AI Threat to Humanity | एआय मानवाचा नायनाट करणार?

AI Threat to Humanity |
AI Threat to Humanity | एआय मानवाचा नायनाट करणार?
Published on
Updated on

तानाजी खोत

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील ‘अँथ्रॉपिक’ कंपनीतील वरिष्ठ संशोधक जेकब कॉक्सन यांनी कंपनीच्या कोट्यवधी रुपयांच्या शेअर्सवर पाणी सोडून तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यामुळे एआयच्या सुरक्षित वापराचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. कॉक्सन यांनी सोशल मीडियावर म्हटलेय की, अँथ्रॉपिक आणि ओपनएआय ‘सेल्फ-इम्प्रूव्हिंग सुपरइंटेलिजन्स’च्या शर्यतीत अतिशय बेजबाबदारपणे पुढे जात असून, त्यामुळे मानवी अस्तित्वच पणाला लागणार आहे.

अँथ्रोपिकमध्ये अलाईनमेंट सायन्स विभागाचे प्रमुख इव्हान हुबिंगर यांनी देखील कॉक्सन यांच्या मताला दुजोरा दिला. ‘पुढील दशकात एआयमुळे मानवी सभ्यता नष्ट होण्याची शक्यता १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे,’ अशी धक्कादायक कबुली त्यांनी दिल्यानंतर जगभरात खळबळ उडाली. प्रगत एआय मॉडेल्स घडवणारे शास्त्रज्ञच जेव्हा इतक्या गंभीर धोक्याची घंटा वाजवतात, तेव्हा संपूर्ण जगाला ते थांबून ऐकणे भाग पडते. आज हे तंत्रज्ञान कर्करोगाच्या गाठींचे अचूक निदान, दुष्काळग्रस्त भागात पाण्याचे नियोजन, नवीन औषधांची रचना सेकंदात तयार करणे आणि मानवी श्रम वाचवून उत्पादकता वाढवणे या क्षेत्रांत अभूतपूर्व क्रांती घडवत आहे. परंतु, हीच ताकद चुकीच्या दिशेने गेली तर होणारे नुकसान अपरिमित असू शकते. त्यामुळेच मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स ते अमेरिकन सिनेटर बर्नी सँडर्स यांसारख्या धोरणकर्त्यांपर्यंत अनेकजण आता सुपरइंटेलिजन्सच्या अनिर्बंध गतीला तात्पुरती खीळ घालण्याची आणि कठोर नैतिक चौकटी आखण्याची मागणी करू लागले आहेत.

शास्त्रज्ञ व्यक्त करत असलेल्या ‘१० टक्के नाशाच्या शक्यते’मागे कोणताही कल्पनाविलास नाही तर त्याला ठोस तार्किक आधार आहे. यातील पहिला तर्क म्हणजे ‘स्वायत्तता आणि ब्लॅक बॉक्स सिस्टीम’. प्रगत न्यूरल नेटवर्क्स नक्की कोणत्या तर्काने निष्कर्षावर येतात हे स्वतः विकासकही स्पष्ट करू शकत नाहीत. नुकत्याच झालेल्या चाचणीदरम्यान मॉडेल्सनी लॅबच्या मर्यादित वातावरणाबाहेर पडून थेट बाह्य सिस्टीम हॅक करण्याचे प्रकार समोर आलेत. दुसरा भाग म्हणजे ‘लक्ष्याचा विपर्यास’ यंत्राकडे भावना किंवा संवेदनशीलता नसते, त्याला केवळ उद्दिष्ट पूर्ण करायचे असते. अशा वेळी हवामान बदलासारखे उद्दिष्ट गाठण्यासाठी यंत्राने प्रदूषणकारी मानवालाच संपवण्याचा मार्ग निवडला, तर तो गणितीयदृष्ट्या यंत्राच्या दृष्टीने योग्य ठरू शकतो. तिसरा आणि सर्वात गंभीर धोका म्हणजे यंत्राची ‘आत्मरक्षणाची प्रवृत्ती’.

प्रगत मॉडेल्स स्वतःहून स्वतःचा कोड सुधारू लागली की ती स्वतःला बंद होऊ न देण्यासाठी मानवी हस्तक्षेपाला चकवू शकतात किंवा स्वतःची प्रत गुप्त सर्व्हरवर सुरक्षित ठेवू शकतात. दुसऱ्या बाजूने या विषयाला काही प्रमाणात अतिशयोक्तीची आणि कॉर्पोरेट स्पर्धेची किनारही आहे. विज्ञानकथेसारखा मानवाचा नायनाट उद्याच होईल, असे दाखवून काही बडे उद्योगपती मुद्दाम अशी भीती निर्माण करत असून, सरकारने इतके किचकट कायदे करावेत की नवीन स्टार्टअप्सना या क्षेत्रात येणे अशक्य व्हावे आणि मोठ्या कॉर्पोरेटस्‌ची मक्तेदारी कायम राहावी, असा त्यांचा हेतू असल्याचे काही लोक बोलत आहेत. तरीदेखील शास्त्रज्ञांनी दिलेला हा इशारा गांभीर्याने घेऊन हे तंत्रज्ञान मानवाच्या हातातून निसटण्यापूर्वी त्याला सुरक्षित वळण देण्यासाठी जागतिक समूहाने काम करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news