकांना भावू लागले. ती जीनच्या या आविष्काराला मिळालेली पोचपावती होती. हा नृत्याचा प्रकार पॅरिस आणि फ्रान्स या जीन यांच्या मायदेशी इतका प्रचलित झाला की, जीन यांच्या पश्चातसुद्धा या नृत्याविष्काराला प्राधान्य प्राप्त झाले. एवढेच नाही, तर जगभरातील नृत्य कलाकार जीन यांच्या जन्मदिनी आपली कला सादर करून त्यांचा जन्मदिवस साजरा करू लागले. इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटद्वारे (आयटीआय) 1982 पासून जागतिक नृत्यदिन 29 एप्रिल रोजी जीन जॉर्जेस नोव्हेरे यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जातो. आयटीआय ही युनेस्कोची भागीदारी असलेली संस्था आहे. 29 एप्रिल या दिवशी जगभरातले नृत्यकलाकार आपल्या कला प्रदर्शित करतात. हा दिवस साजरा करण्यामागे उद्देश हाच आहे की, नृत्य कलेला प्रोत्साहन देणे, सांस्कृतिक अडथळ्यांना दूर करणे आणि ही एक वैश्विक भाषा म्हणून अंगीकारता आली पाहिजे, तसेच या कलेला जागतिक कलेचा दर्जा प्राप्त झाला पाहिजे! नृत्यामध्ये कोणतेही तांत्रिकीकरण मध्ये न येता निव्वळ आनंदच पसरवता यावा, हा मूळ उद्देश हा दिवस साजरा करण्यापाठचा आहे.
या दिवशी जगभरात नृत्याच्या कार्यशाळा ठिकठिकाणी घेतल्या जातात. डान्स शोज, नृत्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. सर्वोत्कृष्ट नृत्य कलाकाराला बक्षीस दिले जाते. नृत्याला केवळ मनोरंजन म्हणून न पाहता त्याला अभिव्यक्तीचे एक सशक्त माध्यम म्हणून पाहिले पाहिजे. एरवी राग, लोभ, भांडण, तंटे यामध्ये शब्दांचा जोरदार आणि नको तेवढा वापर होतो. लढाया होतात, महायुद्धे देशादेशांत चालतच राहतात; पण नृत्यामुळे मृत भावनांचे कवच उघडे पडून व्यक्त होण्याचे बीज पेरले जाते. एरवी न बोलणारही नृत्याच्या तालावर नाचू लागतात. तसे भारतीय संस्कृतीत प्रांतानुसार वेगवेगळे नृत्य प्रकार पाहायला मिळतात. भरतनाट्यम, कुचीपुडी, गरबा, लावणी, भांगडा या सर्व नृत्य कलांमध्ये त्या त्या प्रांताचे राहणीमान, स्वभाव, हावभाव स्पष्ट होतात. तिथल्या समस्या, सण, परंपरा प्रदर्शित होतात. जनजागृती होते. पाश्चात्त्य कलेचे अनुकरण करणारी काही नृत्ये जेव्हा परप्रांतात सादर केली जातात तेव्हा; मात्र देहबोलीमध्ये तफावत येते आणि विकृतीचे सादरीकरण होते. म्हणजेच नृत्याला आपली स्वतःची भाषा आहे, ती कशीही बोलून चालणार नाही. ती शिकण्यासाठीही प्रशिक्षणाची गरज आहे. कोणतीही भाषा मुद्देसूद आणि स्पष्ट असलीच पाहिजे. यासाठी व्याकरण महत्त्वाचे; पण नृत्य कलेतील व्याकरण ज्याला कळले, ते आज या कलेतील मान्यवर म्हणून नक्कीच गणले गेलेले आहेत. नृत्य ज्याला येते त्याची देहबोली ही बोलकी आणि तितकीच प्रसंगी निर्विकारी असते. विकारांना टाळू आणि जागतिक नृत्यदिनानिमित्त निदान आरोग्यवर्धनासाठी तरी नृत्याला न्याय देऊया! जागतिक नृत्यदिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा!