आचारसंहिता आणि मतदार

आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारणत: 35 दिवसांत निवडणुका
Code of Conduct and Voters
आचारसंहिता आणि मतदारPudhari File Photo
Published on
Updated on

आज लागणार, उद्या लागणार अशी गेले महिनाभर चर्चा असलेली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता एकदाची लागू झाली आणि प्रत्यक्ष लढाईला आता तोंड फुटले आहे. आचारसंहिता लागल्याबरोबर काही नेत्यांनी शंखनाद, अखेरची लढाई, आरपारची लढाई अशा आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारणत: 35 दिवसांत निवडणुका होत असतात. अर्ज भरणे, मागे घेणे, कुणाला मागे घेण्यास भाग पाडणे, पक्षाचे एबी फॉर्म मिळणे, प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर होणे, त्यानंतर धूमशान प्रचार आणि नंतर निवडणुका. निवडणुका झाल्या की, निकाल लागत असतात. कुठे गुलाल उधळला जातो, तर कुणाच्या बंगल्यावर सामसूम असते. आपण सामान्य लोकांना या सर्व प्रक्रियेशी फारसे देणेघेणे नसते. या कालावधीमध्ये निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे उमेदवारांचे आचरण असणे अपेक्षित असते. मतदारांना लालूच दाखवून मतदान करून घेणे या गोष्टी या काळात करता येत नाहीत; कारण आदर्श आचारसंहिता लागू असते.

नेते, लोकप्रतिनिधी दिसले की, इतके दिवस तुम्ही वाकून नमस्कार करत होता आणि नेते हात उंचावून तुमच्या नमस्काराचा स्वीकार करत होते. आता मजा आहे तुमची. आता नेते वाकून नमस्कार करतील आणि तुम्ही हात उंचावून त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार कराल; मात्र लक्षात ठेवा की, हा कालावधी फक्त 35 दिवसांचा आहे. उरलेले 365 गुणिले पाच वर्षे इतके दिवस तुम्हालाच वाकून नमस्कार करणे भाग आहे. एकदा का निवडून आले की, तुमचा-आमचा म्हणजे मतदारांचा आणि राजकीय नेत्यांचा काहीही संबंध राहत नाही. आपल्या वॉर्डातील नगरसेवकापासून ते थेट आमदार, खासदार आणि असंख्य उमेदवार आता सोशल मीडियावरून तुम्हाला साद घालण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर ते क्वचित तुमच्या घरी येऊन घरातील वडीलधार्‍या लोकांच्या पाया पडतील, मुलाबाळांच्या डोक्यांवरून हात फिरवतील. तुम्ही अजिबात भारावून जाऊ नका; कारण यानंतर पाच वर्षांनंतरच ते तुमच्या घरी येणार असतात.

आपल्याला सहजासहजी न भेटणारा आपल्या वॉर्डातील नगरसेवकही आता तुम्हाला वाकून नमस्कार करणार आहे, तुमच्या घरी येणार आहे. आमदारकीच्या इलेक्शनला ज्याच्या वॉर्डातून भरपूर मतदान मिळेल, त्यालाच पुढे नगरपालिकेच्या निवडणुकांवेळी पक्षाचे तिकीट मिळणार असते. म्हणजे पाहा, किती लोकांचे कर्तृत्व निवडणुकीत पणाला लागलेले असते. गेली वर्षानुवर्षे आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल केले जातात आणि पुढे त्याचे काय होते, हे अद्याप कुणालाच माहीत नाही. आचारसंहिता भंग केल्यामुळे कुणी जेलमध्ये गेल्याचे ऐकिवात नाही. मग हे गुन्हे नोंदवतात तरी कशाला? एकदा गुन्हा नोंदवायचा म्हटले की, पोलिसांना त्याची तक्रार लिहून घ्यावी लागते. तिथे कागद वाया जातात. हे कागद पुढे सरकत त्यावर आणखी काही कागद येऊन ते कागद पण वाया जातात. त्यामुळे आता सर्वांनी आदर्श आचरसंहितेचे पालन करणे आता सर्वांची जबाबदारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news