

भारताच्या एअरस्ट्राईकनंतर देशातील जनतेमधील प्रतिमा टिकवण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराला भारताविरुद्ध कारवाई करणे अपरिहार्य होते. पण या कारवाईला भारताच्या अत्याधुनिक शस्त्रसामग्रीने आणि लष्कराच्या अचूक नियोजनामुळे निष्प्रभ करण्यात आले. पाकिस्तानची क्षेपणास्त्रे, ड्रोन्स हवेतच उद्ध्वस्त झाली. एक विमान पाडण्यात आले. यावरून पाकिस्तानला योग्य तो संदेश गेलेला असावा. काही अभ्यासकांच्या मते, ही लढाई खूप दीर्घकाळ चालणारी आहे. पण मागील तीन युद्धांप्रमाणेच याही वेळी भारत पाकिस्तानला धडा शिकवेल यात शंका नाही. पण यावेळी असा वज्राघात केला पाहिजे की, पाकिस्तानची पुन्हा हिंमत होणार नाही.
दहशतवाद्यांवर केलेल्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तान काही ना काही हालचाल करणारच, याबाबतचे अंदाज वर्तवले जात होते. वास्तविक भारताने केवळ दहशतवादी पायाभूत रचनांवरच हल्ला केला होता. परंतु पाकिस्तानकडे असे विशिष्ट लक्ष्य नसल्याने त्याने भारतातील लष्करी ठिकाणांना आणि सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारताच्या उत्तर आणि पश्चिमेकडील 15 शहरांतील अनेक लष्करी ठिकाणांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय लष्कराने तो यशस्वीरीत्या उधळून लावला. उलट या कारवाईच्या प्रत्युत्तरादाखल, भारताने पाकिस्तानचे हवाई संरक्षण नेटवर्क पूर्णतः बेचिराख करून आपली क्षमता व अत्याधुनिकता दाखवून दिली.
सीमारेषेवर गोळीबार करणे हा पाकिस्तानकडे उरलेला एकमेव पर्याय आहे आणि याचा वापर सध्या पाकिस्तान करत आहे. भारतीय नागरिकांना लक्ष्य करण्यामागे पाकिस्तानची खुमखुमी दिसत आहे; मात्र, त्याला देखील भारताने योग्य प्रतिसाद दिला आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की, या सर्व मार्यांच्या माध्यमातून पाकिस्तानला पूर्ण युद्धाकडे जायचे आहे का? सध्या तरी तसे वाटत नाही. कारण पूर्ण युद्धासाठी पाकिस्तान तयार आहे, असे दिसत नाही. तसेच पाकिस्तानला याची पूर्ण कल्पना आली आहे की, आपण आक्रमकता दाखवली, तर भारत त्याला शतप्रतिशत कठोर प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी भारताने पाकिस्तानकडून डागली गेलेली क्षेपणास्त्रे, ड्रोन, विमाने या सर्वांना हवेतच उडवून देऊन योग्य तो संदेश दिला आहे.
भारताची सैन्य क्षमता पाकिस्तानपेक्षा निश्चितपणे अधिक आहे. संख्यात्मक आकड्यांचाच विचार करायचा झाला तर सैनिकांची संख्या, तंत्रज्ञान किंवा लष्करी उपकरणांची तुलना केली, तर भारत पाकिस्तानपेक्षा बराच पुढे निघून गेलेला आहे. केवळ लढाऊ विमानांच्या संख्येतच नव्हे, तर प्रगत आणि आधुनिक विमानांच्या बाबतीतसुद्धा भारत सरस आहे. तसेच भारताला आंतरराष्ट्रीय समुदायाचे अधिक समर्थन आहे. त्यामुळे पाकिस्तानने सध्या सुरू असलेले हल्ले वेळीच थांबवले नाहीत, तर त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
जागतिक समुदाय दोन्ही देशांदरम्यान तणाव कमी करण्याचा सतत प्रयत्न करत आहे. भारत आणि पाकिस्तान दोघेही अण्वस्त्र सुसज्ज राष्ट्रे असल्यामुळे रशिया - युक्रेन युद्ध आणि इस्रायल - हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आशियामध्ये नवे युद्धसद़ृश वातावरण निर्माण होऊ नये, असे जगाला वाटते. भारताची प्रतिमा एक जबाबदार देश म्हणून उभी राहिली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देताना आपण स्पष्ट केले होते की, ही कारवाई लक्ष्यित असून भारत तणाव वाढविण्याच्या बाजूने नाही.