

अवघ्या 32 वर्षांच्या आयुष्यात छत्रपती संभाजी महाराज यांनी बलाढ्य औरंगजेबाविरुद्ध निर्भयपणे संघर्ष करत स्वराज्याचे रक्षण केले. त्यांच्या बलिदानाची स्मृती 11 मार्च या स्मृतिदिनी प्रेरणा देत राहते.
अवघे 32 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या छत्रपती संभाजीराजांनी भारतीय इतिहासात जे शौर्य, धैर्य आणि औदार्य दाखविले त्याला तोड नाही. त्यांना प्रत्यक्ष पाहणारा फ्रेंच पर्यटक ॲबे कॅरे म्हणतो, ‘संभाजीसारखा पराक्रमी, बुद्धिमान आणि सुंदर राजपुत्र मी भारत सोडून अन्यत्र पाहिला नाही.’ छत्रपती शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य सहज जिंकता येईल, या इराद्याने औरंगजेब स्वराज्यात आला तेव्हा छत्रपती संभाजीराजे केवळ 24 वर्षांचे होते. औरंगजेबाविरुद्ध अत्यंत निकराचा लढा संभाजीराजांनी दिला. बऱ्हाणपुरापासून गोवा आणि विजापूरपासून जंजिऱ्यापर्यंत औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले.
औरंगजेब हा त्या काळातील जगातील सर्वात मोठा सत्ताधीश होता. औरंगजेबाने मराठ्यांचे स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी जंग जंग पछाडले; परंतु संभाजीराजांनी त्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. एक-दोन वर्षांसाठी दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाला सुमारे 27 वर्षे राजधानीपासून दक्षिणेकडे थांबावे लागले. शेवटी त्याचा अंत महाराष्ट्रातच झाला. शंभूराजांनी त्याला जेरीस आणले. औरंगजेबाच्या पदरी असणारा खाफीखान म्हणतो, ‘संभाजीराजे मोगलांसाठी शिवाजीराजांपेक्षा दहा पटीने तापदायक होते.’ औरंगजेबासारख्या धूर्त, पाताळयंत्री, क्रूर आणि निर्दयी समाटाचा संभाजीराजांनी मोठ्या धैर्याने आणि शौर्याने प्रतिकार केला. ते स्वराज्य रक्षणासाठी मोगल, सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग््राजाविरुद्ध लढत होते. संकटसमयी कोणत्याही दैवावर विश्वास न ठेवता मोठ्या धैर्याने लढतो तो खरा वीरपुरुष, असे संभाजीराजांचे मत होते.
संभाजीराजेंनी सावत्र बंधू राजाराम महाराजांना अत्यंत प्रेमाने वागविले. त्यांचे तीन विवाह करून दिले. मातोश्री सोयराबाई यांना सावत्रपणाची वागणूक न देता अत्यंत आदराने वागविले. पत्नी येसुबाईंना संभाजीराजांनी सर्वाधिकार दिले. त्यांना स्वराज्याचे कुलमुखत्यार केले. ‘श्री सखी राज्ञी जयतू’ या नावाचा येसूबाईंचा शिक्का बनविला. राज्यातील सैनिकांना आणि रयतेला त्यांनी सन्मानाने वागविले, याबाबत ॲबे कॅरे म्हणतो, ‘संभाजीराजे वयोवृद्ध आणि समवयस्क सैनिकांना अत्यंत मायेने आणि आदराने वागवतात. जखमी सैनिकांना भेटून त्यांच्या औषधोपचाराबाबत चौकशी करतात.’
वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी दहा हजार सैन्यांनिशी गुजरात मोहीम यशस्वी करून शत्रूंना पराभूत केले, असे कॅरे सांगतो. त्यांनी रणांगणाप्रमाणे ज्ञानाचे क्षेत्रदेखील गाजविले. ते विद्याव्यासंगी होते. संस्कृत, हिंदी भाषांवर त्यांचे प्रभूत्व होते. त्यांनी ‘बुधभूषण’ हा संस्कृत, तर ‘नखशिख’, ‘नायिकाभेद’, ‘सातसतक’ हे हिंदी ग््रांथ लिहिले. तत्कालीन धर्मपंडित गागाभट्ट यांनी ‘समयनय’ हा ग््रांथ संभाजीराजांना अर्पण केला आहे. प्राच्यविद्यापंडित शरद पाटील संभाजीराजांना ‘महापंडित’ म्हणून गौरवितात. संभाजीराजांना शिवरायांनी वाराणसीत शाक पंडित कवी कुलेश यांच्याकडे ठेवले. ते दिलेरखानाकडे गेले. म्हणून त्यांचा प्राण वाचला, अन्यथा मंत्र्यांनी त्यांचा घात केला असता, असे शरद पाटील सांगतात. अत्यंत प्रतिकूल काळात संभाजीराजांनी स्वराज्याचे रक्षण केले. त्यामुळे ते स्वराज्यरक्षक ठरतात. स्वराज्य संवर्धनासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यामुळे ते स्वराज्यसंवर्धक ठरतात.
औरंगजेबाच्या सरदारांनी संभाजीराजांना दि. 1 फेबुवारी 1689 रोजी कोकणातील संगमेश्वर या ठिकाणी पकडले. नगर जिल्ह्यातील भीमेच्या काठावर असणाऱ्या बहादूरगड येथे आणले. त्यांना अपमानित केले. प्रचंड झळ केला; परंतु संभाजीराजे डगमगले नाहीत. शरण गेले नाहीत. प्राण वाचविण्यासाठी औरंगजेबाकडे तडजोड केली नाही. संभाजीराजांचे सुमारे 39 दिवस हाल-हाल केले. त्यांचे डोळे, जीभ कापून त्यांच्या शरीराचे तुकडे-तुकडे केले. मृत्यूला न घाबरता अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा संभाजीराजांच्या बलिदानाने मराठ्यांना मिळाली. (अठरापगड जातींना मराठा म्हटले आहे.) त्यांच्या बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही. 11 मार्च संभाजीराजांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांना विनम अभिवादन!