Global Brands Cybersecurity | जागतिक ब्रँड्सच्या सायबर सुरक्षेला भगदाड

Global Brands Cybersecurity |
Global Brands Cybersecurity Risks | जागतिक ब्रँड्सच्या सायबर सुरक्षेला भगदाड
Published on: 
Updated on: 

तानाजी खोत

इंटरनेटच्या जगात ज्या नामांकित वेबसाईट्सवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, त्याच वेबसाईट्स आपल्या बँक खात्यावर डल्ला मारण्याचे माध्यम ठरू शकतात, हे सोमवारी (१६ नोव्हेंबर) पुन्हा एकदा सिद्ध झाले. बीबीसी, सीएनएन, एचएसबीसी बँक, झूम, सेल्सफोर्स आणि आयकिया यांसारख्या जगातील १७८ बड्या आणि प्रतिथयश कंपन्यांच्या वेबसाईट्सवरून कोट्यवधी यूजर्सच्या डिव्हाईसमध्ये छुपा मालवेअर (घातक कोड) शिरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष आणि तितकीच गंभीर बाब म्हणजे, यापैकी एकाही कंपनीचा मुख्य सर्व्हर हॅक झालेला नव्हता!

सायबर विश्वात या प्रकाराला ‘सप्लाय चेन अटॅक’ म्हणतात. हे समजून घेण्यासाठी एका पंचतारांकित हॉटेलचे उदाहरण घेऊ. हॉटेलच्या मुख्य दरवाजावर शस्त्रधारी रक्षक असतात; पण दररोज भाजीपाला किंवा दूध घेऊन येणाऱ्या ‘विश्वासू डिलिव्हरी व्हॅन’ना तपासणी न करता थेट स्वयंपाकघरात प्रवेश दिला जातो. आजच्या आधुनिक वेबसाईट्सही अशाच चालतात. मोठी कंपनी वेबसाईटचे डिझाईन तपासण्यासाठी आणि ग्राहकांच्या आवडीनिवडी समजून घेण्यासाठी बाहेरच्या ‘थर्ड पार्टी’ सॉफ्टवेअरची मदत घेते. यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘ऑप्टिमायझली’ या लोकप्रिय सॉफ्टवेअरमधील त्रुटीचा हॅकर्सनी ताबा घेतला आणि त्यात ‘ऑप्टिमजॅक’ नावाचा घातक कोड पेरला. हा कोड अधिकृत पत्त्यावरून येत असल्याने बड्या बँकांच्या महागड्या सुरक्षा यंत्रणांनाही त्याचा सुगावा लागला नाही. प्राथमिक तपासणीत केवळ १५ टक्के कंपन्यांचीच प्रणाली हा हल्ला रोखण्याइतकी सक्षम असल्याचे दिसून आले.

तब्बल १७ तास सुरू असलेल्या या धुमाकुळात हॅकर्सनी एकाच दिवसात कोडमध्ये २६ वेळा बदल केले, जेणेकरून अँटिव्हायरस किंवा सुरक्षा प्रणालीला तो सहज पकडता येऊ नये. हा कोड एखाद्या अट्टल डिजिटल पाकीटमारासारखे काम करत होता. ऑनलाईन खरेदी करताना यूजर्सनी टाईप केलेले क्रेडिट कार्ड नंबर, सीव्हीव्ही आणि लॉगिन पासवर्ड त्याने सहज चोरले. क्रिप्टोकरन्सी व्यवहार करणाऱ्यांचे वॉलेट पत्ते बदलून अवघ्या काही तासांत सात हजार डॉलर्सहून अधिक रक्कम लंपास केली, तर जुनी प्रणाली वापरणाऱ्या आयफोनमध्ये हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर सोडण्याचाही प्रयत्न झाला.

मार्च २०२६ पासून सक्रिय असलेली क्रिप्टो खाती आणि मागील सायबर हल्ल्यांचे धागेदोरे पाहता पैशाच्या हव्यासापोटी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीने कमी कष्टात ३२ बड्या बँका आणि शेकडो जागतिक कंपन्यांच्या कोट्यवधी ग्राहकांना एकाच वेळी जाळ्यात ओढल्याचे स्पष्ट होते. एक एक करून कंपन्यांचे सर्व्हर फोडण्यापेक्षा हा मार्ग गुन्हेगारांना अधिक सोपा आणि फायदेशीर ठरत आहे. या घटनेने केवळ जागतिक कॉर्पोरेट जगतातील ‘आयटी’ आणि मार्केटिंग विभागांतील समन्वयाचा अभाव उघड केला नाही, तर संपूर्ण डिजिटल अर्थव्यवस्थेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. यातून सामान्य यूजर्सनी धडा घेत आपला मोबाईल आणि ब्राऊझर नेहमी अपडेट ठेवावा. तसेच, वेबसाईटवर थेट कार्ड नंबर टाकण्याऐवजी सुरक्षित पेमेंट ॲप्सचा वापर करावा आणि आपल्या बँक व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवावे, असा सल्ला आता जागतिक सायबर तज्ज्ञ देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.