

भारतीय नौकानयनाला प्राचीन काळापासून वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. सिंधू संस्कृती ते पूर्वमध्यकाळपर्यंत समुद्र प्रवास कधीच निषिद्ध नव्हता. पूर्वमध्य युग येता-येता धर्मशास्त्रांनी समुद्र प्रवास करणे निषिद्ध ठरवल्याने नौकानयनाला अवकळा आली. भारतात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपवाद वगळता अन्य शासकांना हे शक्य झाले नाही.
नाविक ज्ञान हे असे ज्ञान आहे की, जे एका पिढीत सहजासहजी तयार होणारे नव्हते, तरीही शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची सिद्धता सिद्ध करून दाखवली. युरोपीय आरमाराच्या तोडीचे आरमार निर्माण करून सागर संस्कृतीवर निविर्वाद वर्चस्व गाजवणार्या युरोपीय सागर सत्तांना अस्तित्वासाठी झगडावयास लावले. 15 व्या शतकापासून 16 व्या शतकापर्यंत पोर्तुगीज, डच, इंग्रज व फ्रेंच आदी सागर संस्कृतीवर वर्चस्व असलेल्या युरोपीय देशांतील प्रतिनिधींचे भारतीय समुद्रकिनारपट्टीवर आगमन झाले. वसाहतवादी मानसिकता असलेल्या या व्यापार्यांनी हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरातील अनेक छोटी-मोठी बेटे व बंदरे व्यापार्याचा निमित्ताने हळूहळू गिळंकृत केली. साम्राज्यवादी धोरणाचा पुरस्कार करणार्या या युरोपीयांचे धोरण ओळखून शिवाजी महाराजांनी आरमार उभारणीस प्रारंभ केला. एखाद्या जन्मजात ‘राजमर्मज्ञ’ प्रमाणे आरमाराच्या उभारणीसाठी कौशल्याने आणि काटेकोर नियोजन केले. हिंदी महासागरावर आरमाराच्या माध्यमातून अधिराज्य निर्माण करण्यासोबतच ते राष्ट्रीय प्रेरणेने प्रेरित झालेले होते. सागर संस्कृतीच्या माध्यमातून संपूर्ण जगाला कवेत घेण्यास निघालेल्या वाणिज्यवादी नाविकांचे कुटिल डाव उधळून लावण्याचा पहिला प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यास कटिबद्ध असलेल्या शिवाजी महाराजांना स्वातंत्र्यास असलेला हा धोका स्पष्ट दिसत होता. म्हणूनच अनुकूल काळ येताच त्यांनी स्वत:चे आरमार बांधण्यास व त्याचा विस्तार करण्यास प्रारंभ केला. काही तत्कालिक कारणांमुळे या कार्यास वेगाने चालना मिळाली असली, तरी सागरी किनार्याचे रक्षण ही धारणा शिवरायांच्या मनात दीर्घकाळ नांदत होती.
