‘दुसर्यासाठी खड्डा खणू नका, आपणही त्यात पडण्याचा धोका असतो’ असे सुवचन संस्कार म्हणून शिकवले जाते. भारताचा शेजारी देश असणार्या चीनला याचा अनुभव हळूहळू येऊ लागला आहे. चीनने म्यानमारमधील महत्त्वाच्या व्यापार कॉरिडॉरमध्ये कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक केली आहे. चीनच्या नैऋत्येकडील भागाला म्यानमारमार्गे हिंदी महासागराशी जोडण्याचे या महत्त्वाकांक्षी योजनेचे उद्दिष्ट आहे; मात्र हा कॉरिडॉर म्यानमारचे बंडखोर आणि देशाचे लष्कर यांच्यातील युद्धभूमी बनला आहे.
चीनने कोणत्याही देशाशी मैत्री केली, तर तो देश नष्ट केल्याशिवाय राहत नाही. पाकिस्तान, श्रीलंका ते लाओस आणि म्यानमारपर्यंत याची डझनभर उदाहरणे आहेत. चीनने म्यानमारमध्ये हस्तक्षेप केला. म्यानमारचा भारताविरुद्धच्या रणनीतीमध्ये अशा प्रकारे वापर केला की, आज हा देश विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. नागरी सरकार अस्थिर करण्यासाठी चीनने सर्वप्रथम म्यानमारच्या लष्कराला मदत केली. म्यानमारच्या लष्कराने सत्तापालट केल्यानंतर आता तेथील नागरी सरकारची हकालपट्टी केली आहे; मात्र या प्रकरणात चीनचे लाखो डॉलर म्यानमारमध्ये अडकले आहेत. चीनने म्यानमारच्या लष्कराला परिस्थिती लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्याची धमकी दिल्याचेही वृत्त आहे. भारताला वेढा घालण्याबरोबरच म्यानमारचा व्यापारासाठी वापर व्हावा, अशी चीनची इच्छा होती. यासाठी चीनने युनान प्रांतातील रुईली काऊंटीपासून म्यानमारच्या शान राज्याच्या सीमेपर्यंत एक भव्य रस्ताही बांधला आहे; पण हा रस्ता वापरासाठी योग्य झाला, तेव्हा कोरोनाने थैमान घातले. चीनने सीमेवर कडक लॉकडाऊन लागू केले, जे संपूर्ण जगात सर्वात जास्त काळ टिकले. त्यानंतर जेव्हा स्थिती सुधारली तेव्हा म्यानमारमध्ये गृहयुद्ध सुरू झाले. बंडखोरांनी चीन समर्थक म्यानमार सैन्यावर हल्ले केले. बंडखोरांनी चीनला लागून असलेली दोन हजार कि.मी. लांबीची सीमाही ताब्यात घेतली आणि सर्व सीमा चौक्यांवरून म्यानमारच्या सरकारी सैन्याला हुसकावून लावले.
म्यानमारमधील दोन्ही बाजूंवर चीनचा प्रभाव आहे; पण जानेवारीमध्ये त्यांनी मध्यस्थी केलेला युद्धविराम अयशस्वी ठरला आहे. अशावेळी चीनने दोन्ही बाजूंना धोका देण्यासाठी सीमेवर सैन्य जमा करून मोठा लष्करी सराव सुरू केला आहे. काही महिन्यांपूर्वीच चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी म्यानमारची राजधानीला भेट दिली होती. गृहयुद्ध सुरू झाल्यापासून म्यानमारला भेट देणारे ते जगातील कोणत्याही देशाचे पहिले उच्च राजनैतिक अधिकारी होते. यावेळी त्यांनी म्यानमारच्या लष्करी राजवटीचे प्रमुख मिन आंग हलाईंग यांनाही इशारा दिल्याचे मानले जात आहे. असे असूनही म्यानमारचे लष्कर किंवा बंडखोर हार मानायला तयार नाहीत. बंडखोरांनी स्वतःची युतीही बनवली आहे, जी एकत्रितपणे म्यानमारच्या सैन्यावर हल्ला करत आहे. चीनला लागून असलेल्या म्यानमारमधील शान राज्यासाठी संघर्ष ही नवीन गोष्ट नाही. म्यानमारचे हे सर्वात मोठे राज्य जगातील अफू आणि मेथाम्फेटामाईनचे प्रमुख स्रोत आहे. सरकारला दीर्घकाळ विरोध करणार्या वांशिक सैन्यांचे हे राज्य आहे; पण चिनी गुंतवणुकीमुळे निर्माण झालेले दोलायमान आर्थिक क्षेत्र गृहयुद्धापर्यंत गेले. आता चिनी लष्कराने लाऊडस्पीकरद्वारे म्यानमारच्या लोकांना सीमेवरील कुंपणापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे; मात्र चिनी पर्यटकांना यातून सूट दिलेली आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी संसाधनांनी समृद्ध शेजारी असलेल्या म्यानमारशी अनेक वर्षे संबंध निर्माण केले आहेत. तथापि, जेव्हा देशाच्या निवडून आलेल्या नेत्या आंग सान स्यू की यांना सत्तेवरून हटवले, तेव्हा शी जिनपिंग यांनी या सत्तापालटाचा निषेध करण्यास नकार दिला. या काळात चीनने म्यानमारमध्ये सत्तेत असलेल्या लष्कराला शस्त्रे विकणेही सुरू ठेवले. चीनने प्रत्येक आंतरराष्ट्रीय मंचावर म्यानमारच्या लष्करी सरकारचा बचाव केला; पण त्यांनी म्यानमारचे लष्करी शासक मिन आंग हलाईंग यांना राष्ट्रप्रमुख म्हणून मान्यता दिली नाही किंवा त्यांना चीनमध्ये आमंत्रित केले नाही. म्यानमारमधील तीन वर्षांच्या युद्धात हजारो लोक मरण पावले आणि लाखो लोक विस्थापित झाले; पण शेवटचा शेवट दिसत नाही.