

सुरेश पवार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इतर पक्षांनी तयारी सुरू केलेली असताना महाविकास आघाडीतील काँग्रेसची काय परिस्थिती आहे? अद्यापही काँग्रेसला सूर सापडलेला नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नगार्यावर टिपरी पडली आहे. ताशे-वाजंत्र्यांचा गजर सुरू झाला आहे. घोडामैदान वेशीवर आहे आणि अगदी काही काळातच महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. अशी सारी लगीनघाई सुरू असताना महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे शिवसेनेची तयारी चालली आहे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही थोड्याफार हालचाली चालवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तिसरा घटक पक्ष काँग्रेसची काय परिस्थिती आहे? अद्यापही या पक्षाला सूर सापडल्याचे दिसत नाही की ओढून ताणून चंद्रबळ आणण्याचे सोंगही काढता आलेले नाही.
भाजपची संघटन शक्ती मुळातच जबरदस्त आहे आणि दिवसेंदिवस त्यात भरच पडत आहे. एखाद्या जिल्ह्याचा अपवाद वगळता राज्याच्या सर्व विभागांत भाजपची तगडी ताकद आहे. 2024 मध्ये महायुतीने भाजपच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. लाडक्या बहिणींसह अनेक धोरणात्मक निर्णयामुळे, त्याप्रमाणे पायाभूत सुविधामध्ये क्रांतिकारक सुधारणांमुळे प्रामुख्याने भाजप आणि महायुतीविषयी विश्वासार्हता निर्माण झाली आहे आणि भाजपची गेल्या सव्वा वर्षात झपाट्याने घोडदौड सुरू आहे. याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निर्णयाने आणि त्यांच्या धडाकेबाज अंमलबजावणीने भाजपची प्रतिमा उजळून निघाली आहे. अमेरिकेने घातलेल्या टॅरिफ निर्बंधांना भारताने कस्पटाचीही किंमत दिली नाही. त्यामुळे ही प्रतिमा आणखी लखलखीत झाली आहे. अशी अनेक कारणे भाजपच्या सामर्थ्यात भर घालणारी ठरली आहेत. या सार्या मुद्द्यातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपचे पारडे वरचढ राहण्याचीच चिन्हे आहेत.
महायुतीतील शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनीही धडाक्याने तयारी चालवली आहे. दोन्ही पक्षांचे विभागवार, जिल्हावार मेळावे होत आहेत आणि काही ठिकाणी उमेदवारांची प्राथमिक यादीही तयार होत आहे. मुंबई, ठाणे, कोकणवर शिंदे सेनेचे लक्ष केंद्रित आहे आणि उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग येथेही लढत देण्याची तयारी शिंदे शिवसेनेने केल्याचे दिसत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही चांगलीच तयारी चालवली आहे. पक्षाने पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रात व अन्य ठिकाणीही ताकद लावली आहे. या पक्षाचे आमदार त्या त्या भागातील मातब्बर नेते आहेत. त्यांच्यामागे पक्षाचे संघटन आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना करण्याचाही या नेत्यांचा मनसुबा असल्याचे दिसून येते.
महायुतीतील घटक पक्ष अशा पूर्ण ताकदीने रणांगणात उतरलेले असताना महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे काम चालले आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत डोळ्यांत भराव्यात अशा हालचाली आहेत. उद्धव यांच्या पक्षाचा दसरा मेळावा उत्साहात झाला. महत्त्वाचे म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघा भावंडांमध्ये टाळी देण्याच्या हालचाली चालू आहेत आणि आता या हालचाली अंतिम टप्प्यात आहेत, असे दिसते. तसे झाले, तर समाधानकारक जागावाटप झाले आणि मुंबईसह कोकणातील लढती रंगतदार होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी अशा हालचाली चालवल्या असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही हालचाली चालल्याचे दिसते. आपली ताकद किती, याचा सारासार विचार या पक्षाच्या नेत्यांनी कितपत केला आहे, हे काही समजत नाही; पण या पक्षाच्या नेत्या आणि खा. शरद पवार यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. आता यावरून एकत्रित आघाडी म्हणून या पक्षाला लढायचे आहे की नाही, असाच प्रश्न निर्माण होतो आणि त्यांच्या निवडणूक तयारीसाठी अंदाज बांधता येतो.
राहता राहिला काँग्रेस पक्ष. एकेकाळी संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदांवर या पक्षाचे अधिराज्य होते. विलासराव देशमुखांसारखे मुख्यमंत्री, अनेक मंत्री, किती तरी आमदार जिल्हा परिषदांतून पुढे आले. अशा या पक्षाची विद्यमान अवस्था दयनीय आहे. मोजक्या जिल्ह्यांत थोडेफार संघटन आणि दोन आकडी आमदार अशी ताकद असलेल्या या पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कितपत प्रभाव पाडता येईल, हे प्रश्नचिन्हच आहे. त्या ताकदीनिशी निवडणुकीची तयारी करायची तर परस्पर विसंगती, बेदिली ही परंपरागत वैशिष्ट्ये आणि उणिवा डोके वर काढलेल्या, अशा स्थितीत हा पक्ष आताच पिछाडीवर असल्याचा निष्कर्ष काढला, तर तो चुकीचा ठरणार नाही.
उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येण्याच्या द़ृष्टीने हालचाली चालू आहेत. अशी युती झाली, तर राज यांना महाविकास आघाडीत घेता येणार नाही, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली आहे. राज यांना आघाडीत घ्यायला त्यांचा विरोध दिसतो आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) खा. सुप्रिया सुळे यांनी स्वबळावर लढण्याचे सूतोवाच केले आहे. या परस्पर विसंगत भूमिकांमुळे महाविकास आघाडीपुढे प्रश्नचिन्ह उभारण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.