14 ऑगस्ट 1657 रोजी रघुनाथ बल्लाळ यांनी दाभोळ जिंकून घेतले आणि सिद्धीच्या दंडाराजपुरीवर चाल करून जंजिर्याचे मोर्चे बांधले. दंडाराजपुरीचा किनारा मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आला; मात्र जंजिरा त्यांना जिंकून घेता आला नाही. शिवाजी महाराजांनी दसर्याचे सीमोल्लंघन केले. दादाजी बापूजी रांझेकर, सखो कृष्ण लोहोकरे यांना सोबत घेऊन कोकणातील कल्याण आणि भिवंडी ही महत्त्वाची ठाणी 24 ऑक्टोबर 1657 रोजी जिंकून घेतली. जानेवारीअखेर त्यांनी कुलाबा, चौल, तळे आणि घोसाळे ही ठाणी जिंकून घेतली आणि स्वराज्याच्या सीमा सागराला भिडल्या; मात्र जंजिराच्या सिद्धीवर विजय प्राप्त करता आला नाही, याची खंत मात्र शिवाजी महाराजांच्या मनात कायमची घर करून बसली. समुद्रावर सिद्धी अजिंक्य होता. एतद्देशीय हिंदू राज्यांचा त्याच्यापुढे टिकाव लागत नव्हता. केवळ सिद्धीच काय पोर्तुगीज, अरब, डच व इंग्रज हे सागर संस्कृतीवर वर्चस्व गाजवणारे शत्रू पाण्यातील पावप्यादे समुद्रावर भारतीय सत्ताधिशांची इज्जत घ्यायला कमी करत नव्हते. दिवसाढवळ्या किनार्यावरील गोरगरीब जनतेवर अन्याय-अत्याचार, लूटमार, बायका-मुलांच्या अब्रूला हात घालणे ही नित्याची गोष्ट होती. समुद्रावरील व्यापारी जहाजे, गलबते लुटून समुद्रातून चाललेल्या परकीय व्यापारावर वर्चस्व निर्माण करून ते श्रीमंत आणि गब्बर झाले होते. वास्तविक, हिंदी महासागर भारताचा; पण त्यावर सत्ता मात्र पोर्तुगीजांची होती. दस्तकाशिवाय (सागरी परवाना) परकीय अथवा एतद्देशीय जहाजांना समुद्रावर फिरण्याची मनाई होती. मुघल, आदिलशहा, मराठे किंवा इतर छोट्या-मोठ्या सत्तांना पैसे भरून दस्तक घेण्याशिवाय पर्याय नव्हता. पोर्तुगीजांचा दस्तक नसेल, तर मालासहीत जहाजे जबरीने जप्त केली जात. शिवाजी महाराजांना या सर्व गोष्टींची कल्पना होती. विदेशी व्यापार परकीयांनी बळकावल्यामुळे रयतेचे नुकसान होत आहे, हे त्यांना उमगलेले होते. स्वतःची व्यापारी गलबते हवीत आणि त्याचसोबत व्यापार व किनारपट्टीच्या संरक्षणासाठी आरमार उभारले पाहिजे, याचा द़ृढ संकल्प त्यांनी केला होता.
कोकणच्या स्वारीत शिवाजी महाराजांनी या सर्व गोष्टींचे सम्यक आकलन करून आरमाराची मुहूर्तमेढ रोवण्याचा निर्णय घेतला. आरमार उभारण्याच्या द़ृष्टीने उत्तर कोकणातील उल्हास नदीतील कल्याण आणि भिवंडी या बंदरांमध्ये जहाज बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला. जहाजांना आसरा घेण्यासाठी, मदत व साहित्य पुरवठा करण्यासाठी समुद्रकाठी नावीक तळ व किल्ले हवे होते. त्या द़ृष्टिकोनातून त्यांनी कल्याण, भिवंडी येथे आरमारी तळासाठी दुर्गाडीचा किल्ला बांधला. रत्नागिरी जिल्ह्यात खारेपाटणजवळ विजयदुर्ग नावाचा आधीच असलेला जलदुर्ग आणखी बळकट करून घेतला. सुवर्णदुर्ग, कल्याण आणि विजयदुर्ग या आरमारी ठाण्यांसोबत त्यांनी स्वतःची गलबते बांधण्यास सुरुवात केली. 1659 च्या जुलैमध्ये 20 जहाजांचा पहिला काफिला बांधून सागरात आणल्याचा उल्लेख पोर्तुगीज कागदपत्रातून मिळतो. आरमार उभारणीला शिवाजी महाराजांनी जेवढे प्राधान्य दिले तेवढे ते आरमार सहजासहजी शत्रूच्या हातात पडू नये, यांसंबंधी कटाक्ष ठेवलेला दिसतो. ‘एकाच बंदरात प्रतिवर्षी आरमाराची छावणी केल्यास आरमाराच्या लोकांकडून तेथील जनतेला त्रास होऊ नये म्हणून प्रतिवर्षी नवीन बंदराची छावणी करावी,’ हे विधान शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याचे निदर्शक होते.