Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti Wishes | स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti Wishes |
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti Wishes | स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे
Published on
Updated on

प्रा. डॉ. आनंद गिरी

छत्रपती संभाजीराजे हे केवळ शूर योद्धे नव्हते, तर स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणारे अद्वितीय राष्ट्रनायक होते. औरंगजेबाच्या प्रचंड आक्रमणासमोर न झुकता त्यांनी पराक्रम, विद्वत्ता आणि बलिदानाचा तेजस्वी इतिहास घडविला. आज त्यांची जयंती. त्यानिमित्त...

छत्रपती संभाजीराजेंचा जन्म 14 मे 1657 रोजी राणी सईबाईसाहेबांच्या पोटी झाला. अवघे दोन वर्षांचे असतानाच ते मातृसुखाला पोरके झाले. तेव्हापासून जिजामातांनी संभाजीराजेंचा सांभाळ केला. इ.स. 1670 मध्ये राणी सोयराबाईच्या पोटी राजारामाचा जन्म झाला; मात्र राज्याचा युवराज म्हणून सर्वजण संभाजीराजेंकडेच पाहत होते. संभाजीराजे अवघे आठ वर्षांचे असतानाच त्यांना मोगल बादशहाकडून पंचहजारी मनसब बहाल करण्यात आली होती.

आग्रा भेटीत संभाजीराजे छत्रपती शिवरायांबरोबर होते. त्याचवेळी मोगली कैदेचे भयंकर संकट कोसळले. त्यातून शिवरायांनी सुटका करून घेतली असली, तरी बाल संभाजीचे निश्चितच हाल झाले असणार. भयानक संकटाला सामोरे जाणार्‍या बालसंभाजीच्या धाडसाची आपण कल्पनाच करू शकणार नाही. आग्र्यावरून परत आल्यानंतर संभाजीराजेंना पुन्हा मोगलांची मनसबदारी मिळाली. अगदी लहान वयात मिळालेली मनसबदारी व त्याच काळात ते मराठी सैन्याचे अधिपत्यही करू लागले.

छत्रपती संभाजीराजेंची खरी कर्तबगारी औरंगजेबाच्या मोहिमेच्या ऐन उमेदीत, त्यांच्याशी सतत, आठ-नऊ वर्षे संघर्ष करण्यात व त्यांच्या आक्रमक फौजापासून स्वराज्याचे रक्षण करण्यात आहे. संभाजीराजेंचे खरे मोठेपण त्यांच्या हत्येपूर्वी शत्रूकडून हालहाल होत असता तोंडातून एकही शब्द न उच्चारण्यात आहे. संभाजीराजेंनी आपल्या पराक्रमाने पोर्तुगीज, मोगलांसारख्या शत्रूंना शह दिला आणि स्वराज्य वाचविले. त्यांच्या पराक्रमाचा इतिहास बखरकारांनी न मांडता त्यांच्याबद्दल विकृत लिहिले गेले. त्यांना बदनाम केले गेले. छत्रपती संभाजीराजे संस्कृत व प्राकृत भाषेचे ज्ञानी होते. त्यांनी अगदी लहान वयात ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ रचला. त्यांच्या सुसंस्कृतपणाचा विसर इतिहासकारांना पडलेला दिसतो.

फ्रेंच प्रवासी अ‍ॅबे कॅरे (इ.स. 1672) छत्रपती संभाजी महाराजांबद्दल लिहितो, ‘शिवाजीराजेंनी दहा हजार शूर सैन्याचा विभाग आपल्या मुलाच्या ताब्यात दिला होता. हा युवराज लहान असला, तरी धैर्यशील आणि पित्याच्या किर्तीस साजेल असाच शूरवीर आहे. शिवाजीराजेंसारख्या युद्धकुशल बापाप्रमाणेच तो युद्धकलेत तरबेज आहे. तो चांगल्या वयोवृद्ध सेनापतीची बरोबरी करेल इतका तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिरूपवान आहे.’ छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकानंतर (इ.स. 1674) संभाजीराजेंना मुलकी व लष्करी कारभारातील अनेक कामगिर्‍या सांगून त्यांना राज्यकारभाराचे शिक्षण मिळावे अशी व्यवस्था केली होती; परंतु राज्याभिषेकानंतर काही दिवसांत जिजामातांचे निधन झाल्याने संभाजीराजेंची मायेची सावली नाहीशी झाली. शिवरायांनी कर्नाटकात मोहिमेवेळी संभाजीराजेंना सोबत न नेता तसेच रायगडावरही न ठेवता दक्षिण कोकणात शृंगारपूर येथे ठेवले.

