

नमस्कार साहेब, लवकरच मतमोजणी होऊन तुम्ही नगरसेवक होण्याची शक्यता आहे. तुमची थोडक्यात मुलाखत घेणार आहे. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर तुमचा पुढील प्लॅन काय आहे? म्हणजे जसे की, आपल्या वार्डाचा विकास, शहर सुंदर करणे इत्यादी. आपण निश्चितच काही ना काही तरी नियोजन केलेले असेलच. नगरसेवक म्हणून निवडून येण्याच्या आधी तुम्ही माझी मुलाखत घेत आहात. तुमचे कौतुकच केले पाहिजे.
बाकी प्लॅन म्हणाल, तर असा फार काही विशेष नाही. वार्डाचा विकास वगैरे होत असतो. त्याला एकटा नगरसेवक जबाबदार नसतो. निवडून आल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा थार गाडी घेणार आहे. मोठी गाडी असल्याशिवाय ‘पुढारी मंडळी’चे इम्प्रेशन पडत नसते. भली मोठी गाडी घेऊन फिरल्याशिवाय लोकांनाही आम्ही नगरसेवक झाल्याचा फील येत नसतो. ज्या दिवशी निवडून आलो, त्या दिवशी साधारणतः दहा-बारा पोते गुलाल वार्डात उधळून सगळा वॉर्ड लालेलाल करून टाकणार आहे आणि त्याच दिवशी थार गाडी बुक करणार आहे.
तुम्ही कोणतीही गाडी घेतली, तरी जनतेची सेवा करण्यासाठीच घेत आहात, याची आम्हाला कल्पना आहे. निवडून आल्यानंतर, गुलाल उधळल्यानंतर, गाडी आल्यानंतर दुसरे कोणते काम तुम्ही करणार आहात? हे पाहा, गेले सहा महिने दगदग करून, विचार करून आणि राजकारण करून जीव शिणला आहे.
गाडी घेऊन सरळ 8-10 दिवस कुठल्यातरी हिल स्टेशनला निवडक कार्यकर्त्यांसह आराम करण्यासाठी जाणार आहे. थोडा आराम केल्याशिवाय आता फ—ेश वाटणार नाही, इतकी दगदग झाली आहे. वार्डातील मतदारांच्या पाया पडून पडून कंबर पार वाकून गेले गेली आहे. त्यामुळे जनतेची सेवा करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी 15 दिवस आराम करणार आहे. एकदा का आराम झाला की, फ्रेश होऊन कामाला लागणार आहे.
अच्छा, म्हणजे हा आरामसुद्धा तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठीच करत आहात. ठीक आहे. त्यानंतरचा तुमचा पुढील कार्यक्रम कसा असणार आहे? नगरसेवक म्हणून कामाला लागल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा या निवडणुकीत झालेला खर्च कसा भरून काढता येईल, याचा विचार करणार आहे. तुम्हाला कल्पना नसेल की, पाच एकर जमीन मी या निवडणुकीसाठी विकलेली आहे. आता येत्या एक वर्षांमध्ये दहा एकर जमीन खरेदी कशी करता येईल, याचे मी नियोजन करणार आहे. बाकी विकासाचे मी पाहून घेईन, तुम्ही काळजी करू नका!