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराणमध्ये बोलतानाही हीच भूमिका स्पष्टपणे मांडली. पण पाकिस्तानच्या वर्तनातून तणाव वाढविण्याचा कल स्पष्टपणे उजागर होत आहे. अशा वेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे विधान अत्यंत महत्त्वाचे ठरते की, भारतावर हल्ला झाला, तर अत्यंत कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. या सार्या घडामोडीत काही बाबी ठळकपणे स्पष्ट होतात. पहिली म्हणजे, भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला स्पष्ट संदेश देत लक्ष्मणरेषा आखली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्या शब्दांत सांगायचे, तर ‘न्याय मिळविण्यासाठी’ केलेली ही कारवाई पहलगामवरील हल्ल्याच्या भावनिक उद्वेगातून केलेली नव्हती तर लष्करी आणि लष्करबाह्य पातळीवरील सखोल विचार करून केलेली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे 2016 च्या सर्जिकल स्ट्राईक आणि 2019 च्या बालाकोट एअर स्ट्राईकपेक्षा अनेक पटींनी प्रगत होते. कारण लक्ष्यांची संख्या अधिक होती, ती विविध प्रकारची होती. पाकिस्तानच्या सीमा ओलांडून सुमारे 150 कि.मी. आतमध्ये आपण त्यांना ठोकले. या कारवाईत 24 प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आल्यामुळे परिणाम अधिक व्यापक झाला. यातून भारत आपल्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी समर्थ आहे, हे जगाला कळून चुकले. दुसरी बाब म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’ ही एक संयुक्त मोहीम होती. सरकारने स्पष्ट केले आहे की, ही मोहीम अजूनही सुरू आहे, याचा अर्थ सहभागी संस्थांमध्ये सुसूत्रता आहे.
राफेल लढाऊ विमानांचा वापर, स्काल्प आणि हॅमरसारख्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा वापर, ड्रोन आणि बॉम्बगोळ्यांचा मारा, तसेच मानवविरहित हवाई साधनांद्वारे हल्ला करणे, त्यानंतर लगेचच तंतोतंत आणि रिअल टाईम माहिती मिळवणे व त्यावर प्रक्रिया करणे या सर्वांमधून भारताची क्षमता आता पूर्वीपेक्षा वेगळी आणि अधिक विकसित झाली आहे, हे पाकिस्तानने समजून घ्यायला हवे. तिसरी बाब, मनोवैज्ञानिक युद्धातही भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कारण देशातून जनमताचा मोठा दबाव असूनही सरकारने संयम ठेवला. पाकिस्तानवर दबाव टाकण्यासाठी लष्कराला सज्जतेचा आदेश देण्यात आला होता. पण योग्य वेळ आल्यावरच कारवाई केली गेली. पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेची स्थिती आणि त्याची आर्थिक दुर्दशा लक्षात घेता हा तणाव फार काळ टिकणार नाही.
आणखी एक बाब म्हणजे, पहलगाम प्रकरणाबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाला वेळोवेळी माहिती देण्याची भारताची कूटनीतिक भूमिका यशस्वी ठरली आहे. चीन आणि तुर्की या काही देशांना वगळता बहुतांश प्रभावी देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. हे धोरण भविष्यातील तणाव कमी करण्यात पुन्हा उपयुक्त ठरू शकते. आता प्रश्न आहे पुढे काय? सर्वप्रथम पाकिस्तानने धर्मांध कट्टरतेच्या दिशेने वळणार्या देशांतर्गत चर्चा थांबवायला हव्यात. आज सोशल मीडियावर या चर्चांना वेगळे वळण मिळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शांततेचा विचार करता या संघर्षाची सुरुवात पाकिस्तानने केली असल्याने भारताने मागे पाऊल घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण जागतिक समुदायाने दबाव आणला नाही तर पाकिस्तानला रोखणार कोण? याचे उत्तर सुस्पष्ट आहे आणि ते म्हणजे भारताचे कठोर प्रत्युत्तर. एस-400 प्रणालीने पाकिस्तानची सर्व क्षेपणास्त्रे, ड्रोन निष्प्रभ ठरले आहेत. याउलट चिनी बनावटीच्या लष्करी सामग्रीला हातोहात चकवा देत भारत पाकिस्तानला योग्य प्रकारे कमकुवत करत चालला आहे. काही अभ्यासकांच्या मते, ही लढाई खूप दीर्घकाळ चालणारी आहे. पण मागील तीन युद्धांप्रमाणेच याही वेळी पाकिस्तानला भारत धडा शिकवेल यात शंका नाही. पण यावेळी असा वज्राघात केला पाहिजे की, पाकिस्तानची पुन्हा हिंमत होणार नाही. याबाबतचे नियोजन लष्कराने केलेलेही असेल. कदाचित येणार्या काळात 8 मेप्रमाणे एखादा आश्चर्याचा सुखद धक्का भारतीयांना बसू शकतो.