

अनेक भाषा बोलणार्या लोकांचा देश म्हणजे आपला भारत आहे. कुठे हिंदी चालते, कुठे मराठी चालते, कुठे इंग्रजी चालते, तर कुठे स्थानिक भाषा चालते. कधीकाळी दक्षिण भारतात आपण गेलो, तर तेथील लोक हिंदी बोलणे न करता त्यांच्याच भाषेत बोलण्याचा आग्रह करत असत. जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे तसा भारत संमिश्र स्वरूपाचा झाला आहे. मुंबईसारख्या कॉस्मोपोलिटेन शहराची भाषा हिंदी झाली आहे. मुंबईची हिंदी वेगळीच आहे. नागपुरात बोलली जाते ती हिंदी वेगळी आहे, तर उत्तर प्रदेशात बोलली जाणारी हिंदी वेगळी आहे. असे हे हिंदीचे विविध प्रकार आहेत. मंडळी तुम्हाला वाटेल की, हा भाषेचा विषय आज कशासाठी घेतला आहे?
पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय झाला तेव्हापासून शिक्षक, पालक आणि एकंदरीत सर्वच जण यांना हे कसे होणार, हा प्रश्न पडला आहे; पण महाराष्ट्रात हिंदीच्या सक्तीवरून वादंग निर्माण झाले आहे. हिंदीची सक्ती कशासाठी, असा प्रश्न विचारला जात आहे आणि तो तसा रास्तच आहे असा म्हणावा लागेल. हिंदीबाबत सरकारने जनमताचा कौलही घेण्याची गरज आहे. विनाकारण कोणतीही भाषा लादण्यात काहीच अर्थ नाही. काही महिन्यांपूर्वी माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. तिच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. दक्षिणेतील राज्यात सातत्याने हिंदी भाषेला विरोध केला जात असून तेथे भाषिक अस्मिता जपली जात आहे. त्यामुळे आपल्या राज्यातही तशी माय मराठीबाबत अस्मिता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
ग्रामीण किंवा नागरी भागामध्ये बालवाडीतून थेट पहिलीत असा विषय असतो. शहरी भागात मात्र तीन वर्षे पूर्ण झाल्यावर ज्युनिअर केजी, त्यानंतर सीनिअर केजी आणि नंतर फर्स्ट स्टँडर्ड असा विषय असतो. दरम्यान, शहरी भागांमध्ये, आजूबाजूच्या घरांमध्ये विविध भाषा बोलल्या जातात. तेथील मुलांसोबत खेळताना आपले बालक घरी आल्यानंतर दररोज नव्या भाषेची गंमत आईला सांगत असते. एवढ्या सगळ्यात इयत्ता पहिलीला तीन विषय असतील, तर पुन्हा आणखी एक भाषा शिकणे अनिवार्य केले आहे. त्यात विशेषत्वाने हिंदीचा समावेश आहे. हिंदी राष्ट्रभाषा समजली जाते. हिंदी शिकवले नाही, तरी महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये लोक हिंदी चांगल्यापैकी बोलतात. याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांना आवडणारे हिंदी चित्रपट आणि सीरियल्स.
लोक हिंदी बोलायला शिकले, ते मुळातच चित्रपटांपासून! उदाहरणार्थ, ‘शोले’ चित्रपटामुळे आपली मुले ‘किती माणसे होती’ याच्याऐवजी ‘कितने आदमी थे’ असा डायलॉग सहज मारत असतात. हिंदी चित्रपट, हिंदी गाणी, हिंदी सीरियल या बाबींना मोठ्या प्रमाणात मराठी प्रेक्षक आहेत. त्यामुळे त्यांची मराठी बिघडते की हिंदी सुधारते, हे देव जाणे; परंतु हिंदी पहिलीपासून सुरू केल्यानंतर काय काय गमती-जमती होणार आहेत, हे आपल्याला काळाच्या ओघात समजेल. शिक्षण विभागामध्ये नवीन शिक्षणमंत्री आले की, काही तरी नवीन घेऊन येत असतात. इंग्रजी भाषेची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी हा प्रयत्न असावा बहुधा!