याचवेळी कोल्हापूर सुभ्याचा संभाजीराजेंशी संबंध आला. कोल्हापूर सुभा म्हणजेच पन्हाळा किल्ला. कर्नाटकात जाताना शिवरायांनी पन्हाळा, विशाळगड आणि शृंगारपूरची सुभेदारी संभाजीराजेंना दिल्याचे बखरकार सांगतात. छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातून दिग्विजयी होऊन पन्हाळगडावर आले. त्यावेळी पिता-पुत्रांची भेट झाली. त्यानंतर शिवाजी महाराज रायगडाकडे निघून गेले.शिवाजीराजेंनी पन्हाळगडावर येऊन संभाजीराजेंची भेट घेतली होती. त्यांच्या सल्ल्यानुुसार संभाजीराजे पन्हाळ्याहून सज्जनगडांकडे निघून गेले. त्यानंतर मोगलांसारख्या दुष्ट राक्षसांना नामशेष करणे हे आपले कर्तव्य आहे, असे समजून ते मोगल छावणीतून बाहेर पडले व पुन्हा पन्हाळ्यावर आले. संभाजीराजे स्वराज्यात आल्यानंतर स्वतः शिवाजी महाराज पन्हाळगडावर आले व संभाजींची समजूत काढली.

छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर सोयराबाईंनी अण्णाजी दत्तो व मोरोपंत पिंगळे यांच्या पुढाकाराने राजाराम महाराजांचा मंचकारोहण घडवून आणला. यावेळी संभाजीराजे पन्हाळ्यावर होते. मोरोपंत पिंगळे व अण्णाजी दत्तोंनी संभाजीराजेंना पन्हाळ्यावर कैद करण्याची योजना आखली होती. या विषयीचे पत्र संभाजीराजेंच्या हाती येताच त्यांनी पन्हाळगडावरील विरोधी अधिकार्‍यांचा बंदोबस्त केला. अण्णाजी दत्तो व मोरोपंत पिंगळे हे दोघे संभाजीराजेंना कैद करण्याकरिता येत असताना वाटेत कराडजवळ सेनापती हंबीरराव मोहिते होते. हंबीररावांनी संभाजींचीच बाजू घेतली आणि मोरोपंत व अण्णाजीला कैद करून ते पन्हाळगडावर आले. दि. 20 जुलै 1680 रोजी संभाजीराजेंनी आपला मंचकारोहण करवून घेतला. दि. 16 जानेवारी 1680 रोजी राज्याभिषेक करवून घेतला. यानंतर सतत मोगलांशी, पोर्तुगांशी झुंज देत स्वराज्याचे रक्षण केले.

1683 मध्ये शहजादा आझमशहाने संभाजीराजेंच्या मुलखातून कोल्हापूरपर्यंत धुमाकूळ घातला होता. संभाजीराजेंनी पन्हाळ्यावरच असताना स्वराज्याचे धोरण ठरवले होते. त्यांच्या अखेरचे दिवसही कोल्हापूर सुभ्यातच गेले. 1687 मध्ये सेनापती हंबीरराव मोहिते मृत्यू पावले. त्या धक्क्यातून सावरून 1688 मध्ये ‘सातसतक’ हा काव्य ग्रंथ संभाजीराजेंनी लिहिलेला दिसतो. संभाजीराजेंनी ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ, तर ‘नायिकाभेद’, ‘नखशिखांत’ आणि ‘सातसतक’ हे हिंदी ग्रंथ लिहिले.

मेहुणा गणोजी शिर्के यांच्याशी त्यांचे वितुष्ट आले. त्यातून पन्हाळगडावर असणारे कवी कलश यांच्यावर गणोजी शिर्के यांनी स्वारी केली. त्यानंतर कवी कलश विशाळगडावर निघून गेले. गणोजीचे पारिपत्य करण्यासाठी संभाजीराजे पन्हाळगडावर आले व शिर्केंचा पराभव करून विशाळगडावर आले. तेथून संगमेश्वराकडे सरदेसाईवाड्यात चार दिवस राहून सर्व कामे आटोपून रायगडाकडे जाण्याचा त्यांचा निर्धार होता. त्यांनी पन्हाळ्यापासून संगमेश्वरपर्यंत हेरांचे जाळे विणले होते. कारण, मोगली सेनानी शेखनिजाम ऊर्फ मुर्करबखान हा कोल्हापूर परिसरातच संभाजीराजेंच्या मागावर होता; मात्र धोका वाटत नसल्याने त्यांनी बरीच सेना रायगडाकडे पाठवून निवडक सैन्य सोबत ठेवले होते; परंतु शत्रूने संभाजीराजांना घेरले व त्यांना जेरबंद करून दि. 15 फेब्रुवारी 1689 ला बादशहाच्या छावणीत आणले. औरंगजेबाने अमानुषपणे संभाजीराजेंना ठार केले. म्हणूनच शंभूराजेंच्या बलिदानाने सारा महाराष्ट्र पेटून उठला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news