

प्रा. प्रवीण घेवारी
केवळ परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हताच धुळीस मिळाली नाही, तर प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टांवरही पाणी फेरले गेले आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठीची ‘नीट’ परीक्षा म्हणजे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न. मात्र, याच परीक्षेच्या निमित्ताने समोर आलेले पेपरफुटीचे वास्तव पाहता आपली संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच आज ‘कोमा’त गेली आहे की काय, असा संतापजनक प्रश्न निर्माण झाला आहे. देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत अखेर शासनाला फेरपरीक्षेचा निर्णय जाहीर करावा लागला. हा निर्णय म्हणजे केवळ प्रशासकीय अपयशावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न नसून लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टाचा झालेला अपमान आहे.
दोन-तीन वर्षे डोळ्यांत तेल घालून, घरादाराचा त्याग करून अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती आज काय असेल, याचा विचार कोणत्याच धोरणकर्त्याला करावासा वाटला नसेल का? परीक्षा संपली की मोकळे होऊ, या आशेवर असलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या आणि तणावाच्या खाईत लोटले गेले आहे. आज रस्त्यावर उतरलेला विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि पालकांच्या डोळ्यांतील अश्रू हे या ढिसाळ यंत्रणेच्या नैतिक दिवाळखोरीचा जिवंत पुरावा आहेत.
ही केवळ एक परीक्षा घोटाळ्याची घटना नसून देशाच्या उज्ज्वल भविष्याला मुळासकट पोखरून काढणारे हे एक गंभीर कारस्थान आहे. लातूर, विदर्भ, पुणे आणि नाशिकसारख्या केंद्रांतून कोचिंग क्लास चालक, एज्युकेशन कन्सलटंटस् आणि तथाकथित प्राध्यापकांनी मिळून रचलेले हे पेपरफुटीचे ‘रॅकेट’ अत्यंत धक्कादायक आहे. यातील आणखी एक विदारक वास्तव म्हणजे स्वतःच्या पुत्राला यशाच्या शिखरावर पोहोचवण्याच्या आंधळ्या प्रेमापोटी कोचिंग चालकाने स्वार्थाची सीमा ओलांडली. केवळ स्वतःच्या मुलाचा मार्ग सुकर व्हावा, या हव्यासापोटी त्याने त्या मुलासोबतच इतर अनेक निष्पाप विद्यार्थ्यांचे भविष्यही टांगणीला लावले आहे.
ज्या हातांनी विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवून त्यांना घडवायचे होते, त्याच हातांनी पैशाच्या हव्यासापोटी पेपर विकून गुणवत्तेचा जाहीर लिलाव केला. चंदनासारख्या पवित्र मानल्या जाणार्या शिक्षकी पेशाला पैशाच्या अवाजवी हव्यासापोटी काळिमा फासणार्या या नराधमांमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्राची मान शरमेने खाली गेली आहे. गुन्हेगारांना बेड्या पडतीलही; पण विद्यार्थ्यांच्या मनातून यंत्रणेबद्दल उडालेला विश्वास पुन्हा कसा उभा करणार, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. ज्या गुरूवर भावी पिढी घडवण्याची आणि त्यांना सन्मार्गावर नेण्याची जबाबदारी असते, तेच जर पैशांच्या मोहापायी भविष्याच्या ओढीने विद्यार्थ्यांना शॉर्टकट आणि भ—ष्टाचाराचे प्रलोभन दाखवून त्यांच्या भविष्याशी खेळत असतील, तर एका सक्षम, नीतिमान आणि सामर्थ्यशाली राष्ट्राची निर्मिती कशी होणार? हा प्रकार म्हणजे आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या नैतिक अध:पतनाचा कळस आहे.
केवळ फेरपरीक्षा घेणे ही या समस्येवरील कायमस्वरूपी मलमपट्टी ठरू शकत नाही. ‘एनटीए’ (NTA) सारख्या केंद्रीय यंत्रणेचा ढिसाळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. या यंत्रणेची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी आणि संपूर्ण परीक्षा पद्धतीचे आमूलाग्र पुनर्गठन काळाची गरज आहे. पेपरफुटीला केवळ एक गुन्हा न मानता तो ‘देशद्रोह’च मानला पाहिजे. अशा गुन्हेगारांसाठी जलदगती न्यायालयात खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कुणाचीही अशी हिंमत होणार नाही. जोवर आपण गुणवत्तेचा सन्मान करायला शिकत नाही आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टाचे रक्षण होत नाही, तोवर ‘सक्षम भारत’ हे स्वप्न केवळ कागदावरच राहील. शासनाने आता केवळ वेळ मारून नेण्याचे धोरण न राबवता, या सडलेल्या व्यवस्थेवर तातडीने कठोर शस्त्रक्रिया करावी. कारण हा केवळ परीक्षेचा नव्हे, तर देशाच्या भावी आरोग्याचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.